माथेरान हे विकासाबाबतीत आजही अपूर्णतेच्या वाटेवरून मार्गस्थ होत आहे. लोकसंख्या अन् सुशिक्षित बेकार तरुणांची वाढती संख्या पाहता अन्य पर्यटनस्थळांप्रमाणेच माथेरानलाही विकासाच्या प्रवाहाकडे नेणे गरजेचे बनलेले आहे. या गावाला विकासाची दिशा प्राप्त व्हावी, येथील प्रमुख अडीअडचणींना कायमस्वरूपी तिलांजली देऊन माथेरान दर्जेदार विकसनशील क्षेत्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नगरपालिकेचे गटनेते तथा विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडे निवेदनाद्वारे करत समस्या मार्गी लावण्यासाठी साकडे घातले.
माथेरान हे संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यापासून इथे बांधकामाला बंदी आहे. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींंना सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून विकास आराखडाही प्रलंबित असल्याने मागील काळात विशेषतः झोपडपट्टी भागातील बांधकामे जागेअभावी सुयोग्य नियोजन पद्धतीत केलेली नाहीत त्यामुळे कारवाईचा बडगा या बांधकामांवर उगारला जात आहे. याचा नाहक त्रास सर्वांनाच होत आहे. एक तृतीयांश भूभाग हा नगरपालिकेच्या अखत्यारीत येत असूून बहुतांश जागा ही वनविभागाच्या मालकीची आहे. जवळपास २५४ प्लॉट हे बाजार भूखंड आहेत तर २५६ प्लॉट हे बंगलेधारकांचे आहेत. बंगल्याच्या जागा या पंचवीस ते तीस एकरांचे अवास्तव प्लॉट असून गावातील बाजार भूखंड हे एक ते सव्वा गुंठ्याचे आहेत. परिणामी लोकसंख्या वाढत गेल्याने स्थानिकांना रहिवास करण्यास अडचणी ठरत आहेत. याकामी शासनाने लवकरात लवकर विकास आराखडा तयार केल्याशिवाय बांधकामे स्थिरस्थावर होणार नाहीत. शासन दरबारी अनेकदा याबाबतीत ग्रामस्थांनी लेखी निवेदने दिलेली आहेत; परंतु अद्याप शासनाने या दुर्गम पर्यटनस्थळाविषयी ठोस सकारात्मकता दर्शवलेली नाही. यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत जेणेकरून स्थानिकांना सुखाने जीवन मार्गक्रमण करता येईल, असेही प्रसाद सावंत यांनी गीतेंना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
माथेरानच्या समस्या मार्गी लावा: नगरसेवक प्रसाद सावंत यांनी केंद्रीय मंत्री गीते यांचे लक्ष वेधले
Team TNV August 17th, 2017 Posted In: येवा कोकणात
Team TNV