पुणे – एक वर्षांपुर्वी केलेल्या नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा बाहेर आला नाही. देशभर शेकडो गरीब नागरिकांना प्राण गमवावे लागले. नोटाबंदीचा फायदा फक्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीला झाला. शेतक-यांना कर्ज माफी दिल्याच्या कोट्यावधी रुपयांच्या फसव्या जाहीराती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात आली. सोळा महिन्यात एकोणिस वेळा गॅस सिलेंडरची भाववाढ करण्यात आली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन दारुची विक्री वाढविण्यासाठी दारुच्या बाटलीला महिलांचे नाव द्या असे वक्तव्य करुन महिला भगिनींचा अपमान करतात. या महाजनांना मंत्री म्हणण्याची आम्हाला लाज वाटते. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र सरकारने एक वर्षांपुर्वी केलेल्या नोटाबंदी विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस बिंदू तिवारी, महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शाहबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, राजन नायर, नंदा तुळसे, मयुर जैयस्वाल, लक्ष्मण रुपनर, आबा खराडे, मनोज बिशप, सतिश भोसले, मकरध्वज यादव आदी उपस्थित होते.