पुणे – ज्या ठिकाणी ११३ वर्षांपूर्वी पेटली होती विदेशी मालाची होळी, ती सावरकर स्मारकाची जागा तिरंगी झेंडे, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे फलक आणि तिरंगा अभिमानाने हातात घेणा-या तरुणाईने फुलुन गेली. जातीय दहशतवाद, टोकाची जातीयता, छुपा जातीय द्वेष हा जातीयवादाच्या होळीमध्ये पेटवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश तरुणाईसह राष्ट्रपुरुषांच्या वंशजांनी दिला.
निमित्त होते, वंदेमातरम संघटनेच्या वतीने आयोजित जातीयवादाच्या होळीचे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सुशांत साठे, हुतात्मा राजगुरु यांचे वंशज शंतनू राजगुरु, शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप रावत, इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांच्या हस्ते ही जातीयवादाची होळी पेटवण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, महेश बाटले, आकाश गजमल, सूरज जाधव, अमन अलकुंटे, किरण कांबळे, किरण राऊत, सत्यजित वायाळ, रोहन पोळ, तेजस वाशिवले, गिरीश जैन, प्राध्यापक नंदकुमार वाळिंबे, विनोद मोहिते आदी उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरात राष्ट्रपुरुषांच्या वंशजांच्या हस्ते ही होळी पेटवण्यात आली.
सात्यकी सावरकर म्हणाले, सुमारे ११३ वर्षांपूर्वी याच ऐतिहासिक ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विदेशी मालाची होळी केली होती आणि पुढे त्याची धग देशभर पोहचली. सद्य परिस्थितीत संपूर्ण देशाला जातीयवादाच्या विरोधात एक होणे गरजेचे आहे. म्हणूनच या जातीयवादाच्या पुण्यात पेटलेल्या होळीचे महत्व सर्वाधिक आहे. जातीयवादाच्या विरोधात अशाच विविध उपक्रम व आंदोलनांमधून तरुणाईने एकत्र यावे.
सुशांत साठे म्हणाले, आपले राष्ट्रपुरुष हे संपूर्ण देशाची प्रेरणास्थळे आहेत. त्यांना कोणत्याही जातीधर्माच्या चौकटीत बसविणे व जाती-जातींमध्ये वाटून घेणे, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. वैभव वाघ म्हणाले, राष्ट्रपुरुषांच्या वंशजांनी या जातीयवादाच्या होळीच्या निमित्ताने दिलेला एकात्मतेचा संदेश हा जातीयवादाच्या विरोधातील लढाईतील एक महत्वाचा टप्पा आहे. वंदेमातरम संघटनेच्या वतीने सुरु करण्यात आलेले जातीयवादाच्या विरोधातील हे जनआंदोलन पुढील काळात अधिक व्यापक व प्रखर करण्यात येईल. अक्षय वाडकर यांनी प्रास्ताविक केले. अमेय सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. मनिष पाडेकर यांनी आभार मानले.