महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुंबई येथे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीवारीसाठी राणेंच पुढचं पाऊल म्हणून याकडे पाहिलं जात आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर राणे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. हा पक्ष भाजपा सोबत असल्याची घोषणा राणे यांनी केली होती. राज्यात राणे याना मंत्री पॅड दिले जाणार असल्याचेही भाजपाने जाहीर केले होते. मात्र सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेने राणे याना मंत्री केल्यास सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिल्याने भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने राणे याना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला.
आज उमेदवारी अर्ज दाखल करताना राणे यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश बापट, आमदार राज पुरोहित,माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपची दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. राणेंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, रणजित देसाई, आनंद शिरवलकर, विशाल परब यांच्यासह सिंधुदुर्गातील पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.