पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त श्री ब्रह्मणस्पती मंदिर साकारण्यात आले आहे. ॠग्वेदामध्ये आणि मुद्गल पुराणात गणेशाचा ब्रह्मणस्पती म्हणून प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे देवांचे अधिपती असलेल्या गणरायाला विराजमान होण्याकरीता नागर, द्राविड आणि वेसर शैलीतील मंदिरांप्रमाणे गाणपत्य शैलीचे आगळेवेगळे मंदिर यंदा साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला शुक्रवार, दिनांक २५ आॅगस्ट रोजी सकाळी १०.०९ वाजता प.पू. पीरयोगी श्री गणेशनाथ महाराज, गोरक्षनाथ मठ, त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, डॉ. बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. शुक्रवारी (२५ आॅगस्ट) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. यंदाच्या ब्रह्मणस्पती मंदिराचा आकार १११ बाय ९० फूट असून ९० फूट उंची आहे. याशिवाय गोलाकार घुमटाखाली साकारलेला तब्बल ३६ फुटी नयनरम्य गाभारा हे वैशिष्टय असणार आहे. डेक्कन कॉलेजचे डॉ.श्रीकांत प्रधान आणि गाणपत्य प.पू.स्वानंद पुंड महाराज यांनी मुद्गल पुराणातून याविषयी शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे. त्याआधारे गणेशाची त्रिशूल, अंकुश, शंख, कमळ अशी अनेक आयुधे मंदिरावर लावण्यात आली आहेत. तर, हत्ती, मोर, गाय अशा विविध प्राण्यांच्या शिल्पांनी मंदिरातील खांब सजविण्यात आले आहेत. सभामंडपाच्या छतावरील काचेच्या झुंबरांच्यावर रेखाटण्यात आलेली ब्रह्मणस्पती आणि गणेश यंत्र हे खास आकर्षण असणार आहे. तब्बल १ लाख २५ हजार मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. तसेच अत्याधुनिक लाईटस् विद्युतरोषणाईकरीता लावण्यात आले आहेत. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.
गणेशोत्सवातील कार्यक्रमांबाबत बोलताना अशोक गोडसे म्हणाले, शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांसह भारतरत्न, खेलरत्न, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री यांना श्रीं च्या दर्शनाकरीता आमंत्रण देण्यात आले आहे. शनिवार, दिनांक २६ आॅगस्ट रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे २५ हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. तर, रात्री १० वाजता महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. दिनांक २६ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. अनंत चतुर्दशीला दिनांक ५ सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री धूम्रवर्ण रथातून निघणार आहे.
* गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमे-यांचा वॉच
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कॅम्प हद््दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे. यामध्ये अतिरेकी हल्ला वा दुर्घटना झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २५० लोकांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.
* बाप्पाला सुमारे ४० किलो सोन्याचे नाविन्यपूर्ण सुवर्णालंकार
भक्तांनी श्रीं चरणी प्रतिवर्षी अर्पण केलेल्या सोन्यातून भक्तांचे भाव जपण्याकरीता शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्यानिमित्ताने नाविन्यपूर्ण अलंकार घडविण्यात आले आहेत. आकर्षक नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह ८ ते १० हजार खडयांची सजावट असलेला ९.५ किलोचा मुकुट बाप्पासाठी साकारण्यात आला आहे. रत्नजडित खडयांनी नटविलेला ७०० ग्रॅमचा शुंडहार, सुर्यांच्या किरणांचा आभास निर्माण करणारे २ किलोचे कान, तब्बल ४ हजार सुवर्णटिकल्यांनी मीणाकाम करुन चंद्रकोराची आभास निर्मीती करणारा २.५ किलोचा अंगरखा बाप्पाला अर्पण करण्यात येणार आहे. याशिवाय कपडयावर खडेकाम असलेले ३.५ किलोचे उपरणे, ६.५ किलोचे सोवळे, पांढ-या खडयांचे कोंदण असलेला १ किलोचा हार असे दागिने साकारले आहेत. कपडयावर प्रथमच अशा प्रकारचे काम करण्यात आले आहे. याकरीता दाजीकाका गाडगीळ यांच्या पु.ना.गाडगीळ अँड सन्सचे महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक येथील निष्णात ४० कारागिर गेल्या ५ महिन्यांपासून कार्यरत आहेत. बाप्पासाठी साकारलेले सुमारे ४० किलोचे सुवर्णालंकार घडविण्याकरीता सौरभ गाडगीळ व पराग गाडगीळ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. याकरीता सुमारे १.२५ कोटी रुपये मजुरीचा खर्च न घेता त्यांनी बाप्पाचरणी ही सेवा अर्पण केली आहे.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्यानिमित्ताने ट्रस्टतर्फे सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धा, कबड्डी स्पर्धा यांसह गणेश बीजमंत्र सोहळा व दीड महिन्याचा श्री गणेश महायज्ञ धार्मिक सोहळा, चातुर्मासानिमित्त प.पू.बाबामहाराज सातारकर यांचे प्रवचन व सत्संग सांप्रदायातील अधिपती व्यक्तिंचा प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील विविध हॉस्पिटलसोबत ट्रस्टतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियान राबविण्यात आले. यामध्ये शेकडो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच कोंढव्यातील कुष्ठरोगी औद्योगिक केंद्राला ५ कोटी रुपयांची टप्याटप्याने मदत देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ, देहु ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर ५० लाख वृक्ष लावण्याच्या वृक्षसंवर्धन अभियानाला प्रारंभ झाला. तर, सांस्कृतिक महोत्सवात सलग ४३ दिवस देशभरातील दिग्गज कलाकारांनी आपली कला पुणेकरांसमोर सादर केली. प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या सुश्राव्य गायनाने या महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. तसेच देशासाठी प्राण्यांची आहुती देणा-या सैनिकांच्या १२५ वीरमाता, पिता व पत्नींचा शौर्य गौरव सन्मान सोहळा आयोजित करुन त्यांना आर्थिक मदत देखील देण्यात आली.