रत्नागिरी (प्रतिनिधी )
‘सौभाग्य योजना’ अर्थात मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात ३०० वीज जोडण्या देण्यात आल्या. पंडित दीनदयाळ यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य’ ही योजना जाहीर केली आहे. देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने ‘सौभाग्य’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत ट्रान्स्फॉर्मर, मीटर आणि तारांसाठी सवलतही देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी १३ हजार ७५० नवे मीटर प्राप्त झाली आहेत. यातील ७० टक्के मीटर नव्या जोडणीसाठी तर ३० टक्के मीटर जुने बदलून देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. यातील ५ हजार ८०० मीटर रत्नागिरी विभागाला, ३ हजार ८२५ मीटर चिपळूण विभागाला तर ४ हजार १२५ मीटर खेड विभागाला देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन वीज जोडणी आणि मीटर बदलण्यासाठी ठेकेदारांना नियुक्त करण्यात आले असून जिल्ह्यातील गंजलेले वीजखांब, नादुरुस्त रोहित्र पावसाळ्यापूर्वी बदलण्यात येणार आहेत त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे ६० कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत जिल्ह्यात ८० जणांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यांपैकी ५० जणांना पंप देण्यात आला असून उर्वरित ३० जणांच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याची कार्यालये भाड्याच्या जागेतून स्वमालकीच्या जागेत उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती वीज विभागाकडून देण्यात आली.