पुणे – प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो, या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे असे मत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, मातीकाम, ओरोगामी, सिरॅमिक आणि बारा बलुतेदारांच्या कौशल्यांना एका छताखाली कलात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने सेनापती बापट रस्त्यावर ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक दीपक मिसाळ, झागाच्या संचालिका तीर्था मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंडे पुढे म्हणाल्या, ‘झागा ही आगळीवेगळी कल्पना आहे. वेगवेगळ्या कलाकृतींना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांना त्यांची कला सादर करता येणार आहे, कला व कल्पकतेला वाव मिळणार आहे. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.’
तीर्था मिसाळ म्हणाल्या, ‘शास्त्रीय संगीतापासून पॉप संगीतापर्यंत, भरतनाट्यापासून आधुनिक बेली डान्सपर्यंत आणि पारंपरिक वाद्यांपासून आधुनिक वाद्याचे सादरीकरण या ठिकाणी अनुभवता येणार आहे. हौशी चित्रकार, शिल्पकार, मातीकाम, ओरोगामी, वारली, मधुबनी आदी कलाकारांना आणि बारा बलुतेदारांना प्रदर्शने भरविता येणार आहेत.’
आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘दिव्यांग व मतीमंद विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी विशेष संधी देण्यात येणार आहे. प्रदर्शने, सादरीकरण, प्रात्यक्षिके, कार्यशाळा, परिसंवाद, प्रशिक्षण आणि कौशल्यवर्धनाचे उपक‘मांंतून युवा व होतकरू कलाकारांना आपली कला समृध्द करता येणार आहे.’