वरदविनायका चरणी लोकसेवेची पुष्पांजली

September 6th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

महडचे गणपती संस्थान जोपासतेय सामाजिक भावनेचा वसा

 

धार्मिक कर्मकांडांपासून दूर राहत देवस्थानच्या  उपक्रमांना सामाजिकतेची जोड देण्याचा वसा घालून दिलाय तो महड येथील वरदविनायक गणपती संस्थानने. महडसारख्या छोटया गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा या देवस्थानाचा मानस आहे आणि तो प्रत्यक्षात आणला जात आहे.  काय आहे हे देवस्थान आणि काय आहेत इथले उपक्रम याविषयी सांगताहेत संस्थानचे विश्वस्थ “केदार जोशी”.  पेशाने वकील असलेले आणि फारच कमी वयात संस्थानचा कारभार हाकणारे जोशी यांनी देवस्थानच्या महतीसह संस्थानच्या कार्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आपल्यासमोर मांडला आहे.

 

केदार जोशी

विश्वस्थ, श्री वरदविनायक, गणपती संस्थान महड

 

 

महाराष्ट्रात अष्टविनायक प्रसिध्द आहेत, त्यापैकी एक म्हणजे महड गावचा वरदविनायक. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड हे छोटेसे गाव असून येथे वरदविनायकाचे हेमाडपंती मंदिर आहे. मुंबई-पुणे महामार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गणेशस्थानास भाविक दररोज भेट देतात. सुट्टीच्या आणि रविवारच्या दिवशी ही संख्या काही हजाराच्या घरात पोहोचते. सातशे-साडेसातशे लोकसंख्या असणाऱ्या या गावात देवस्थानाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. दैनंदिन धार्मिक उपक्रम नित्यनेमाने होत असतात, त्याचबरोबर देवस्थानाच्या वतीने महड गावाच्या विकासासाठीही प्रयत्न केले जात असतात. ”महड हे खूप जुने देवस्थान आहे. वरदविनायकांची मूर्ती बिवलकरांना तळयात सापडली. तिची स्थापना या मंदिरात केली गेली. अष्टविनायकांपैकी एक असलेला गणेश म्हणून या स्थानास मान्यता आहे. १९८९ साली माझे वडील ठाणेभूषण न.शं. जोशी या देवस्थानाचे विश्वस्त झाले. त्यानी मंदिर आणि परिसरातील बांधकामाची डागडुजी केली. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या तलावाचे सुशोभीकरण करून घेतले, धर्मशाळेचे व भक्तनिवासाचे बांधकाम केले. आधी खूप मोठया प्रमाणात दुरवस्था असलेल्या या आडवाटेवरच्या तीर्थक्षेत्राच्या विकासाला त्यांनी चालना दिली. न.शं. जोशींनी महडमध्ये बांबूच्या बेटात दत्तमहाराजांची स्थापना केली. त्याचप्रमाणे शनी, राहू, केतू या देवतांची मंदिरे उभारली. कुबेर मंदिराच्या बांधकामासही त्यांनी सुरुवात केली. आता लवकरच ते मंदिर पूर्णत्वास जाईल. देवस्थानाच्या वतीने माघी जयंती, शनीजयंती, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. न.शं. जोशी यांनी एक कोटी आवर्तनाचा संकल्प केला होता. सात वर्षांच्या काळात ५६ लाख अवर्तने झाली आहेत. अशा प्रकारे देवस्थानात धार्मिक उपक्रम चालत असतात.”

देवस्थानाच्या वतीने मंदिरात नित्यनियमाने धार्मिक उपक्रम होतात, त्याचप्रमाणे महड गावाच्या विकासातही देवस्थान कमिटीचा सहभाग राहिला आहे. केवळ धार्मिक उपक्रम केले म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो असे नाही, तर ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी सेवाभक्तीही करावी लागले. आधुनिक काळात समाजसेवा हीच ईश्वरभक्ती ठरली आहे. देवस्थानाच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त ठरणारे काम करणे ही गणेशसेवाच आहे, अशी देवस्थान कमिटीची धारणा आहे आणि त्यानुसार देवस्थान कमिटी काम करत असते. ”मुळात महड हे आडवाटेवरचे गाव आहे. त्यामुळे प्रगतीचा वारा पुरेशा प्रमाणात तेथे पोहोचला नाही. गाव खूपच छोटे असल्याने विकासाला मर्यादा येतात असे लक्षात येते. शासन सर्व विकास करेल अशी भूमिका घेणे योग्य नाही. आपणही आपल्या माध्यमातून काही प्रयत्न केले पाहिजेत अशी आम्ही भूमिका घेतली असून त्यातून अनेक कामांना गती आली आली. महड गावाच्या पाणीपुरवठयाची व्यवस्था उभारून देण्याचे काम काही वर्षांपूर्वी देवस्थानाने केले आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीही देवस्थानच करत असते. त्याचप्रमाणे गावात असणाऱ्या तलावाचे सुशोभीकरण करून त्याला संरक्षक भिंती बांधल्या. या तलावाच्या खोलीकरणामुळे आसपासच्या परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे.  मे महिन्यात सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना महडमध्ये पाण्याची टंचाई जाणवली नाही. महड गावातील स्मशानाचे बांधकामही देवस्थानाच्या माध्यमातून केले गेले आहे. देवस्थानाच्या वतीने मोफत अन्नछत्र चालवले जात असून, गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसोबत गावकरीही त्याचा लाभ घेत असतात. उत्सवकाळात आम्ही एक प्रथमोपचार केंद्रही चालवत असतो. यासाठी आम्ही खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घेत असतो. त्यालाही समाजाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेच्या इमारतीची डागडुजी आम्ही देवस्थानाच्या माध्यमातून केलेली आहे. देवस्थानने भक्तनिवासाच्या व धर्मशाळेच्या परिसरात शौचालये बांधली आहेत. गावकऱ्यांना त्यांचा मोफत वापर करता येतो.

गावातील मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने काही उपक्रम राबवत असतो. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांची अकरावीची व तेरावीची वर्षभराची शैक्षणिक फी आम्ही संस्थेच्या माध्यमातून भरत असतो. त्याचप्रमाणे दर वर्षी गावातील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले जाते. महडमधील मुलांना आम्ही स्वसंरक्षणाचे धडे देत असून गावातील अनेक मुले या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतात. गेली अनेक वर्षे अशा प्रकारचा प्रशिक्षण वर्ग चालवला जातो. आमच्या रायगड जिल्ह्यात पाऊस खूप मोठया प्रमाणात होत असतो, हे लक्षात घेऊन देवस्थानाच्या माध्यमातून आम्ही दर वर्षी महड गावात प्रत्येक घरात एक छत्री देत असतो. अशा प्रकारच्या सामाजिक कामांबरोबरच आम्ही काही प्रबोधनात्मक कार्यक्रमही करत असतो. दर वर्षी आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम खूप मोठया प्रमाणात साजरा करतो. वेगवेगळे विषय घेऊन आम्ही गावकऱ्यांचे समुपदेशन करत असतो. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला अधिक चालना मिळावी, म्हणून देवस्थानच्या माध्यमातून दर तीन महिन्यांतून एकदा माहितीपट दाखवले जातात. त्याचाही खूप चांगला उपयोग होताना दिसत आहे.”

भक्ती आणि सेवा या दोन्ही गोष्टींवर ठाम श्रध्दा ठेवून आमची देवस्थान कमिटी वाटचाल करत आहे. पारंपरिकता जपतानाही आमहाला आधुनिकतेकडे जायचे आहे. महड गावाबरोबरच आसपासच्या परिसरातही देवस्थानाच्या माध्यमातून काही ठोस स्वरूपाचे काम व्हावे, असे आम्हाला वाटते आणि त्याच्या पूर्ततेसाठी आमही कामही सुरू केले आहे. या कामाचे स्वरूप स्थायी आणि प्रबोधनात्मक अशा दोन पातळयांवरचे आहे. ”महड हे तसे खूप छोटे गाव आहे. त्यामुळे म्हणावा तेवढया प्रमाणात येथे विकास झालेला नाही. आम्ही देवस्थानाच्या माध्यमातून काही गोष्टी करत आहोत. गावातील रस्ते खूपच अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुकीत अडचणी निर्माण होतात. गावातील रस्ते रुंद करण्यासाठी  गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरु आहेत.  त्याचप्रमाणे वरदविनायकाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे लक्षात घेऊन अद्ययावत वाहनतळ उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या भक्तनिवासाच्या वास्तूचे नूतनीकरण चालू आहे. या कामाबरोबरच भक्तनिवासात बहुतांश प्रकाशयोजना ही सौर ऊर्जेवर चालणारी असेल, अशा प्रकारची प्रणाली आम्ही विकसित करत आहोत.चालू वर्षात हे काम पूर्ण होईल. गावातील रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबर वेगवेगळया ठिकाणांचे सुशोभीकरण करून गावात येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महड गावात असे स्थायी स्वरूपाचे काम करत असताना  आम्ही देवस्थानाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे, हे लक्षात घेऊन बदलत्या काळाचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा यांना योग्य प्रकारे उत्तर देणारे शिक्षक निर्माण होणे गरजेचे आहे. या उपक्रमातून आम्हाला शिक्षण क्षेत्राला नवी दिशा द्यायची आहे.”

अष्टविनायकांपैकी वरदविनायक हे स्थान असलेल्या महड या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम देवस्थानाच्या माध्यमातून होत आहे. देवस्थानाचा कारभार पारदर्शक राहावा, यासाठी संपूर्ण व्यवहाराचे संगणकीकरण केले आहे. देवस्थानात काम करणारे सर्व कर्मचारी महड गावातील आहेत, हेही देवस्थानचे वैशिष्टय म्हणावे लागेल. देवस्थानाच्या माध्यमातून गणेशभक्तीची परंपरा जोपासली जाते, त्याचबरोबर आधुनिक काळाचा वेध घेत समाजसेवाही केली जाते. हे कार्य त्या वरदविनायक चरणी फारच छोटे आहे मात्र हि त्याचीच प्रेरणा आहे.

 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions