पुणे : घोडागाडी, बग्गीतून बाल चाचा नेहरुंनी विशेष मुलांना घडविलेली सफर… केक भरवून त्यांच्यासोबत घालविलेले आनंदाचे क्षण आणि आम्हीही चाचा नेहरुंचा आदर्श समोर ठेऊन देशासाठी चांगले काम करु, अशी प्रतिज्ञा घेत तब्बल ६० बाल चाचा नेहरुंनी विशेष मुलांसोबत आगळावेगळा बालोत्सव साजरा केला. बाल चाचा नेहरुंसोबतच छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, लोकमान्य टिळक यांच्या वेशातील मुलांनी देखील गुलाबाची फुले देऊन चिमुकल्यांचे स्वागत केले.
अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी विद्यालय (नू.म.वि.) मराठी शाळेच्यावतीने बालदिनाचे औचित्य साधून बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नागमोडे, सुनिता गजरमल, लीना घुगरे, सुनील वाघमारे, नितीन शेंडे, पुष्पा धात्रक, पीयुष शहा, सारिका पाटणकर, पूनम डोईफोडे, सेवासदन दिलासा केंद्राच्या सुचेता फासे आदी उपस्थित होते. सेवासदन दिलासा केंद्रातील विशेष मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेत, शाळेतील मुलांसोबत बालोत्सवात विविध खेळांचा आनंद लुटला.
आशा नागमोडे म्हणाल्या, आपल्या खाऊच्या पैशातून आणलेल्या वस्तू आणि खाऊ सेवासदन दिलासा केंद्रातील विशेष मुलांना देऊन त्यांच्यासोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी बालदिन साजरा केला. समाजातील विशेष घटकांना देखील सामान्यांप्रमाणे आनंद लुटता यावा, याकरीता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित नेहरुंचा आदर्श समोर ठेऊन लहानपणापासून देशासाठी चांगले कार्य करण्याकरीता मुलांनी सज्ज व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश होता.