पुणे : मुद्रा योजना जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. गरजूंना या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर या योजनेचा प्रसार तळागाळा पर्यंत झाला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करा . अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके , आरबीआयचे बी.एम.कोरी, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री पठारे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्री देशमुख , उद्योग प्रतिनिधी श्री पानसरे, बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक कदम, उपजिल्हाधिकारी उदय भोसले, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, मुद्रा योजना राबवण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. याबद्दल आम्हा लोकप्रतिनिधीना अभिमान वाटतो. बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. या योजने अंतर्गत आता १० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. मात्र अजूनही या योजनेचा लाभ शेवटच्या गरजूपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनेचा फायदा पोहचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून काम केले पाहिजे. यामुळे योजनेचा प्रसार होवून अधिकाधिक लोकांना याचा लाभ होवून या योजनेचा हेतू सफल होईल.
मुद्राचे कर्ज घेण्यासाठी आलेल्यांना त्रास न देता सहकार्य करा. त्यासाठी व्यावहारिकपणे विचार न करता भावनिक होऊन विचार करा. तसेच जास्ती जास्त लोकांनी हे कर्ज परत करावे यासाठी त्यांचे प्रबोधन करा. अशा सूचना ही श्री बापट यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. मुद्रा योजना राबवण्यात पुणे जिल्हा देशात अग्रेसर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.