पुणे – डोंगरातून उगवणारा सूर्य… निसर्गाचे सौंदर्य… पक्षी-प्राण्यांचे जीवन… श्रीगणेश, शिवाजी महाराज यांसह इतरांची रेखाचित्रे… बेटी पढाओ-बेटी बचाओ… आकाश गंगा.. ग्रह-तारे… हे सगळे साकारले विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून. निमित्त होते, बालदिनानिमित्त राऊंड टेबल इंडिया पुणे चॅप्टर 15 तर्फे आयोजित ‘तारे जमीन पर…’ चित्रकला स्पर्धेचे!
वडकी येथील नूतन विद्यालय, उरुळी देवाची येथील समता विद्यालय आणि आदर्श हायस्कुल या शाळांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. तिन्ही शाळांतील मिळून सुमारे 2000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पाचवी ते 10 वीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना ड्रॉईंग पेपर, रंगाचे खडू देण्यात आले होते. एक तासाच्या वेळेत आपल्या मनातील कोणतेही चित्र कागदावर उतरवायचे असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निसर्गचित्रांपासून व्यक्तिचित्रांपर्यंत विविध चित्रे रेखाटली. अनेकांनी सामाजिक प्रश्नावर भाष्य करीत शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, गरिबी, दुष्काळ आदी विषय मांडले. प्रत्येक इयत्तेतील उत्कृष्ट चित्रांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांना बॅग आणि ‘संवाद… सर्जनशील मनाशी’ हा विज्ञान विशेषांक देऊन गौरवण्यात आले. यावेळी राऊंड टेबल पुणे चॅप्टरचे चेअरमन देवेश जाटिया, सचिव प्रोमित सूद, उपाध्यक्ष कपिल शहा, हर्निश ठक्कर, अभिषेक मालपाणी,शाळेचे मुख्याध्यापक प्रा. साखरे यांच्यासह शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.