विवेक ताम्हणकर
काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या या विशाल भारत देशाच्या सीमेचे आपण रक्षण कर्ते, आपल्याबद्दलचा अभिमान नेहमीच आमच्या मनात आहे. रक्षा बंधन हा सण साजरा करताना तुमची नेहमीच आठवण येते. आज तुम्ही सीमेवर जात-पात, धर्माच्या सीमा बाजूला ठेऊन केवळ एक सैनिक म्हणून देश रक्षणासाठी उभे आहात आणि म्हणूनच आम्ही सुरक्षित आहोत हे मान्य करावच लागेल. बंधुनो तसे आम्ही नेहमीच उभे असतो ते बस, रेल्वे अशा ठिकाणी आणि भांडतही असतो कि मला जागा मिळावी म्हणून. तुम्ही मात्र आम्हाला सुखाची झोप मिळावी म्हणून रात्र रात्र जागता पहारा देत असता. आपल्या बॉर्डर मध्ये घुसखोरी करणाऱ्या दुष्मनांना तुम्ही गोळ्या घालता आणि आपले कर्तव्य बजावता. आम्ही येता-जात खुलेआम सिग्नल तोडतो.पावलो पावली नियम पायदळी तुडवतो. आपल्या सीमेची एक इंच जागा शत्रू देशाच्या कब्जात जाऊ नये म्हणून आपण डोळ्यात तेल घालून, गोठवणाऱ्या बर्फात उभे रहात लक्ष देत असता, इथे मात्र गरीबाच्या जागाच हडपल्या जातात. काळ्या पैशाच्या आधारे काळा दहशतवाद पोसला जातोय. त्याला सडेतोड उत्तर तुम्ही देता. तुमची बंदूक सदैव तत्पर असते म्हणूनच हे विघातक लोक आमच्यापर्यंत पोहचत नाहीत. परंतु इथे मात्र काळ्या पैशाच्या बॅगाच लोकांच्या घरात सापडत आहेत. क्रिकेटच्या मैदानात बॅट गाजवणारे हिरो आहेत. तुम्ही तर युद्ध भूमी गाजवता याचा अभिमान बाळगणाऱ्या अनेक भगिनी या देशात आहेत. त्याच भगिनींचं मत मी माझ्या लेखणीतून मांडत आहे.
असो सारं काही हे असच चालायचं. यात एक मात्र खर आहे तुम्ही आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. आज सीमेवर चिनचा ड्रॅगन आग ओतण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान आपल्या कुरापती कमी करत नाही. हा सीमावाद माणसांच्या मनात ठासून भरलेला आहे. देश सीमेच्या कुंपणांनी बांधलेले असले तरी आपण सगळी माणसे आहोत हे यांना कधी कळणार माहित नाही. सीमावादाच्या या भांडणात जीव जातो तो तुमचा. या बदल्यात मिळत ते काय तर शहिद हे बिरुदावल आणि तिरंग्याचे कापड. तरीही माझ्या बंधुनो अनेक भगिनींचे हात तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या ऋणातून मुक्त होणे कधीही शक्य नाही. देशातल्या कोट्यवधी महिला भगिनी तुमच्या खड्या पहाऱ्यामुळेच सुखाने हिंडू फिरू शकतात हे नक्कीच मान्य करावे लागेल. आणि म्हणूनच आजच्या रक्षा बंधनाच्या सणादिवशी राखीवर खरा हक्क तुमचा आहे.
जाता जाता एकच म्हणेन
ये शूरवीर बहाद्दूरांनो
हे बंधन नाही, प्रेम आहे,
प्रेम आहे, तुमच्यावर विश्वास आहे,
विश्वास आहे, म्हणूनच आशा आहे,
आशा नाही, गर्वही आहे,
या देशातल्या बहिणींच्या राखीवर
माझ्या बंधुनो पहिला तुमचाच हक्क आहे.
तुम्हाला लाख लाख सलाम