पुणे – बांधकाम क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान व वस्तुमान संकल्पनात्मक गृहनिर्माण व परवडणारी घरे यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने, क्रेडाई महाराष्ट्राच्या सभासदांचा दिल्ली येथे अभ्यास दौरा संपन्न झाला. राज्यातील 19 शहरामधील एकूण 161 सभासदांनी यात सहभाग घेतला होता.
याविषयी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, या भेटीदरम्यान आशियाना ग्रुपचा खास ज्येष्ठ नागरिकांकरिता तयार करण्यात आलेल्या कन्फर्ट होम्स या प्रकल्पास क्रेडाईच्या सभासदांनी भेट दिली. याबरोबरच वस्तुमान संकल्पनात्मक गृहनिर्माण प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी भारत सिटी होम व प्री हॅब फॅक्टरी या प्रकल्पासोबतच परवडणारी घरांच्या माहितीसाठी सिग्नेचर ग्लोबल यांच्या बांधकाम प्रकल्पाला भेट देऊन तेथील तंत्रज्ञानाची व कामाची माहिती घेतली.
ते पुढे म्हणाले की, एखादी संकल्पना साकारताना प्राथमिक पातळीपासून कसे काम करावे याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने क्रेडाई सदस्यांना मिळाली. प्रकल्पाचे नियोजन करताना सुपरवायझरचा सहभाग,संपूर्ण कर्मचाऱ्यांची एकत्रित काम करण्याची पद्धत, याचा प्रकल्पावर व पर्यायाने बांधकाम क्षेत्रावर होणारा सकारात्मक परिणाम यांसारख्या बारकाव्यांचाही सदस्यांना अभ्यास करता आला. एटीएस यांच्या बांधकाम प्रकल्पाला दिलेल्या भेटी दरम्यान बांधकाम क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेता आली.
सिग्नेचर ग्लोबल यांच्या बांधकाम प्रकल्पाला भेट दिल्यावर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीविषयी सदस्यांना मायवन या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येईल. या तंत्रज्ञानाचा द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरातील प्रकल्पांना याचा फायदा होईल. दिल्लीमध्ये बांधकाम क्षेत्राला पुरविल्या जाणाऱ्या सरकारी पायाभूत सुविधांचा सकारात्मक परिणाम येथील बांधकाम विश्वावर झालेला दिसून आला. तसेच येथील विकसक निवासी कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून तसेच विकासकांकडून प्रकल्पांची देखभाल व्यावसायिकरित्या वर्षानुवर्षे केली जाते. त्यामुळेच 25 ते 30 वर्षे जुन्या झालेल्या इमारतीसुद्धा अगदी नव्यासारख्या दिसतात, असेही कटारिया यांनी सांगितले.
यावेळी आशियाना समूहाचे अध्यक्ष विशाल गुप्ता, एटीएसचे अध्यक्ष गीतांबर आनंद, भारत प्री हॅबचे अध्यक्ष एस पी सिंग, सिग्नेचर ग्लोबलचे अध्यक्ष प्रदीप अगरवाल यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी क्रेडाईच्या सदस्यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीचा सभासदांना त्यांचे पुढील प्रकल्प राबविताना भविष्यात फायदा होईल, असा विश्वासही कटारिया यांनी व्यक्त केला.