पुणे : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेने उस्मानाबादमधील वाशी तालुक्यातील वडजी ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवित झेंडा फडकाविला. संघटनेच्या पॅनलने १०-० ने उमेदवारांना निवडून आणत रयत क्रांती संघटनेला पहिला विजय मिळवून दिला आहे. यामध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य युवा आघाडी अध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी काम केले.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापूर मध्ये घोषणा केलेल्या संघटनेने आपली विजयी घोडदौंड ऐन दिवाळीत सुरु केली आहे. त्यामुळे वडजी ग्रामपंचायतीमध्ये रयत क्रांती संघटनेचे रमेश जाधवर, माधव जाधवर, गवाबाई जाधवर, गहिनीनाथ मोराळे, रुपाली जाधवर, रेश्मा शेख, सुनील जाधवर, लक्ष्मी डांगे, लता थोरात हे बहुमताने निवडून आले आहेत.
संघटनेच्या पहिल्या विजयाबद्दल सदाभाऊ खोत म्हणाले, वडजी ग्रामपंचायतीमध्ये मिळालेला पहिला विजय हा रयतेचा विजय आहे. रयत क्रांती संघटना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन कार्यरत असून समाजाच्या तळागाळातील घटकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. या विजयानंतर क्रांतीची खरी सुरुवात झाली असून ही विजयी घोडदौड आम्ही कायम ठेवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, युवकांना सशक्त करुन राजकारणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासोबतच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी देशाचा विकास करण्याकरीता पुढे येणे गरजेचे आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून युवा पिढी राजकारणात सक्रिय होत असून राजकारण सशक्त करण्याकरीता आमची वाटचाल अशीच पुढे सुरु ठेवू.