कोकण किनारपट्टीचा आर्थिक कणा असलेला मत्स्य व्यवसाय सध्या अडचणीत सापडलाय. वाढते प्रदूषण, नष्ट होणाऱ्या काही माशांच्या प्रजाती, घटलेलं उत्पादन, शीतगृहांची कमतरता आणि सरकारी उदासीनता याचा फटका मत्स्य व्यवसायाला बसलाय. कोकणातील एकूण लोकंसख्येच्या ५० टक्के लोकजीवनाशी निगडित असलेल्या या व्यवसायाच्या वाढीसाठी अनेक घोषणा झाल्या खऱ्या, मात्र अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. परिणामी एकूण कोकणाच्या अर्थव्यवस्थेलाच सुरुंग लागलाय.
मत्स्य आगार चिंतेत
रायगड जिल्ह्यात जवळपास ३० हजार लोक मासेमारीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात पाच हजारांच्या जवळपास बोटी आहेत. यामध्ये एक हजार ४९९ बिगर यांत्रिकी, तर तीन हजार ४४४ यांत्रिकी नौका आहेत. जिल्ह्यात दरवर्षी मासेमारी हंगामात ३९ हजार टन मत्स्य उत्पादन घेतलं जातं. यातील ३० टक्के मासे युरोप, जपानसारख्या देशात निर्यात केली जाते. जिल्ह्यात पापलेट, झिंगा, सुरमई, माकुल या माशांचं उत्पादन घेतलं जात.
औद्योगिकीकरणाचा फटका
कोकण किनारपट्टीवर अर्थात अलिबागमध्ये जेएनपिटी, ओएनजीसी, इस्पात, आरसीएफसारखे मोठे प्रकल्प जिल्ह्यात सुरू झालेले आहेत. अनेक रासायनिक कंपन्यांतून होणाऱ्या प्रदूषणामुळे नदी आणि खाडी पट्ट्यांमध्ये प्रदूषणाची समस्या निर्माण झालीय. त्याचा परिणाम थेट मत्स्य उत्पादनावर होतोय.
मत्स्य उत्पादनावरील परिणाम
या प्रकल्पांमुळं गेल्या काही वर्षांत रायगड जिल्ह्यात मासेमारी उत्पादन घटत चाललंय. माशांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहत. जिताडे, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड या माशांचं उत्पादन कमी झालंय. शेवंड या दर्जेदार मासळीचं वार्षिक उत्पादन गेल्या काही वर्षांत३९ टनांवरून १४ टनांवर आलंय. मासेमारीत घट होण्याच्या अन्य कारणांमध्ये प्रजनन क्षेत्रात होणारी घट, जादा मासेमारी, तिवरांची कत्तल यासुद्धा प्रमुख बाबी आहेत.
सरकारची उदासीनता
मत्स्य उत्पादनवाढीसाठी कोकणात दर्जेदार बंदरांचा विकास होणं गरजेचं आहे. मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणारा एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही. शीतगृह, मत्स्य प्रक्रिया केंद्र सुररू होऊ शकलेलं नाही. कोकणातल्या इतर दोन जिल्ह्यांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही.
मत्स्य व्यवसायात सुधारणा झाल्यास कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना तर मिळेलच. याशिवाय देशाला या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळू शकतं. पण हे लक्षात कोण घेतं?
रायगड जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय
एकूण नौका- ४९४३
बिगरयांत्रिकी नौका- १४९९
मासेमारीवर अवलंबून लोकसंख्या- ३० हजार
वार्षिक मत्स्य उत्पादन- ३९ हजार टन
एकूण उत्पादनापैकी निर्यात – ३० टक्के
निर्यातीचा वाटा- ६ कोटी रुपये
वार्षिक उत्पन्न- १९ कोटी रुपये
प्रमुख उत्पादन- झिंगा, पापलेट, सुरमई, माकुल
नष्ट होत चाललेल्या जाती- जिताडे, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड
जिल्ह्यात एकही शीतगृह किंवा मत्स्य प्रक्रिया सेंटर नाही.
मत्स्य व्यवसाय संकटात, रायगडात मत्स्य आगार चिंतेत
Team TNV August 17th, 2017 Posted In: येवा कोकणात
Team TNV