आम्ही कमला प्राधान्य देतो आणि विरोधक आम्हाला प्राधान्य देतात, हि वस्तूस्थिती आहेअसा टोला लगावतानाच स्मगलिंगच्या व्यवसायाची वडिलोपार्जित पार्श्वभूमी असलेल्यांची आमच्या भानगडीत पडू नये असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर याना दिला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही पक्ष काढला, पालकमंत्री केसरकरांनी फक्त एक मित्रमंडळ काढून दाखवावे, असे आव्हानहि त्यांनी यावेळी दिले.
या वेळी संजू परब, मंदार नार्वेकर, दिलीप भालेकर, राजू बेग, पंकज पेडणेकर, सुधीर आडिवरेकर, पंढरीनाथ राऊळ, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘‘आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी कणकवली, मालवण आणि सावंतवाडी याठिकाणी भेट दिली. या दौऱ्यात जिल्ह्यातील २८ ठिकाणी समर्थ विकास पॅनेलचे सरपंच बसले आहेत. सावंतवाडी तालुक्यात सहापैकी पाच सरपंच बिनविरोध झाले आहेत. यावरून पुन्हा एकदा जिल्ह्यात राणेंचीच ताकद आहे. आणि राणेंना कोणीच हरवू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे.’’
राणेंवर टीका केली, की प्रसिद्धी मिळते. विरोधकांनी कितीही टीका केली, तरी उत्तर देणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत समर्थ विकास पॅनेलचे सरपंच बसणार आहेत, असा दावा राणे यांनी केला. येणाऱ्या काळात आमदार आणि खासदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असणार आहेत.’’
राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील पालकमंत्री नामधारी आहेत. महामार्ग प्रश्न सोडविणे त्यांना जमले नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी.’’
ते म्हणाले, ‘‘राणेंच्या विरोधात बोलले की प्रसिद्धी मिळते. आणि ती कात्रणे ‘मातोश्री’वर दाखविली, की शाबासकी मिळते, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने केसरकर टीका करीत आहेत.’’ भाजपने राणेंना नाकारल्याने त्यांना पक्ष काढावा लागला, अशी टीका केसरकर यांनी केली होती. त्याचा समाचार राणे यांनी घेतला. ते म्हणाले, ‘‘आम्हाला भाजपने नाकारले हे विचारण्यासाठी केसरकर हे अमित शहांकडे कधी गेले होते? ते ‘मातोश्री’वर मुश्किलीने पोचतात, ते शहांना काय भेटतील? राणेंनी पक्ष काढला, केसरकर यांनी एखादे मित्रमंडळ काढून दाखवावे.’’
या वेळी राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘राऊत यांना खासदारकीच्या काळात काहीच जमले नाही. माझ्या काळात जी कामे झाली, ती कामे आपण केली म्हणून सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, नव्याने कोणताही उद्योग अथवा कामे त्यांना आणले शक्य झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे.’’ यावेळी या वेळी राणे पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही विकासाच्या मागे आहोत. मात्र, हे आमच्या मागे लागून धन्यता मानतात. सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तेथील जनता त्यांना जागा दाखवेल.’’