एनडीएत सामील झाल्याची केली घोषणा
आपल्या पक्ष स्थापनेने शिवशेनेत घाबरत – राणेंचा दावा
आपला पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील करत असतानाच येत्या १० दिवसात महाराष्ट्र दौरा करून संघटना बांधणीचे काम करणार आहोत. आपल्या महाराष्ट्र दौ-याचा प्रारंभ रत्नागिरी येथून करणार असल्याचे नारायण राणे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. आपण २०१९ पर्यंत मी राज्यातच राहायचे ठरविले आहे असे सांगतानाच राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व जाणवत नाही म्हणूनच तर मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन नवीन पक्ष स्थापन करून सत्ताधारी ‘एनडीए’त गेलो. मी विरोधी पक्षात असतो तर विरोधी पक्षाचे अस्तित्व जाणवले असते अशा उपरोधित शब्दात त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
कॉँग्रेसने बरखास्त केलेली सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणीच व पदाधिकारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्याच पदावर राहतील. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आपल्या नवीन पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, आपल्या पक्षाचा झेंडा कोणत्याही एका रंगाचा नाही, तर तीन रंगात असेल. झेंड्यावर वज्रमुठीचे चिन्ह असेल, असेही नारायण राणे यांनी सांगितले. स्वाभिमान पक्षाच्या नेतृत्वाखालील जिजाई अंगणवाडी कर्मचारी संघटनेने संप मागे घेऊन कामावर हजर राहण्याचा निर्णय घेतला असून अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करून घेण्यासाठी आपला पक्ष कटिबद्ध असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे २७ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. अन्य कुठल्याही पक्षाचे सरपंच असे बिनविरोध निवडून आलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
मला मंत्रीपदाची ऑफर वगैरे काहीही नाही. तशी ऑफर आली की सांगेन. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मंत्रीपद अगर खात्याची चर्चा झालेली नाही. आज मी ‘एनडीए’त सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे यानंतर पुढील चर्चा होईल. ‘एनडीए’त सामील झाल्यामुळे २०१९ची निवडणूक एनडीएच्या घटक पक्षांशी संयुक्तपणे लढवायची का, त्याचा विचारही २०१९ मध्ये केला जाईल. आपल्या नव्या पक्षात आ. नितेश राणे यांची एन्ट्री योग्यवेळी होईल. नितेश राणे यांच्याप्रमाणे अन्य बरेच आमदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात यायला उत्सुक आहेत. यामध्ये अन्य राजकीय पक्षाच्या आमदारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वात जास्त शिवसेनेचे आमदार आपल्या पक्षात येतील, असेही नारायण राणे प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले.
मी प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी शोधलेला नाही. शत्रू पण तोलामोलाचा असावा लागतो. मी शिवसेनेला शत्रू मानत नाही. शिवसेनेच्या कार्यपद्धतीला व विचारसरणीला मी विरोध करतो, असेही नारायण राणे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. आपण स्वतंत्र पक्ष काढल्याने सेनानेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिवसेनेच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली की नाही हे पाहायला मी गेलेलो नाही. मात्र, शिवसेनेच्या गोटात घबराट सुरू झालेली आहे, हे नक्की.