पुणे – मुलांमध्ये निरीक्षण शक्ती वाढविणे, सर्जनशीलता जागृत करणे यासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षकांनी पालकांसह एकत्रीत प्रयोग करावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ग्रहण शक्ती वाढते. मुलांना नुसती साधनं उपलब्ध करुन देऊन काही साध्य होणार नाही. त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी वेळ देणेही महत्वाचे आहे. व्हॉट्सअप, फेसबुक अशा नवतंत्रज्ञानाबाबत शिक्षकांनी भिती बाळगू नये. या तंत्रज्ञानातून अनेक चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवता येतील. बहुवर्ग अध्यापन पध्दती शक्य तेथे वापरावी. यातून वेळ वाचेल व अनुभवांची देवाणघेवाण करता येईल. तंत्रज्ञान हा पर्याय नसून एक जोड आहे. असे मार्गदर्शन जेष्ठ बाल शिक्षण तज्ञ सुचेता फडके यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने ‘बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान’ या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय 24 वे राज्य स्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. त्याच्या दुर-या दिवशीच्या ‘तंत्रज्ञान वापराचे माझे प्रयोग’ या चर्चासत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुचेता फडके बोलत होत्या. यावेळी अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष प्रशांत शितोळे, मृदुला धोंगडे, संजय अष्टेकर, वैशाली सुर्यवंशी, प्रमोद शिंदे आदींसह राज्यभरातून सहभागी झालेले शिक्षक उपस्थित होते.
मृदुला धोंगडे म्हणाल्या की, मोबाईल नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन पालकांशी दुहेरी संवाद वाढवावा. याबाबत पालकांमध्ये जागरुकता निर्माण करुन पाल्याच्या शिक्षणासाठी याचा फायदा होतो का? हे तपासावे. पालकांकडून पाल्याला मिळालेले अनुभव विचारात घेऊन त्याचा संकल्पनांचे दृढीकरण करावे. मुलांना शाळेत शिकवताना आलेले अनुभव पालकांनी गप्पांच्या माध्यमातून समजून घ्यावेत आणि ते पालक सभेत किंवा व्हॉट्सअपव्दारे इतर पालकांना कळवावे. व्हॉट्सअप, फेसबुक, ऑडीओ, व्हिडीओ चित्रफितीचा वापर करुन विद्यार्थ्यांची आकरण शक्ती वाढविण्यासाठी अनेक छोटे मोठे प्रयोग करणे सहज शक्य आहे. यातून मुल शिकण्यासाठी वा अनुभव संपन्न होण्यासाठी फक्त शाळेवर अंबलबूंन न राहता पालकांना आपल्या पाल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण विस्तारीत होईल. पालक, शिक्षक संवादाला तंत्रज्ञानाची जोड देऊन वैचारिक संवाद वाढविता येईल. असे धोंगडे म्हणाल्या.
संजय अष्टेकर म्हणाले की, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार बालकेंद्री शिक्षणासाठी ज्ञानरचनावादी संकल्पना मुळ धरु लागली आहे. यामध्ये बहुवर्ग अध्यापन पध्दतीचा वापर करणे गरजेचे आहे. यात ज्ञानरचनावादी उपक्रमाचा वापर केल्यास मर्यादित वेळेत कृतीयुक्त, आनंददायी व तणावमुक्त शिक्षण देता येणे शक्य आहे. यातून विद्यार्थ्यांना स्वअनुभवातून शिकण्याची संधी मिळते. असे अष्टेकर यांनी सांगितले.