पुणे : “दलित चळवळीतील कार्यकर्त्यांचे दहशतवादी, नक्षलवादी यांच्याशी संबंध असल्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्यासारख्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्यांच्या अशा वक्तव्यामुळेच राज्यातील अनेक दलित समाजातील पदाधिकारी भाजपाला सोडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये येत आहेत. सर्व एकत्रित येऊन अशा प्रकारची सामाजिक भावना दुखावणारी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवू,” असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) उद्योग सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम यांनी मंगळवारी दिला.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विद्यमान सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मेश्राम यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, जालना जिल्हाध्यक्ष आकाश पाजगे, प्रवक्ते अमित भालेराव, ब्रह्मेश ब्रह्मराक्षे, हेमराज चौधरी, गोपाळ रोकडे, धरमवीर शर्मा, नागेश रेवाले, नागेश अवचार, बबलू यादव, राहुल अवचार, संदीप कुयड यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश करीत अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे. विद्यमान, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपाला सोडचिट्टी दिली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा झाला होता. भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनीही यावेळी आरपीआयमध्ये प्रवेश केला.
जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील बाजारवायगावचे उपसरपंच सुरेश अडसूळ, सदस्य दीपक अडसूळ, संगीत अडसूळ, देवपिंपळगावचे उपसरपंच शाम आठवले, सखुबाई घोरपडे, लीलाबाई वाहूक, निधोना गावाचे सरपंच दीपक आदमाने, शंकर हिवराळे, बापूराव आदमाने, गणेश आदमाने, झाल्टा गावाच्या छबाबाई नाडे, मेधाबाई पडूळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला.
अमित मेश्राम म्हणाले,”केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षबांधणीचे काम सुरु आहे. येत्या काळात पक्षाला स्वतंत्र चिन्ह मिळविण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहोत.उद्योग सेलच्या माध्यमातून तरुणांना रोजगार, व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.”