माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव..

September 6th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

नितीन साळुंखे (९३२१८११०९१)

 

(माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय. माझ्या बालपणी मी अनुभवलेल्या गोष्टी व मी तेंव्हा त्यांचा लावलेला तेंव्हाच अर्थ जशाचा तसा दिलाय. म्हणून तो कदाचित आताच्या माझ्या आणि तुमच्याही आताच्या ‘समजे’शी जुळेल असं नाही. लेखाचा समारोप मात्र आताच्या परिस्थितीचा संदर्भ देऊन केलाय. हे सारं लक्षात ठेवून हा लेख वाचावा. ह्याच परिसरात लहानाचं मोठं झालेल्या व्यक्तींचा त्याच गणेशोत्सवांचा अनुभव माझ्यासारखाच असला तरी त्यांच्या त्यावेळच्या आकलनानुसार त्याच्या अर्थात फरक पडू शकतो. हे इतिहास लेखन नाही, तर आठवणी आहेत आणि त्या वयाचा होऊन लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. शब्द आताचे असले, तरी भावना त्या लहान वयातलीच आहे.)

 

तेंव्हा-

 

मध्य मुंबईचा लालबाग भाग हा नेहेमीच उत्सवी राहीलाय. किंबहुना उत्साह आणि उत्सव याचं दुसर नांव म्हणजे लालबाग, असं म्हणायलाही हरकत नाही. नेहेमीच्या जीवनात बारश्यापासून ते मयतापर्यंत लालबागकरांचा हा उत्साह सारखाच असतो आणि सणांमध्ये तर हा पार फसफसून उफाळून येतो. हा भाग म्हणजे गिरणगाव समजल्या जाणाऱ्या भागाचं धडधडत हृदयच जणू..!

 

कोणत्याही आकर्षक स्त्रीकडे माणसं आकर्षित हेतातच, तसं देशभरातून लोक मुंबैकडे आकर्षित झाले, ते मुंबईच्या दोन ‘हिरॉइन्स’मुळे. एक रेल्वे आणि दुसरी कापडाची गिरण. साधारणत: पश्चिम/मध्य रेल्वेवरील दादर टि.टी. आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते साधारण माजगांव-भायखळ्यापर्यंतच्या औरस-चौरस विभागाला गिरणगांव म्हणत आणि याच्या हृदयस्थानी वसलंय लालबाग.

 

गिरणगांवातील गिरण्या आणि त्यात तिन पाळ्यांमधे काम करणारे गिरणी कामगार यांच्या वस्तीचा लालबाग हा मध्यवर्ती भाग कायम जागता आणि धगधगता असायचा. कामगारबहुल भाग असल्यामुळे गिरण्यांचे तिन्ही त्रिकाळ वाजणारे भोंगे, त्या भोंग्यानुसार  हातात जेवणाचे उभट डबे घेऊन गिरण्यांच्या दिशेने घोळक्याने निघालेले कामगार, कामगारांचे पगारवाढ, बोनस यासाठी संप, लढे, मोर्चे यामुळे हा भाग सतत जिवंत आणि धगधगता असायचा. या भागावर त्यावेळी कामगारांसाठी लढणाऱ्या ‘लाल’भाई कम्युनिस्टांच वर्चस्व असल्याने, हा भाग ‘लाल’बाग म्हणून ओळखला जाऊ लागला की काय कोण जाणे..! खर तर हे नाव ‘लालबाग’ ऐवजी ‘लालभाग’ किंवा ‘लालआग’ असं काहीतरी असायला हवं होतं असं मला सारखं वाटतं, कारण ते लालबागच्या स्वभावाशी जास्त मिळत जुळत वाटतं.

 

मध्य रेल्वेवरच्या करी रोड आणि चिंचपोकळी या स्थानकांच्यामध्ये असलेल्या, पूर्वेकडील भागाला लालबाग म्हणतात. हा भाग चिंचपोकळी स्टेशनला अधिक नजीक. या भागाला लालबाग म्हणतात तरी या परिसराच्या स्टेशनला चिंचपोकळी नांव का दिल, हा प्रश्न मला तेंव्हाही पडायचा आणि आजही पडतो. लालबागची लोकवस्तीत कोकणी माणसांचा टक्का बराच मोठा, तर पश्चिमेला, आताच्या ना. म. जोशी मार्गाच्या दुतर्फा, बहुतकरून सातारा, सांगली, कोल्हापूर इत्यादी घाटावरच्या लोकांची वस्ती. महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या प्रांतांमधला हा फरक मला त्या नकळत्या वयातही सहज लक्षात यायचा तो वेषावरून. घाटावरचे रांगडे गडी कायम पांढरा लेंगा, पांढरा सदरा आणि टोपी आणि गिरणीत कामावर जाताना खाकी हाफ पँट या वेषात, तर तसा वेष नसलेले कोकणी, इतकी साधी सरळ दृश्य विभागणी होती. त्याकाळी प्रांतवाद हा राजकारणाचा भाग नसल्याने घाटावरच्याला घाटी आणि कोकणातल्याला कोकणी असं म्हटलं तरी कुणाला राग वैगेरे यायचा नाही.

 

गिरण्यांमधे तिन पाळ्यांत राबणारा कोकणी असो वा घाटी, ह्या माणसांत असणारी गरीबी हा समान धागा असायचा. गरिबीची व्याख्या श्रीमंती ठरवते आणि त्याकाळी केवळ टाटा-बिर्लाच श्रीमंत असल्याने, उरलेले ते सर्व गरिबीच्या समान पातळीवर असायचे. तेंव्हा पैसा हे फक्त विनिमयाच साधन होतं,  मिरवायचं नाही आणि म्हणून माणूस माणसाला माणसासारखं वागवायचा. हे तेंव्हा कळत नसलं तरी, आता मात्र प्रकर्षानं जाणवतं. प्रत्येकाचंच स्वत:चं मोठं कुटुंब. हम दो, हमारे दो वैगेरे तेंव्हा कुणाला कुणी सांगीतलं असतं, तर एकतर त्याला वेड्यात काढलं असतं किंवा मग नवऱ्याची दोन आणि बायकोची दोन असा त्याचा अर्थ लावला असता आणि तो पुढच्या विस्ताराच्या तयारीला लागला असता. घरची स्वतःची मोठी मनुष्य संपदा, त्यात गांवावरून शिकायला/ नोकरीला आलेले आणि दोनचार भाचे-पुतणे असा सारा संसार त्या १० बाय १० किंवा १२ बाय  १२च्या खोलीत समाधानाने नांदत असायचा. नांदत असायचा म्हणजे, अर्धा खोलीत, काही बाहेर गॅलरीत, तर काही झोपायला थेट फुटपाथवर. फुटपाथवर झोपणं तेंव्हा आम बात होती, त्यात कोणाला काही गैर वाटायचं नाही, ते बंद झालं ते रामन राघवने फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या केलेल्या हत्याकांडानंतर.

 

अश्या या सदा उत्साही आणि आनंदी लालबागचं खरं स्वरूप सामोरं यायचं ते कोणत्याही उत्सवाच्या निमित्ताने. त्यातही श्रावण ते कार्तिक असे चार महिने तर लालबागच्या उत्साहाला उधाण आलेलं असायचं. गटारी अमावास्येच्या आसपास लालबाग मार्केट तऱ्हे तऱ्हेच्या हिरव्यागार भाज्यांनी फुलून जायचं. पावसाळा असल्याने हे तसेही नेहेमी दिसणारे दृश्य, पण श्रावण आल्याची वर्दी द्यायची, ती बाजारात भाज्यांच्या गर्दीत मोठ्या संख्येने दिसू लागणारी केळीची हिरवी-पोपटी पानं. लालबाग मार्केट केळीच्या पानांनी भरलेलं दिसलं, की सण सुरु झाल्याचा सुवास मनात भरू लागायचा. सणांचे दिवस काही वेगळेच असतात, हे मला तेंव्हाही जाणवायचं अन् आताही जाणवतं. श्रावण आला, की वर्षभर दाबून ठेवलेल्या कोकणी माणसाच्या उत्साहाला केळीची पानं हिरवा सिग्नल द्यायची आणि गिरणगांवातील कोकण्यांच्या उत्साहाची गाडी सुसाट सुटायची.

 

नागपंचमी हा सण, पुढे तुळशीच्या लग्नापर्यंत दर आठ-पंधरा दिवसांनी येणाऱ्या कोणत्या न कोणत्या सणांच्या मालिकेतला पहिला सण. हा सण असतो हे आताच्या फ्लॅटाळलेल्या पिढीला समजणार नाही आणि समजलं तरी त्यात साजरा करण्या एवढं काय असतं, हे कळणार नाही, पण तेंव्हा हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. मग येणारं रक्षाबंधन, दहीहंडी ते पार दसरा-दिवाळी-तुळशीच्या लग्नापर्यंत पर्यंत दर आठ-पंधरा दिवसांनी कोणता न कोणता तरी सण यायचाच आणि लालबागला तो सारख्याच उत्साहाने साजरा केला जायचा;आणि या सणांचा राजा असायचा तो गणेशोत्सव..! एकूणच कोकणी माणसाला दिवाळी ही सणांची राणी वैगेरे काही वाटत नसे, आजही वाटत नाही. सणांचा राजा गणपतीच..!!

 

बाजारात केळीची पान आणि दुकानात सजावटीच्या शोभेच्या वस्तु, रंगीबेरंगी पडदे, मखर, पताका दिसू लागल्या, की गणपती मुंबैला यायला निघाले अस मला त्या काळी कळायचं. जस जशी गणेश चतुर्थी जवळ येईल, तस तसं बाजारातील गर्दीला उधाण येऊ लागायचं. बाजार, दुकान, रस्ते गर्दीने फुलून जायचे. घराघरात खोबरं-गुळाच्या करंज्या तळत असल्याचा खमंग सुवास दरवळायला लागायचा, गणपतीच्या स्वागतासाठी गांवी पळण्यासाठी यश्टीच्या रिझर्वेशनची धांदल उडायची. कोकणी माणूस एकवेळ पर्मनंट नोकरीला लाथ मारेल, पण गणपतीला गांवी कोकणात जाणार म्हणजे जाणारचं. हा बाणा कोकण्यांनी अजूनही जीवापाड जपलाय. तेंव्हा यश्टीचं रिझर्वेशन मिळणं म्हणजे आतासारखं सोपं नव्हतं. परळ, मुंबै सेंन्ट्रल डेपोत रात्रभर लाईन लावावी लागायची, तेंव्हा कुठे तिकीटं हाती यायची. ती तिकीटं मिळाल्याचा आनंद, प्रत्यक्ष गणपती प्रसन्न होण्यापेक्षा कमी नसायचा.

 

माझ्या लहानपणचा गणपती हा बहुतकरून घरगुतीच असायचा. बहुसंख्य लोकांचा गणपती गांवीच असायचा तर काहींचाचं मुंबईत. ज्यांच्या गांवीही गणपती नाही व मुंबईतही नाही, असे लोक मग सार्वजनिक गणेशोत्सवात आपला गणपती साजरा करायचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे तेंव्हापासूनच लालबागची ओळख बनली होती. आमच्या घरी गणपती बसत नसल्यानं, सार्वजनिक गणपतीच मला माझा वाटायचा, तो अजूनही मला तसाच वाटतो.

 

लालबाग तेंव्हाही सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ओळखलं जायचं पण ती ओळख मर्यादीत होती. त्यावेळच्या गणेशोत्सवाचा आतासारखा बाजार झाला नव्हता. तेंव्हा श्रद्धा, सामाजिक जाणीव महत्वाची होती. लहानपणी लालबागचे गणपती बघायला जाणं हा माझ्यासाठी आनंदाचा सोहळा असायचा. आई, मावश्या, सोबत एखादा मामा घेऊन आम्ही गणपती पाहायला रात्री जेवून खावून निघायचो. उत्तरेकडचं करी रोड ते चिंचपोकळी आणि चिंचपोकळीच्या दक्षिणेस राणीच्या बागेपर्यंतचे गणपती पाहून आम्ही मध्यरात्री परत घरी, असा साधारण कार्यक्रम असायचा. लालबागचा भौगोलिक विस्तार तेंव्हा एवढाच होता आणि आताही तेवढाच आहे, मात्र मंडळांची संख्या आता काहीशी वाढलेली आहे. गणपती पाहायला येणाऱ्याची गर्दी तेंव्हाही असायची पण आता एवढा गर्दीचा महापूर तेंव्हा नव्हता. तेंव्हाची गर्दी सुखद वाटायची आता मात्र गिळून टाकणारी वाटते. मुंबईची लोकसंख्याही त्याकाळी कमीच होती आणि वाहतुकीची साधनंही मर्यादित, त्यामुळे गर्दीला आपोआप मर्यादा येत असे.

 

आतासारखे गणपती तेंव्हा मंडपाच्या जाड ताडपत्रीआड लपवलेले नसायचे. गणपतीच्या मांडवाची पुढची बाजू उघडीच असल्याने (काही गणपतींची अजुनही असते), लांबूनही गणपती सहज दिसायचे. त्यामुळे फार मोठी लाईन वैगेरे भानगड नसायची. लालबागच्या चाळीत राहणारी गिरणी कामगारांची कुटुंब कायम उघडया दरवाजाच्या घरात राहायची. खाजगीपणा, प्रायव्हसी वैगेरे मानसांना बेटं बनवणारे शब्द तेंव्हा कोणाच्या खिजगणतीतही नसायचे. राहण्याचा अन् वागण्याचाही असा खुल्लम खुल्ला माहौल, सार्वजनिक ठिकाणी वा उत्सवाच्या निमित्ताने प्रतिबिंबित व्हायचा असं आता मला वाटत. तेंव्हाचं काय किंवा आताचं काय, कोणतंही सार्वजनिक कार्य, ते साजरं करणाऱ्या लोकांच्या खाजगी जीवनाचं प्रतीबिंबं असतं, असं माझ्या लक्षात आलंय.

 

त्यावेळी आता सारखा गणपती एकटाच मांडवात बसलेला किंवा उभा नसायचा, तर त्याच्या सोबतीला एखादं पुराणातलं दृष्य, चालु घडामोडी, सामाजिक प्रश्न यांवर भाष्य करणारे हलते-चालते पुतळे असायचे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य तेंव्हा ताज ताज असल्याने, गांधी, नेहरू, सुभाषबाबू वैगेरे नेत्यांचे पुतळे कोणत्या न कोणत्या मंडळाच्या गणपतीच्या मांडवात गणपतीच्या सोबतीने उभे असलेले पाहायला मिळायचे. कधी कधी तर गणपतीच या नेत्यांच्या अवतारात हटकून पाहायला मिळायचा आणि गंम्मत म्हणजे, तेंव्हा असं केलं म्हणून कुणाच्या भावना वैगेरे नाजूक चिजा अजिबात दुखावायच्या नाहीत, उलट त्यात एक कौतुकच असायचं.  लालबागचे गणपती पाहायला लोक यायचे असं म्हटलं, तरी लोक ते गणपती पाहण्यापेक्षा ती चित्र, ती दृश्य  पाहण्यासाठी जास्त यायचे. माझ्या लहानपणातल्या लालबागचा गणपती आपल्याएवढाच, माणसाच्या उंची रुंदीचा असायचा, आता सारखं अंगावर येणारं विराट (की विक्राळ?) स्वरुप तेंव्हाच्या गणपतीनं घेतलेलं नव्हतं. पापं वाढली की परमेश्वर विराट स्वरूप दाखवतो, असं कुठंतरी पुराणकथांत वाचलं होतं, ते खरच असावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे सध्या, हे मात्र खरं..!

 

गणपती पाहण्यासाठी लालबागला मामाकडे दोन-तिन दिवस राहायला जाण्याची मी वर्षभर वाट पाहत असे. त्यात गणपतीपेक्षा, गणपतीनिमित्ताने भरणारी जत्रा, त्यातील विविध खेळ, खाऊ-खेळणी यांचीच ओढ जास्त असायची. गणपती हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव असायचा त्या काळी. लालबागच्या गणपतींचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे, गणपतीच्या निमित्ताने तिथं भरणारी चित्र प्रदर्शनं. इथं चित्र म्हणजे पुतळे. ही प्रदर्शनं एखाद्या पुराणातल्या किंवा इसापनितीतल्या बोधकथेवर आधारित असत. यात स्टेज खालील, डोळ्यांना दिसू नये अशा पद्धतीने बसवलेल्या यांत्रिक करामतीने, पुतळ्यांची माणसासारखी कथेनुसार हालचाल केलेली असे. यांत्रिक करामत वैगेरे शब्द नंतर कळले, परंतु लहानपणी हे सारं गूढ आणि जादुई वाटायचं. आमच्या ‘अनंत निवास’ बिल्डींगच्या (गणेश टाॅकीजला अगदी लागून असलेली चार मजली इमारत) अगदी दारात असलेल्या गणेशोत्सवात, कांबळी आणि फाटक (दोघंही कोकणीच) या मुर्तिकारांची अशी हलती चित्र प्रदर्शनं भरत. असंच प्रदर्शन पेरूच्या चाळीच्या गणपतीतही भरायचं. ह्या प्रदर्शनात तिकीट लावून प्रवेश असायचा आणि तिथे घेऊन जाण्यासाठी मी आईकडे हट्ट करत असे किंवा लाडीगोडी लावत असे, हे मला लख्खं आठवतं. ती प्रदर्शनंही अजून चांगलीच आठवतात. त्या प्रदर्शनांनी माझं बालपण समृद्ध केलं हे मात्र खर. ती समृद्धी मला अजुनही भरभरून देतेय.

 

लालबागचा गणपती म्हटलं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर चटकन उभा राहातो, तो म्हणजे चिंचपोकळी स्टेशनच्या पुलाखालील ‘चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव’चा गणपती. हा गणपती सध्या ‘चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे मंडळही लालबागचे जुने (बहुतेक सर्वात) गणेशोत्सव मंडळ आणि हे मंडळ सुरुवातीपासूनच त्याच्या सामाजिक बांधिलकी माणून कार्या करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आजही या मंडळाने तो वारसा आणि उत्सवातील पवित्रता जपलेली दिसते. हा माझ्या घरचा गणपती. घराचा अशासाठी साठी, कि या मंडळाशी माझा मामा संबंधित होता, अजूनही आहे. या गणपतीला एक दिवस नैवेद्य दाखवून त्याचा आशीर्वाद घ्यायची माझ्या आईची प्रथा गेली ५५ वर्ष अबाधित सुरू आहे.

 

त्यानंतर आमच्या बिल्डींगच्या समोरच असलेला कांबळी आणि फाटक यांचे सार्वजनिक गणपती. हे गणपती, गणपतीपेक्षा त्यांच्या हलत्या चित्र प्रदर्शनासाठी प्रसिद्ध होते. त्यानंतरचा गणपती आठवतो, तो लालबाग मार्केट समोरच्या पेरूच्या चाळीतील गणपती. हा गणपतीही प्रदर्शनासाठी मला आवडायचा. पुढे तेजुकाया मँन्शनचा देखणा गणपती. हा गणपती आजही त्याच्या देखणेपणासाठी प्रसिद्ध आहे. तेजुकायाच्या पुढे करी रोडच्या पुलाखालील गणपती. हा मला तितकासा स्पष्ट आठवत नाही.

 

तेजुकायाच्या समोरच गणेश गल्लीचा गणपती, नंतर हिरामण मार्केटचा गणपती, त्यानंतर लालबाग मार्केटचा गणपती, पुढे रंगारी बदक चाळीचा गणपती आणि त्याच्याही पुढे जयहिंद सिनेमाचा गणपती, एवढे गणपती म्हणजे माझ्या तेंव्हाच्या मते लालबागचे गणपती. हे सारे गणपती एखाद्या रात्री बघायचे, एखाद प्रदर्शन पहायचं, आई-मामाला मस्का मारून एखाद खेळणं पदरात पाडून घ्यायचं, दत्ताराम लाड मार्गावरील जत्रेत मृत्यूगोलातील मोटारसायकलचा खेळ श्वास रोखून पहायचा आणि एखादी कुल्फी खाऊन अतीव आनंदात घरी येऊन झोपून जायचं हा आणि एवढाच गणेशोत्सव माझ्या मनात असायचा. माझ्या मनातली गणेशोत्सवाची कल्पना आजही तिच आहे.

 

श्रद्धा, भक्ती, दर्शन वैगेरे कठिण शब्द तेंव्हा आसपासही नव्हते आणि म्हणून कदाचित  लहानपणातले गणपती आनंद घेऊन यायचे अस मला आता समजत्या वयात वाटत. पाहाणं सहज असतं, दर्शन म्हटलं की मग इतर व्यवधानं आपोआप येतात. तेंव्हा पाहाणं असायचं, आता दर्शन घेणं..!!

 

लालबाग आणि सार्वजनिक गणपती याचं नातं पार अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासूनचं असलं तरी, त्याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली, ती गणेश गल्लीच्या गणपतीपासून. या मंडळाने पंचवीस-एक वर्षांपूर्वी, मला आठवत, २२ की २३ फुट उंचीची गणपतीची मूर्ती बसवली आणि लालबाग सर्व देशभरात मशहूर व्हायला सुरुवात झाली. तेंव्हा लालबागचा गणपती म्हणजे गणेशगल्लीचा गणपती अस समीकरण रूढ होऊ लागलं आणि हा गणपती पाहायला उभ्या देशातून हवशे नवशे गवशे येऊ लागले, गर्दी वाढू लागली आणि हळू हळू लालबागचे प्रसिद्ध गणपती सुप्रसिद्ध होऊ लागले. गणेश गल्लीचा गणपती पहायला येणारे, मग आजूबाजूचेही गणपती पहायला गर्दी करू लागले आणि मग लालबाग आणि सार्वजनिक गणपती आणि गर्दी याचं नात दृढ होऊ लागल. पुढे काही वर्ष गणेश गल्लीच्या गणपतीची उंची गाजत राहिली आणि मग मुंबईतल्या इतर मंडळांनीही त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली आणि मूर्तीची उंची ही सामान्य बाब झाली आणि उंचीचं कौतुक ओसरलं. इथून पुढे मंडपात उघड्यावर असलेल्या मूर्ती जाड पडद्याआड बंदिस्त व्हायला लागल्या आणि मंडपांच्या समोर लांब रांगा लागायला सुरुवात झाली. इथेच गणपती ‘पाहणे’ संपून ‘दर्शन घेणे’ संज्ञा रूढ होऊ लागली. गणेश गल्लीच्या गणपतीच (गणेशगल्लीचा गणपती हल्ली ‘मुंबईचा राजा’ नांवाने ओळखला जातो.) कौतुक कमी झालं आणि मग अवतरला ‘लालबागचा राजा’. हा मात्र अजूनही आपल नांव आणि महाम्य टिकवून आहे. गणेशगल्लीचा गणपती

 

सध्या ‘लालबागचा राजा’ नांवाने सुप्रसिद्ध असणारा गणपती माझ्या लहानपणी लालबाग मार्केटचा गणपती म्हणून ओळखला जायचा. काही जुने लोक याला कोळणींचा गणपती म्हणूनही ओळखायचे. हा गणपती आता एक बडं प्रस्थ झालाय. ह्याच्या दर्शनाला देशभरातील मंत्री, उच्च सरकारी अधिकारी, चित्रपट-खेळातील बडी प्रस्थं आणि पार सातासमुद्रा पलीकडूनही लोक येतात. या व वर उल्लेख केलेल्या गणपतींचा इतिहासही तेवढाच रंजक आहे परंतू तो त्या त्या मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याने इथं दिलेला नाही. शिवाय या माझ्या लहानपणीच्या आठवणी असल्याने आणि लहानपण नेहेमी वर्तमानातच जगत असल्यानं, तेंव्हा इतिहास आणि भविष्य आसपासही नसायचे.

 

..आणि आता-

 

लालबागचे गणपती जसे देशभरात प्रसिद्ध होऊ लागले, तशी गर्दी वाढली आणि त्या गर्दीत लपलेला पैसा चलाख कार्यकर्त्यांच्या लक्षात आला, तसा गणपती बंदिस्त झाला. श्रद्धेने ‘पाहण्या’चं, पावती फाडून ‘दर्शन घेणं’ झालं. आणखी एक बदल घडला आणि तो म्हणजे गणपतीपेक्षा, मंडळाचा कार्यकर्ता नवसाला पावणं गरजेचं होऊ लागलं . तासनतास दर्शनाच्या रांगेत राहाण्यापेक्षा, मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्याकडे ‘वशिला’ लावून चुटकीसरशी दर्शन घेण्याचं प्रमाण वाढू लागलं. पूर्वी सरिव भक्त असायचे, त्यात आता व्हिआयपी आणि व्हिव्हिआयपी असा नवा उच्चवर्ग तयार झाला. आणखी एक ठळक बदल गेली काही वर्ष जाणवतो आणि तो म्हणजे सध्या सरळ, खट्याळ हसु चेहेऱ्यावर खेळवणाऱ्या ‘गणपतीं’च झालेलं नामकरण. पूर्वीचा गणपतीं, गणपतीच असायचा. त्याला आतासारखी नांव नसायची. तो तो गणपती, त्या त्या मंडळाच्या नांवाने ओळखला जायचा. गणपतींना राजा, महाराजा, युवराज, सम्राट वैगेरे उपाध्या-पदव्या देण्याची सुरुवात अलीकडे, म्हणजे साधारण विसेक वर्षांपूर्वी झाली असावी आणि याची सुरुवात, माझ्या आठवणीप्रमाणे, लालबागच्या राजापासून झाली.

 

लालबागच नव्हे तर मुंबईतल्या निरनिराळ्या लहान मोठ्या  गल्ल्यांमधील गणपती आता राजा, महाराजा, युवराज, सम्राट अशी नांव धारण करू लागले आणि आपण पुन्हा संस्थांनी युगात पोचल्याच मला उगाचच वाटू लागल. बदललेल्या समाजच प्रतिबिंब, वर म्हटल्याप्रमाणे, अश्या पद्धतीने उत्सवात प्रतिबिंबित होऊ लागल. सार्वजनिक आणि खाजगी जीवनातला चाळीतला खुला मामला फ्लॅटात  बंदिस्त झाला आणि गणपती पडद्याआड गेला, माणसं एकटी राहण्यात मोठेपणा मानू लागली तशी पूर्वीच्या गणपतीच्या सोबतची हलती चालती बावली अंतर्धान पावली. तासनतास दर्शनाच्या रांगेत उभं राहाण्यापेक्षा, ‘वशिला’ लावणं अधिक योग्य वाटू लागलं. दलालांना महत्व आलं. तेंव्हा श्रद्धेला पावणारा गणपतीही ‘नवसा’च्या वशिल्याशिवाय (की लाचेशिवाय) पावेनासा झाला. गणपतीपेक्षा कार्यकर्ता मोठा झाला आणि सार्वजनिक जीवनात सार्वभौम लोकांपेक्षा लोकप्रतिनिधी मोठा झाला.

 

आपण सगळेच बदललो. आपलं जगणं बदललं. श्रद्धेच्या शुचितेच्या, प्रामाणिकपणाच्या व्याख्याही बदलल्या आणि मग आपले गणपतीही बदलले त्यात नवल ते काय? आपलं खाजगी जगणं उत्सवात प्रतिबिंबीत होतं, ते असं..प्रत्याक्षात काही करण्यापेक्षा केल्यासारखं करणं आणि त्याच्या कैकपटीने त्याचं मार्केटींग करणं महत्वाचं ठरू लागलं. सर्वच मंडळं सामाजिक कार्यात मदत करतात, भाग घेतात परंतू त्याची जाहिरात मात्र मोठी करतात. खरं तर उजव्या हाताने केलेलं डाव्या हातालाही कळू नये असं आपली संस्कृती सांगते. आता डावा हातच काय, पायाच्या नखापर्यंत ती बातमी कशी जाईल हे पाहिलं जातं.

 

पुढून देखणा दिसणारा नाचरा मोर, मागून तेवढाच किळसवाणा दिसतो हे आपण सारेच विसरत चाललोय याचंच प्रतिबिंबं आपल्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनात दिसतंय..!

 

कालाय तस्मै नम:..!!

 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions