पीएमपी बसपास दरवाढी विरोधात एकवटले पुणेकर

October 29th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – पीएमपीएमएलमधून पुणेकर मोठ्या संख्येने प्रवास करतात. बस पास हे पीएमपीकरीता आगाऊ मिळणारे उत्पन्न असते. परंतु कोणतीही घोषणा न करता अचानक सर्वच बस पासेस मध्ये वाढ करण्यात आली. यावर कोणचाही अंकुश नाही. पीएमपीच्या पासने प्रवास करणारा प्रवासी हक्काचा असून यामध्ये करण्यात आलेली वाढ जाचक आहे. पीएमपीएलची निकृष्ट सेवा आणि बस पास दरवाढीला विरोध करण्यासाठी पुण्यातील विविध सामाजिक, प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत स्वाक्षरी मोहिम राबविली.  ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, कष्टकरी, मोलकरणी, नर्सेस, फेरीवाले व इतर सामान्य नागरिकांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत मोठया प्रमाणात सहभाग घेतला. 
म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे पीएमपी प्रवासी मंचाच्यावतीने प्रवासी मेळावा आणि स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला मेजर जनरल सुधीर जटार (निवृत्त), चेतन तुपे, मारुती भापकर, सुजीत पटवर्धन, संजय शंके, कर्नल बाबूराव चौधरी, निश्चय म्हात्रे, मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे, यतीश देवडिगा उपस्थित होते. लोकायत पुणे, परिसर पुणे, जनवादी महिला संघटना,शहीद भगतसिंग युवा मंच, पिंपरी-चिंचवड, पिंपरी-चिंचवड सिटीझन्स फोरम,जाणीव संघटना, पुणे, आम आदमी पार्टी, पुणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे, चेतना नागरिक  मंच,पीएमपी प्रवासी मंच, सजग नागरिक मंच आदी संघटना मोहिमेत सहभागी झाल्या.  
सुजीत पटवर्धन म्हणाले, सार्वजनिक वाहतूक हा संपूर्ण शहराच्या वाहतुकीचा पाया आहे. ही वाहतूक सुविधा सवलतीची असण्याऐवजी ती मोफत असायला हवी. यामुळे शहरातील नागरीक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील. पर्यायाने शहराची प्रदुषण पातळी कमी होईल आणि लोकांचे आरोग्य सुधारेल. आर्थिकदृष्ट्या देखील हे परवडणारे आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी न देता देखील बसपास दरवाढ करण्यात आली. हे अत्यंत बेकायदेशीर आहे. वेळ न दवडता कायदयाचा आधार घ्यायला हवा आणि आता कायदेशीर लढाई लढायला हवी.
सुधीर जटार म्हणाले, बेकायदेशीर दरवाढ करुन कायदयाला लाथाडण्यात येत आहे. पीएमपीएमएल मध्ये सध्या हुकुमशाहीचे वातावरण आहे. पुण्यातील सर्व प्रवासी आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे एकत्रितपणे कोर्टात जाण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले. चेतन तुपे म्हणाले, पीएमपीएमएल ही नफ्यासाठी निर्माण केलेली संस्था नाही, तर प्रवाशांच्या सोयीसाठी आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रवाशांची होणारी पिळवणूक योग्य नाही. महापौरांनी ठणकावून सांगितले तर पीएमपीएमएलचे अधिकारी दरवाढ करु शकत नाहीत. या सार्वजनिक वाहतुकीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions