पुणे – सध्याच्या काळात महिलांसाठी प्रसिद्धी माध्यमे मोलाची कामगिरी करीत आहेत, महिलांच्या कर्तृत्वाची दखल माध्यमांमध्ये घेतली जात असल्याने महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत असल्याची भावना भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार मोना मेश्राम यांनी येथे व्यक्त केली. शिवाय आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या महिला क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
यंदा १९व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उदघाटन मोना मेश्राम यांच्या हस्ते झाले,त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या व कायाकल्पच्या सीमा वाघमोडे, अभिनेत्री माधवी मोरे, महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक ,अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, निर्मला जगताप ,योगिता निकम आदींसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी तेजस्विनी पुरस्काराने अंध मुलांमुलींसाठी मायेच्या आधारवड ठरलेल्या मीरा बडवे, नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव पर्यायाने महिलांचे कर्तृत्व गाजविणाऱ्या अंजली भागवत आणि सुरेल गायनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्तिकी गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना मोना मेश्राम म्हणाल्या की , आम्ही वर्ल्ड कपमध्ये जिंकलो नाही तरीही देशाच्या जनतेची मने आम्ही जिंकली, ती केवळ माध्यमे आमच्यासाठी सरसावल्याने आमच्या कर्तृत्वाची खऱ्या अर्थाने दखल घेतली गेली. प्रमुख पाहुण्या सीमा वाघमोडे म्हणाल्या कि, सामाजिक कार्य करताना अनंत अडचणी येतात. अनेकांच्या मदतीची गरज असते, दुर्दैवाने ती मिळत नाही. सत्ताधारीही जिथे लक्ष द्यायचे तिथे देत नाहीत. तुम्ही देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी होस्टेल आहे हे कधी ऐकले का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून कायाकल्प या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर अंध मुलांमुलींसाठी आधारवड ठरलेल्या आणि ब्रेललिपी लायब्ररीसाठी पुढाकार घेणाऱ्या मीरा बडवे यांनी अंध मुलांची कैफियत मांडली,त्यात अंध मुलींच्या भवितव्याचा प्रश्न किती गंभीर आहे याकडे लक्ष वेधताना , अंधत्व येऊनही आज ही मुले -मुली यशस्वी होत असल्याने समाधानही व्यक्त केले. अंजली भागवत यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कुणावरही विसंबून राहू नये,असा सल्ला महिलावर्गांना यावेळी दिला. तर कार्तिकी गायकवाड यांनी अजून मला यशाचे शिखर गाठायचे आहे, अशी भावना व्यक्त केली. अभिनेत्री माधवी मोरे यांनी घर असो की बाहेरचे जग ,महिलांना सदैव संघर्ष हा करावा लागत असला तरी त्या यशाची शिखरे पादाक्रांत करीत असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात आयोजक अध्यक्ष जयश्री बागुल म्हणाल्या कि महिलांना त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याला वाव मिळालाच पाहिजे. शिक्षण , तंत्रज्ञान , कला , समाज , संस्कृती , अर्थ आदी विविध क्षेत्रात स्त्री ही अग्रेसरच ठरली पाहिजे यासाठी महिला सक्षमीकरणाचा जागर हा झालाच पाहिजे, स्त्री शक्ती एकवटलीच पाहिजे. पुणे महिला नवरात्रौ महोत्सव हा सर्व महिलांनी एकत्र यावे, एकीचे दर्शन घडवावे आणि नवरात्रौ महोत्सवातून देवीची आराधना करताना हा महोत्सव महिलांच्या सुप्तगुणांना प्रोत्साहन देण्यामध्ये अग्रस्थानी राहिला आहे . या महोत्सवादरम्यान महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेमधील बक्षीसे ही वेगळी बाब असली तरी पाठीवरची थाप आत्मविश्वास नक्कीच वाढविणारी असते.यावेळी भाग्यलक्ष्मी स्पर्धेअंतर्गत होममिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन प्राजक्ता कोळपकर यांनी केले.