नदी – प्रदूषण टाळणाराच खरा वारकरी होय- डॉ.राजेंद्र शेंडे 

November 1st, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – “पाणी अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे वाढत्या नदी प्रदूषणाचे नियंत्रण करणे हे वारकर्‍यांचे खरे कर्तव्य आहे. माऊली म्हणून संबोधिल्या जाणार्‍या नद्यांना घाण व कचरा अर्पण करू नये. नदीच्या काठावरूनच तीर्थक्षेत्र निर्माण होत असते आणि त्या क्षेत्राला पवित्र व समृद्ध ठेवण्यासाठी सर्वांना प्रदूषण नियंत्रणाचे भान ठेवावे लागेल.” असे उद्गार युनायटेड नेशन्स पर्यावरण विभागाचे माजी संचालक आणि सामूहिक नोबेल पुरस्काराचे मानकरी, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी काढले.
विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने ‘पवित्र चंद्रभागे’ ची आरती या नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीच्या पूर्व संध्येला भक्त पुंडलिक घाटावर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते चंद्रभागेची आरती संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ, सौ.उषा विश्‍वनाथ कराड, भगवान महाराज कराड, दिलीप कराड, सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देशमुख, संजय देशमुख, दत्तात्रय बडवे इ. उपस्थित होते. 
डॉ.राजेंद्र शेंडे म्हणाले,“ज्या ठिकाणाहून नदी लुप्त झाली, ते क्षेत्र मनुष्यरहित झाले. इतिहासात याची उत्तम उदाहरणे म्हणजे ग्रीस, मोहेंजो दडो ही ठिकाणे आहेत. त्यामुळे नद्यांना वाचविणे ही काळाची गरज आहे. सध्या जगातील तीस टक्के नद्या या समुद्रापर्यंत पोहचतच नाहीत. नद्यांवर आपले जीवन अवलंबून आहे, असा विचार केल्यास सर्व नद्या प्रदूषणमुक्त व स्वच्छ राहण्यास मदत होईल. सरोवर, नाले व छोटे छोटे ओढे यांनासुध्दा प्रदूषणमुक्त करून तेथे आरती करावी. त्यासाठी प्रत्येक गावाला पुढाकार घ्यावा लागेल. बदलत्या काळानुसार तीर्थ क्षेत्र हे ज्ञानतीर्थक्षेत्र बनावे आणि त्यासाठी प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ नमामि गंगे सारखा उपक्रम सुरू करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांना पुनर्जीवन  मिळेल. पाणी म्हणजे जीवन आहे. त्यामुळे यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. या ठिकाणी उत्तम प्रकाराच्या घाटांची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून ते ज्ञानपंढरी म्हणून ओळखले जाते.भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये ज्ञानाची पूजा आणि सत्याचा शोध घेतला जातो. त्याग आणि समर्पण या दोन गोष्टींना भारतीय संस्कृतीमध्ये वेगळे महत्व आहे.”
डॉ.एस.एन.पठाण यांनी आपल्या प्रस्ताविकात महाआरतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. सृष्टीमधील अनेक नद्या मृत झाल्या आहेत. त्यांना वाचविणे हे आपले कर्तव्य आहे. चंद्रभागेतील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. जेथे नदी जीवंत असते, तेथील समाज आनंदी असतो. त्यामुळे नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी वारकर्‍यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
त्याच प्रमाणे पं.वसंतराव गाडगीळ, ह.भ.प. भगवान महाराज कराड, श्रीकांत देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आळंदी देहूचा ज्या प्रकारे कायाकल्प झाला आहे, तसाच येथे व्हावा. चंद्रभागेची आरती झाली, तशी आरती महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी नद्या आहेत, तेथे व्हावी.
शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच, आभार मानले.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions