सिंधुदुर्ग : पारंपरिक मच्छिमारांवर जर अन्याय होत असेल तर नितेश राणे ते कदापिही सहन करणार नाही. १२ वावाच्या आत पर्सनेट धारक येत असती तर त्यांच्या विरोधात समुद्रात पहिले फटाके फोडणारा नितेश राणे असेल अशा कडक शब्दात जिल्हा प्रशासनाला इशारा देत आज कणकवली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे कडाडले. पालकमंत्री केसरकर आणि आमदार नाईक हे संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
समुद्रात १२ वावाच्या बाहेर पर्सनेट धारकांनी मासेमारी करावी असा शासनाचा अद्यादेश आहे. मात्र हा शासन निर्णय बदलण्याची चर्चा सत्ताधारी पक्षाकडून केली जात आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ वावाच्या आत पर्सनेट धारक अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. हि बाब लक्षात येऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे संबंधित अधिकारी मत्स्य आयुक्त वस्त यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.असा आरोप करतानाच पारंपरिक मच्छिमारांवर होणार हा अन्याय आपण सहन करणार नाही असे आमदार राणे म्हणाले. १२ वावाच्या बाहेर पर्सनेट धारक राहिले नाहीत तर मच्छिमारांच्या भावनांचा उद्रेक होऊन भर समुद्रात फटाके फुटतील, तसेच हे फटाके फोडायला नितेश राणे सर्वात पुढे असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मच्छिमारी संदर्भात राज्य सरकारने नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. परंतु शासनाच्या भूमिकेविरोधात जाऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर आणि मच्छिमार नेते विकी तोरस्कर यांणी पारंपरिक मच्छिमारांची मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडल्यामुळे कौतुक केले. पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी राहणाऱ्यांना आपला नेहमीच पाठिंबा असेल असे सांगतानाच पारंपरिक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत शिवसेना बेजबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी केला.
पारंपरिक मच्छिमारांवर होणार अन्याय सहन करणार नाही: आमदार नितेश राणे यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा
Team TNV August 18th, 2017 Posted In: येवा कोकणात
Team TNV