पुणे – केवळ महाराष्ट्राचे वैभव वाढावे म्हणून शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणे बरोबर नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक सरकार उभे करत आहे. यामागे असलेला सरकारचा मानस चुकीचा आहे. ज्या ठिकाणी स्मारक उभे केले जात आहे, त्याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. इतिहासाची साक्ष देणाºया ठिकाणीच शिवस्मारक व्हावे, असे मत संभाजी भिडे गुुरुजी यांनी व्यक्त केले. हिंदवी स्वराज्याचे प्रतिक आणि अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या रायगडावरील ३२ मण सुवर्ण सिंहासनाची लवकरच पुर्नस्थापना करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
श्री मोरया गोसावी यांच्या ४५६ व्या समाधी महोत्सवनिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने संभाजी भिडे गुरुजी यांना श्रीमोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. करवीर पीठाचे परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य, खासदार श्रीरंग बारणे, माजी विश्वस्त विघ्नहरी देव, मोरश्वर शेडगे, ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे यावेळी उपस्थित होते.
संभाजी भिडे म्हणाले, देशात सध्या अपप्रवृत्ती वाढत आहेत. स्वार्थीपणाची भावना देशासाठी मारक आहे. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी शिवनीतीचा वापर करायला हवा. राष्ट्रसंतानी समाजाला जगण्याची दिशा दाखविली आहे. राष्ट्रसंताच्या जीवनप्रकाशात चालणारा हिंदू समाज निर्माण व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
करवीर पीठाचे परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, हिंदूना आपला धर्म टिकवायचा असेल तर धर्मानेच एकत्र रहायला हवे. धर्माने वागलो नाही तर आपलाच नाश होईल. संतपरंपरेत सर्व संतानी धर्म पाळले आहेत. स्वधर्माचे आचरण म्हणजेच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र येत धर्म वाढविला पाहिजे.