गुणवंती परस्ते
पुणे – राज्य शासनाबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी येथे केले.
इंद्रायणीनगर, भोसरी येथील श्री साई चौक मित्र मंडळ येथे पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संवादपर्व अभियानाचे उद्घाटन अण्णा बोदडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विलास मडिगेरी, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, खजिनदार किरण करांडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती अधिकारी वृषाली पाटील, उपस्थित होत्या.
अण्णा बोदडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी महानगरपालिका विविध कल्याणकारी योजना राबविते, यामध्ये प्रामुख्याने महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना, खेळाडू कल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली. तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या अर्थ सहाय्य योजनेची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
माहिती सहायक जयंत कर्पे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत दरमहा पाच भाषेत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिक विद्यार्थी व नागरिकांना कशा प्रकारे उपयुक्त आहे याची माहिती दिली. शासनाचे ध्येय, धोरण, योजना व विशेष मुलाखती या मासिकात प्रकाशित केल्या जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री साई चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी धनंजय जाधव, श्रीधर मडिगेरी तसेच विलास कसबे, मिलिंद भिंगारे, रोहित साबळे, मोहन मोठे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.