रायगड : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यात येत असलेल्या २०१७ -२०३६ या सालात प्रस्तावित प्रादेशिक योजनेच्या अनुषंगाने अलिबाग येथे प्रकल्पाबाबत जनसुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र या जनसुनावणीबाबत नागरिकांना कोणतीच कल्पना नसल्याने हि जनसुनावणी गुपचूप करण्याचा फार्स एमएमआरडीएने घातला असून स्थानिक नागरिकांनी या सुनावणीवेळी गोंधळ घातला. एमएमआरडीच्या सदस्यांना पुन्हा जनसुनावणी घेण्याबाबत सागितले असून नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर हि जनसुनावणी थोडक्यात आटोपण्याचा मानस एमएमआरडी सदस्याचा होता.
रायगड, ठाणा, पालघर या जिल्ह्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्ताव आराखडा तयार केला असून यामध्ये तिन्ही जिल्ह्यातील १००० गावाचा समावेश होत असून रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग तालुक्यातील सर्वाधिक गावचा समावेश होत आहे. या प्रकल्पामध्ये औद्यागिक क्षेत्र, रेल्वे, विरार ते अलिबाग कॉरिडोर येत आहे. यामध्ये अनेक नागरिकांच्या जमिनी जात असून जमिनीवर प्रकल्प होण्याच्या आधीच आरक्षित शिक्का बसला आहे. त्याचबरोबर अलिबाग पेण तालुक्यात खार जमिनी असून त्या खारजमिनी व्यतिरिक्त इतर प्रकल्पाला दिल्या जात नाही असा नियम असताना या जमिनीही एमएमआरडीए घेण्याचा घात घालत आहे.
एमएमआरडीएने प्रस्तावितप्रादेशिक प्रकल्पाचा कोणताही योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नसून हा प्रकल्प अलिबागकरांच्या हिताचा नसल्यामुळे या प्रकल्पाला नागरिकाकडून विरोध होत आहे.
अलिबाग येथे घेण्यात आलेल्या आजच्या जनसुनावाणीला तालुक्यातील समाविष्ट ग्रामपंचायतीना बोलावले नव्हते. याबाबत वरसोली ग्रामपंचायत सरपंच मिलिंद कवळे व सदस्यांनी गोंधळ घातला होता. त्याचबरोबर अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी हि या सुनावणी बाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी एमएमआरडीएचे सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अड. आस्वाद पाटील, आदि उपस्थित होते.
रायगड मध्ये एमएमआरडीएच्या जनसुनावणीला विरोध: नागरिकांनाअंधारात ठेवल्याचा आरोप
Team TNV August 21st, 2017 Posted In: येवा कोकणात
Team TNV