पुणे – सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण ४ हजार दत्तभक्त करणार आहेत. कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, अॅड.एन.डी.पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम, तेजसदादा तराणेकर आदी उपस्थित होते. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२० वे वर्ष असून प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे १२१ वे जयंती वर्ष आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तेजसदादा तराणेकर म्हणाले, ट्रस्टच्या यावर्षीच्या दत्तजयंती सप्ताहाची सुरुवात मंत्रपठणाने होणार आहे. यावेळी प.पू. बाबामहाराज तराणेकर, नगरसेवक हेमंत रासने तसेच दत्तमंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते म्हणाले, सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम असलेला यंदाचा गुरुमहात्म पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार, दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री गिरीष बापट, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
धार्मिक व सामाजिक क्षेत्रात श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर, सामाजिक सलोखा व युवा प्रेरणा स्थान म्हणून विश्वास नांगरे पाटील आणि वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ ह्रदयशल्य विशारद डॉ.रणजीत जगताप यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, सायंकाळी ५ वाजल्यापासून अशोक हांडे यांचा मराठी बाणा हा कार्यक्रम होणार आहे.
उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई म्हणाले, दत्तजयंती उत्सवाची सुरुवात बुधवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बुधवारी, सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांचा बहुरुपी भारुड हा कार्यक्रम होईल. यावेळी गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान समारंभ असून विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सह धर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे, बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवार, दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात १०१ महिलांद्वारे रुद्रपठण आणि विश्वस्त उल्हास व कल्याणी कदम यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक होणार आहे. तर, सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात नातं तुझं माझं हा हर्षित अभिराज यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते श्री गुरुमहात्म दिनदर्शिका प्रकाशन होईल. यावेळी पुणे महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि विरोधीपक्ष नेते चेतन तुपे उपस्थित राहणार आहेत. दत्तजयंती सोहळा व सप्तस्वरोत्सवाकरीता प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.