पुणे – ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर झाला असून बुधवारी 27 रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक, अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी साडे पाच वाजता पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या कार्यक्रमात महर्षी पुरस्काराने डॉ. श्रीराम लागू यांना सन्मानित करण्यात येणार आहे.तर सिंघमफेम आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भीमराव पाटील [ झहीराबाद,तेलंगणा ], माजी आमदार उल्हास पवार, वास्तु विशारद महेश नामपूरकर, माजीआमदार मोहन जोशी हे उपस्थित राहणार आहेत.
कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा दिमाखदार 23वे वर्ष साजरे करीत आहे. याअंतर्गत सामाजिक ,धार्मिक , सांस्कृतिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना दरवर्षी महर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाते. यापूर्वी भारतरत्न पं. भीमसेन जोशी, डॉ. रघुनाथ माशेलकर, ह.भ. प. बाबा महाराज सातारकर ,किशोरी आमोणकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. विजय भटकर, लीला पुनावाला यांच्यासह दिग्गज मान्यवरांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, असेही आबा बागुल यांनी सांगितले.