‘पद्मदुर्ग’ एक अधुरे स्वप्न

January 16th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

टिम “येवा कोकणात”

रायगड जिल्ह्यातील मुरुड मधल्या जंजिरा किल्यापासून काही अंतरावर समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ल्याला विशेष महत्व आहे. किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बर्याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात.या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.जंजिरा किल्याला पर्याय आणि सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा किल्ला उभारला गेला मात्र इतिहासाची पाने चाळल्यावर हे स्वप्न अधुरेच राहिले म्हणायला हवे.
मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे.या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे.या ठिकाणाहून या किल्यात बोटीने जाता येते. दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते. कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे.पद्मदूर्गच्या पडकोटचा वैशिष्ट्येपूर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दूरुनच आपले लक्ष वेधून घेतो. मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे.
पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे चुना वापरलेला आहे. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खार्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष पहायला मिळतात.
दुर्गाचे मुख्यद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्याच्यासाठी केलेल्या देवडय़ा आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोन बुरुज आहेत.या ३० फूट उंच बुरुजात तोफा ठेवण्यासाठी झरोके व जागोजागी जंग्या आहेत. तसेच बाजूच्या तटबंदीत असलेल्या जंग्याचा व तोफांचा रोख प्रवेशद्वारावर आहे.प्रवेशद्वाराच्या बाजूच्या दगडांच्या भिंतीतील दगड लाटांच्या, वार्याच्या मार्याने झिजलेले आहेत.किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.
काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. चारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमधे गोडय़ा पाण्याची चार टाकी केलेली दिसतात.किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत नावेने फिरायचे.तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचा किनाराही उत्तम दिसतो.
इतिहास :-
जंजी-याच्या सिद्धीचा कोकण पट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.
हि बातमी कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती. परंतु महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती. किल्याची रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६५७ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली होती. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्र दिवस एक करून सिद्धीशी लढत लढत किल्ल्याची उभारणी केली. पद्मदुर्ग चे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली. इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजी-याची मोहीम काढली या मोहिमेत मचव्यावरून तोफांचा मारा जंजी-या वर केला पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंत यांनी जंजी-याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्म्दुर्गावर काम करणा-या अष्टगारातील सोनकोळ्याच्या प्रमुखाने लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्वीकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या ८-१० सहका-यांसह पद्मदुर्ग मधून बाहेर पडले. अंधाराचा फायदा घेत जंजी-याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारक-याची वाट पाहीत राहिला. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही हा पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्मदुर्ग गाठला. लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्या सोनकोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराज काय ते समजले. त्यांनी मोरोपंताना एक नावे गलबत बांधून त्याचे नाव “पालखी” ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण, व दर्या किनारीची “सरपाटीलकी” दिली.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही १६८० मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात मिळतो. त्यानंतर पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला. मराठयांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला. मात्र याबाबत काही इतिहास उपलब्ध नाही. ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेला हा किल्ला अजूनही दुर्लक्षित आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions