पुणे – सरकारने राष्ट्रीय युवा आयोगाची स्थापना करावी. याबाबत खासदार चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली देशभर युवकांचे संघटन करुन जनजागृती करण्यात येत आहे. या आयोगाच्या माध्यमातून देशभरातील युवकांना विशेषता मागासवर्गीय, दलित, आदिवासी समाजातील युवकांना उच्चशिक्षण, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जावे. यासाठी सोशल मिडीयातून देखील चळवळ उभारण्यात येत आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा समितीचे सदस्य आणि लोक जन शक्ती पार्टीचे प्रदेश युवा अध्यक्ष मोहन अनमोलू यांनी दिली.
पिंपरी येथे लोक जन शक्ती पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना अनमोलू बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव सचिन जाधव, शहर महिला अध्यक्षा सरिता जामनिक, पुणे शहर सल्लागार सुनिल जामनिक, पिंपरी चिंचवड सचिव अरुण मैराळे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष दत्ता गोडपे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष दिनकर ओव्हाळ, अतुल जगताप, राहूल गागडे, अभिषेक वानखेडे, लक्ष्मण शिंदे, आकाश शिंदे, राजेश इंगळे, ज्ञानेश्वर बोरकर आदी उपस्थित होते.
अनमोलू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, लोक जन शक्ती पार्टीचे संस्थापक आणि अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्ते सर्व गरीब घटकांना अन्न पुरवठा सुरळीत व्हावा. तसेच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी वापरला जावा यासाठी काम करीत आहेत. संसदीय बोर्ड समितीचे अध्यक्ष खासदार चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना त्यांच्या हक्काबाबत जागृत करण्याचे काम करीत आहे. सर्व शिक्षा अभियानासाठी केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी अनेक जिल्ह्यात वापरला जात नाही. तसेच पुणे, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातून स्वस्त धान्य दुकानदारांकडून गरीबांची पिळवणुक केली जाते. याबाबत अनेक तक्रारी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा समितीकडे आल्या आहेत. ग्रामिण भागातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाकडून मिळालेले अन्नधान्य मद्य व वाईनरी उत्पादकांना, हॉटेल, ढाबा व्यवसायीकांना काळ्या बाजाराने विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी करुन कारवाई करावी. अशी मागणी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडे केली आहे. लोक जन शक्ती पार्टी एनडीएतील उत्तर भारतातील मुख्य घटक पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची बैठक झाली. त्यानुसार लोक जन शक्ती पार्टीला देशभरातून लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी साठ जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्या अनुशंगाने महाराष्ट्रात पक्ष संघटना कामाला लागली आहे. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेला युवा उमेदवार उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मधून पक्ष बांधणीचे काम धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने सुरु आहे. असेही अनमोलू म्हणाले. स्वागत शहराध्यक्ष धुराजी शिंदे, सुत्रसंचालन सचिन जाधव आणि आभार अरुण मैराळे यांना मानले.