पुणे – सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ स्व. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने पुण्यात झाली हे तर सर्वश्रुत आहेच. या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे वर्ष हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष! यानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. कुणाल कुमार, महापौर मा. सौ. मुक्ता टिळक, सभागृह नेते मा. श्री. श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महापौर मा. सौ. मुक्ता टिळक यांनी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी शनिवार वाडा येथे संध्याकाळी 5.30 वाजता होणार असल्याचे सांगितले. या शुभारंभ समारंभात या उपक्रमाचे बोधचिन्ह, शुभंकर, मोबाईल अॅप्स, वेबसाईट आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाची प्रसिद्धी करण्यासाठी रचण्यात आलेल्या प्रसिद्धी गीताचे उद्घाटन होणार आहे. या शुभारंभ समारंभानंतर नागरिकांसाठी श्री. अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेले उपक्रम –
· २० ऑगस्ट, २०१७ – सकाळी ८ वाजता – दुचाकी रॅलीचे आयोजन
· २३ ऑगस्ट, २०१७ – ३,००० ढोलांचे वादन
स्थळ – एस. पी. कॉलेज ग्राउंड, सदाशिव पेठ
(या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे.)
· २४ ऑगस्ट, २०१७ – ३,००० विद्यार्थ्यांमार्फत शाडूच्या गणेशमूर्ती बनवणे.
स्थळ – कै. बाबुराव सणस मैदान, स्वारगेट