पुणे – पुणे रेल्वे स्थानकावर दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेता पार्सल विभाग घोरपडी येथे हलविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत असल्याचे वृत्त आहे. मुंबईतील पादचारी पुलावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव पार्सल विभाग हलविण्याचा विचार सुरु असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकावर एकूण तीन पादचारी पूल आहेत. त्यापैकी सर्वात जुन्या असलेल्या व दत्त मंदिराच्या जवळून जाणार्या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यातून कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पार्सल विभागातील काही काम तात्पुरत्या काळासाठी हलविण्याचा विचार सुरु आहे, असे पुणे विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) मिलिंद देऊस्कर यांनी सांगितले.