प्रसंगात धावणारा पालीचा बल्लाळेश्वर

September 6th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

अमोलराजे बांदल-पाटील, रायगड

रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील पाली हे गाव प्रसिद्ध आहे ते बल्लाळेश्वराच्या मंदिरामुळे, अष्टविनायकांपैकी  एक असलेल्या या मंदिराला पौराणिक इतिहास तर आहेच शिवाय हे भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. बल्लाळेश्वराबाबत कृतयुगातील एक कथा सांगितली जाते.  गणेश पुराण उपासना खंड अध्याय २२ मध्ये “सिंधुदेशेडती विख्याता पल्लीनाम्ना भवत्पुरी” असा ”पाली” गावचा अर्थात पल्लीपुराचा उल्लेख सापडतो त्याच पल्लीपुरातील ही कथा बल्लाळेश्वराचे महत्व सांगते. पल्लीपुर नगरात कल्याणशेठ नावाचा एक वैश्यवाणी राहत होता. त्याला इंदुमती नावाची पतिव्रता पत्नी होती. ब-याच वर्षानंतर या दांपत्यास एक पुत्ररत्न झाले. त्याचे नाव बल्लाळ असे ठेवण्यात आले. दिवसेदिंवस बल्लाळ जसा मोठा होऊ लागला तसे त्याचे लक्ष देवभक्तीकडे व ईश्वरचिंतनाकडे लागले. गणेशभक्ती वाढू लागली. तो आपल्या मित्रमंडळीना घेऊन जंगलात जाई व पाषाणाची मुर्ती घेऊन त्याचे गणपती समजून भजन पूजन करीत असे. दररोज त्याच्या मित्रमंडळींना घरी परतण्यास उशीर होत असे हे पाहून त्यांच्या पालकांनी कल्याण शेठकडे तक्रार केली. `तुमचा बल्लाळ आमच्या मुलांना बिघडवीत आहे’. आधीच कल्याणशेठ बल्लाळ अभ्यासात लक्ष देत नाही म्हणून संतप्त होत असत. त्यातच ह्या पालकांच्या तक्रारी ऐकून त्यांचा राग अनावर झाला. क्रोधाने बेभान होऊन कल्याणशेठ ज्या ठिकाणी बल्लाळ मुलांना घेऊन रानात जात असे तेथे पोहोचले. त्यांनी बल्लाळाने मांडलेली पूजा उद्ध्वस्त केली. मांडवही मोडून टाकला. ध्यानाची पाषाण मुर्तीही फेकून दिली. कल्याणशेठजींच्या या अवताराने सर्व मुले घाबरली. परंतु ध्यानात मग्न असणा-या बल्लाळाला भक्तिरसात रममाण झाल्यामुळे या गोष्टीची जाणीवही झाली नाही. त्यामुळे शेठजी फारच संतापले. हातात एक मोठा सोटा घेऊन त्यांनी बल्लाळास बदडून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ होऊन मुर्च्छित पडला. त्याच अवस्थेत निर्दयी कल्याणशेटने बल्लाळास एका वृक्षाला बांधले व रागाने म्हणाले आता “येऊ दे तुझ्या गणेशाला तुला सोडवायला तोच तुला जेवू खाऊ घालेल” असे बोलून संतप्त कल्याणशेठ घरी निघून गेले.लहानगा बल्लाळ निर्जन अरण्यात झाडाला बांधलेल्या अवस्थेमध्ये निपचित पडून होता. त्याला हळूहळू शुद्ध येऊ लागली. असह्य वेदनांनी त्या बालकाचे शरीर ठणकत होते. त्याने गणेशाचा धावा करण्यास सुरूवात केली.बल्लाळाचा धावा श्री गणेशाने ऐकला श्री गणेश प्रसन्न झाले त्यांनी बल्लाळाला दर्शन दिले. बंध तुटले, तनु सुंदर झाली. बल्लाळाला श्री गणेशांनी वर दिला ‘वत्सा तू श्रेष्ठ भक्त आचार्य व दिर्घायुषी होशील.’ बल्लाळाला श्री गणेशांनी प्रेमाचे अलिंगन दिले. व त्यास म्हणाले बालका ज्याने तुझी पूजा उद्धवस्त केली तो या जन्मीच नव्हे तर अनंत जन्मी दु:ख व द्रारिद्रय भोगेल. बल्लाळ श्री गणेशाला म्हणाला,“ देवाधिदेवा, आपण याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावे व आपल्या दर्शनाने सर्व भक्तांच्या कामना पूर्ण व्हाव्यात.” श्री गणेश म्हणाले, ”तथास्तु”, मी येथेच ”बल्लाळ विनायक” नावाने कायमचे वास्तव्य करीन व असा वर देऊन श्री गजानन एका शिळेत अंतर्धान पावले. भक्त बल्लाळाने मागितलेल्या वराने श्री गणेशाने जेथे शिळेत ईश्वरस्वरूप धारण केले म्हणून ती शिळा आज ”श्री बल्लाळेश्वर” या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळेश्वराचे येथील  मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून सुमारे ११व्या शतकातील आहे. मंदिरा समोरील सभामंडप इ. स. १७०७ मध्ये श्रीमंत मोरोपंत फडणीसांनी बांधलेला आहे. हे प्राचिन असे ”श्री” कारी मंदिर आहे. या ठिकाणी पूर्वी लाकडाचे साधे देऊळ होते. मंदिर पूर्वाभिमूख आहे. देवालयात एक लहान व एक विस्तृत असे दोन गाभारे आहेत. आंतरगाभारा व पुढील गाभारा सहा बर्हिकोनी व दोन आंतरकोनी असा पायापासून घुमटांपर्यंत मिळून अष्टदिशा साधल्या आहे. घुमटाच्या बाजूस आठ पाकळ्यांच्या सुंदर कमळाचा आकार साधला आहे. बांधकाम आठ फुटी चिरेबंदी असे आहे. प्रत्येक चि-यामध्ये भक्कम असा शिशाचा रस ओतला आहे. देवालयाच्या भिंती अत्यंत मजबूत आहेत. प्रवेशाच्या बाजुला अप्रतिम कलाकृती करून दगडी गोळ्याची झालर असलेले मखर केलेले आहे. देवालयाच्या वरील बाजूस कळसाच्या तळाशी दगडी बांधकामाचे सज्जे आहेत त्यास सभोवती दगडी कमलाकार महिरप असून त्याला दगडाचे गोळे लावलेले आहेत. देवालयाचा कळस हा प्रेक्षणिय असून त्यामध्ये एक खोली आहे. त्यासमोर गच्ची आहे. कळसाचे बांधकाम चुना विटांचे असून चुना ज्या चाकाने मळला ते चाकही आपणास देवालयाच्या परिसरात पहावयास मिळते. चाक दीड फूट जाड व पाच फूट व्यासाचे आहे. देवालयाच्या सभोवताली सर्वत्र फरसबंदी आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देवालयाच्या पश्चिमेकडील बाजुस सुंदर अशी कमान तयार करण्यात आली आहे. बाह्य गाभा-याच्या पुढील भव्य सभामंडप पालीतील एक गणेशभक्त कै. कृष्णाजी नारायण रिंगे यांनी श्री बल्लाळेश्वराच्या दृष्टांताने प्रेरित होऊन इ. स. १९१० मध्ये १८,००० रूपये खर्च करून बांधला या संभामंडपात असणारे आठ पाषाणसदृश स्तंभ सुरूच्या लाकडापासून तयार केले आहेत. सभामंडपात दोन्ही बाजुला माडय़ा असून उजवीकडील माडी ही चौघडय़ाची माडी म्हणून ओळखली जाते.  पूर्वी येथे पहाट व सायंकाळी चौघडा वादन होत असे सभामंडपात दोन्ही बाजूस दोन सुंदर हत्तीची शिल्पे पाहावयास मिळतात व देवळातून तलावाच्या काठी प्रचंड घंटा असून श्रीमंत चिमाजी अप्पा यांनी ही घंटा वसईच्या लुटीतून आणून श्री बल्लळेश्वर चरणी अर्पण केली आहे असा इतिहास सांगितला जातो.  आतील गाभारा अष्टकोनी असून त्यात दगडी सिंहासनावर ३ फूट उंचीची बल्लाळेश्वराची पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची मुर्ती आहे. मुर्तीच्या डोळ्यांत व बेंबीत मनमोहक हिरे आहेत. सिंहासनाच्या मागील प्रभावळ चांदीची असून त्यावर रिद्धी सिद्धी चव-या ढाळीत उभ्या आहेत असे सुंदर कोरीव काम केलेले आहे. आतील गाभा-यात फक्त सोवळे नेसूनच प्रवेश दिला जातो. पहाटे पाच ते साडे अकरा या वेळेतच पूजा करणेस परवानगी आहे. संकष्टी चतुर्थीचे दिवशी भाविकांची फार गर्दी होत असल्यामुळे ही वेळ सकाळी ६ ते ९ अशी कमी करण्यात आली आहे. बाहेरील गाभा-यात चांदीने मढविलेली उंदराची मुर्ती हातात मोदक घेऊन बल्लाळेश्वराकडे पाहत आहे. बाह्य  उंदराच्या गाभा-यातून प्रवेश करतानाच्या  प्रवेशद्वारावर भालदार चोपदारांचे उत्तम चित्र बसविलेले दिसते. या गाभा-यात एक प्राचीन नगारा आपले लक्ष वेधून घेतो. सभामंडपाच्या बाहेर पूर्वेला आपणांस दोन मोठे तलाव दिसतात. त्यातील लहान तलावाला ”बल्लाळतीर्थ” असे संबोधण्यात येते. मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेले दगड याच तलावांतून काढलेले आहेत असे सांगण्यात येते तलावाच्या भोवती सुंदर सुशोभिकरण करण्यात आले आहे. दक्षिणायनाच्या उत्तरार्धात व उत्तरायणाच्या प्रारंभ काळात सुर्योदयी सूर्यकिरण श्री बल्लाळेश्वरांवर पडतात. श्री बल्लाळेश्वर मंदिर पहाटे ५ वा. दर्शनासाठी उघडले जाते व रात्री ठिक १०.३० वाजता बंद होते . प्रतिदिनी मंदिरात धुपारती, नित्यपूजा नैवेद्य, प्रत्येक चतुर्थीला सायंकाळी पालखी, कार्तिक महिन्यात काकड आरती दर एकादशीला स्थानिक मंडळाचे भजन सणावार रात्री देवाचे जागरण, गोकूळ अष्टमी उत्सव, माघी, भाद्रपदी उत्सवानिमित्त कीर्तन व लळीतानिमीत्त नाटक सादर केले जाते इ. कार्यक्रम होतात. भाविकांना पहाटे ५.०० ते सकाळी ११.३० पर्यंत सोवळ्याने आतील गाभा-यात जाऊन स्वहस्ते ट्रस्टमार्फत नेमलेल्या भिक्षूकांकरवी पूजा करता येते. व चतुर्थीच्या दिवशी फक्त सदर पूजा सकाळी ६.०० ते सकाळी ९.०० पर्यंतच करता येते. दर चतुर्थीला सायंकाळी पंचामृती स्नानानंतर पोषाख, नैवेद्य, आरती, श्रींची पालखी, मंत्रपुष्प असा क्रार्यक्रम होतो. श्री बल्लाळेश्वर मंदिरात परंपरेनुसार आषाढ शु. एकादशी ते कार्तिकशुद्ध एकादशी असे चार महिने विविध विषयांवर प्रवचन केले जाते. कार्तिक शुद्ध एकादशीला ग्रंथाची मिरवणूक होऊन प्रवचन समाप्ती होते.
आरती बल्लाळेश्वराची
जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वराआरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळाजयदेव जयदेव || ध्रु ||देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडीआत असे मुर्ती शेंदरी उघडीसमोर मोठी घंटा अन खांब लाकडीवर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी || १ ||जयदेव जयदेव || ध्रु ||देवा तुझा वास असे पाली गावीतव दर्शने माझी द्रुष्टी सुखावीमोदकांचा नैवेद्य मी तुजला दावीभक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी || २ ||जयदेव जयदेव || ध्रु ||पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असेमंदिर सुंदर मागे सरसगड वसेवर्णन म्या पामर करू कैसेसच्चा एक मुढ वंदन करीतसे || ३ ||जयदेव जयदेव || ध्रु ||

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions