किशोर राणे
कोकणची भूमी ज्ञान-विज्ञानाने बहरलेली भूमी आहे. येथील प्रत्येक परंपरेला आणि प्रथेला विज्ञानाची झलक आहे. विजयदुर्ग परिसरात तर विज्ञान संशोधनाची खाण आहे. विजयदुर्गच्या रामेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. येथे अशा अनेक जागा आहेत तेथे विज्ञानाच्या पाऊलखुणा गेले शतकोन् शतके कायम आहेत. विजयदुर्ग किल्ला हा शिवशाहीत एक बलाढय़ आरमार तळ म्हणून प्रसिद्ध होता. तीन बाजूंनी अरबी समुद्रात असणा-या या किल्ल्याच्या सभोवताली समुद्रात सागरी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. गेली अनेक वर्षे या भिंतींना काहीही झालेले नाही, हे विशेष.
खगोलशास्रबरोबर मानवाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा-या हेलियम वायूचा शोध विजयदुर्ग किल्ल्यावरून लावला गेला. या घटनेला आज १४५ वर्षे झाली. विजयदुर्ग किल्ल्यावर परदेशी खगोलतज्ज्ञांनी त्यावेळी रोखलेल्या दुर्बिणींसाठी तयार करण्यात आलेली जागा आजही या संशोधनाची साक्ष देत उभी आहे. ही जागा ‘सायबाचे ओटे’ म्हणून प्रचलित आहे. १८ ऑगस्ट १८६८ साली हेलिमय या मूलद्रव्याचा शोध लागला म्हणून हा दिवस जगभरात हेलियम डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हेलियमच्या शोधभूमीची जाणीव ठेवणे म्हणजे खगोलप्रेमींना प्रेरणा देण्यासारखेच आहे.
विजयदुर्ग किल्ल्यावर गेल्यावर या अद्भुत गोष्टीची जाणीव होते. येथील प्रत्येक चिरा इतिहासाची प्रेरणा देतो. याच भूमीवर १४२ वर्षापूर्वी १८ ऑगस्ट १८६८ साली झालेल्या खग्रास सूर्यग्रहणात जगाला एक दिशा देणारा शोध लावला गेला. या दिवशी सकाळीच सूर्यग्रहण झाले होते. पहाट झाल्यानंतर काही तासांनी सूर्य झाकला गेला होता. पुन्हा एकदा अंधार झाला. सर्व जण घाबरले. सूर्य या काळोख्या सावलीतून बाहेर येईपर्यंत अनेक थक्क करणा-या गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या. जमिनीवर साप चालल्यासारखे काहींनी पाहिले होते. तर काहींनी आकाशात दिवसा चमकत्या तारका पाहिल्या होत्या. सारे भयकंपित झाले होते. परंतु, हजारो कोस मैलांवरून आलेले शास्त्रज्ञ या अघटित घटनेवर लक्ष ठेवण्यासाठी डोळय़ाची पापणीही न लवता दुर्बिणी रोखून होते आणि त्यांचे इप्सित साध्यही झाले होते.
मानव चंद्रावर उतरला आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे शक्य झाले. सूर्यावरील वातावरणाचा अभ्यास मात्र सूर्यावर उतरून करणे असंभव. यामुळे सूर्यावरील वातावरणाचा अभ्यास पृथ्वीवरून करावा लागतो. खग्रास सूर्यग्रहणावेळी असा अभ्यास करण्याची मोठी संधी असते. १८ ऑगस्ट १८६८ साली झालेल्या सूर्यग्रहणाचा मध्यबिंदू अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे जाणा-या पट्टय़ावर होता. यातील सूर्याची जवळून छाया टिपण्यासाठी अरबी समुद्रानजीकच्या विजयदुर्ग किल्ल्याचा पट्टा हा अत्यंत जवळचा होता. रेखांश, अक्षांश याचा अभ्यास करून तज्ज्ञांनी विजयदुर्ग हा बिंदू निश्चित केला होता आणि या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स येथून शास्त्रज्ञ विजयदुर्गात पोहोचले होते. त्याकाळी वाटा नव्हत्या. महामार्गही नव्हते. तरीही मजल दरमजल करत प्रतिकूल परिस्थितीतून विजयदुर्गमध्ये शास्त्रज्ञ पोहोचले. आता विजयदुर्गामध्ये पोहोचताना वाहनांची सुविधा आहे, वाटा आहे, संपर्क यंत्रणाही मोठी आहे. परंतु १४५ वर्षापूर्वी असे काहीही नव्हते. मग मजल दरमजल करत सूर्यग्रहण पाहण्यासाठी विजयदुर्ग किल्ला गाठण्याचे मनसुबे शास्त्रज्ञांनी निश्चित केले होते. तत्कालीन ब्रिटिश अंमलदारांनी कोणाला कशी मदत केली याच्या नोंदीही सापडतात.
ब्रिटनचे सर नॉर्मल लॉकियर किंवा फ्रान्सचे जेन्सन यांनी विजयदुर्गवरून दुर्बीण रोखली. यापैकी विजयदुर्गवर तेव्हा कोण पोहोचले होते यावर मतमतांतरे आहेत. मात्र, या दोघांपैकी एक शास्त्रज्ञ येथे पोहोचला होता, एवढे मात्र नक्की. विजयदुर्ग किल्ल्यावरील मुख्य महालात अक्षांश, रेशांख जुळविण्यासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या खाणाखुणा आजही पाहायला मिळतात. या अभ्यासानंतर त्यांनी दुर्बीण रोखण्यासाठी विशिष्ट कोनामध्ये एक चौथरा बांधून घेतला.
अक्षांश, रेखांश निश्चित झाले होते. आता वेध होता तो ग्रहणाचा. सात मिनिटांचा क्षण टिपण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली होती. सूर्यग्रहणाचा वेध घेण्यासाठी दुर्बिणीवर स्पेक्ट्रॉमीटर बसविण्यात आला होता.
त्या दिवशी सकाळी नित्याप्रमाणे सूर्योदय झाला. काही वेळातच पुन्हा काळोख झाला. सर्वत्र हलकल्लोळ उडाला. कोकण म्हणजे जात्याच भुताखेतांच्या गोष्टींनी भारलेले. देवाचा धावा सातत्याने करणारे.. खगोलशास्त्राची माहिती नसलेल्या अनेकांनी पाण्याखाली बुडी मारली. काहींनी ‘सोड गि-या’ऽऽ ची आरोळी देण्यास सुरुवात केली होती. काहींनी देवांना पाण्यात घातले होते. सर्वसामान्य जनतेमध्ये असे भीतीचे वातावरण असले तरी किल्ल्यावर पोहोचलेले शास्त्रज्ञ (साहेब) मात्र वेगळय़ाच खुशीत होते. ते सूर्याचा वेध घेत होते. यावेळी त्यांना सूर्यकिरणांच्या वर्णपटलांमध्ये तीन पिवळय़ा चमकदार रेषा दिसल्या. त्यातील दोन चमकदार रेषा या सोडियमच्या आहेत हे दोन्हीही शास्त्रज्ञांनी ओळखले, परंतु तिसरी चमकदार रेषा कुठची हे लॉकियर आणि जॉन्सेन या दोन्हीही शास्त्रज्ञांना समजून येत नव्हते. त्यांनी या अज्ञात मूलद्रव्याची टिपणे काढून जास्तीत जास्त छायाचित्रे मिळविण्याचा प्रयत्न केला. ग्रहण संपले. सूर्य पुन्हा चमकला.
काहींना वाटले आपण बुडी मारल्यामुळे सूर्याला राहूने सोडले. तर काहींना वाटले आपला धावा देवाने ऐकला. इकडे शास्त्रज्ञ नव्या शोधाला लागले होते. त्यांनी अभ्यास सुरू केला. आणि ही पिवळी रेषा म्हणजे हेलियम आहे याचा शोध लागला. फ्रेंच अॅ कॅडमीला ब्रिटनचे शास्त्रज्ञ लॉकियर यांनी माहिती कळविली. या माहितीप्रमाणे काही मिनिटांतच जेन्सन यांनी हेलियमची माहिती कळविली. यामुळे हेलियमच्या शोधाचे क्रेडिट अॅपकॅडमीने दोघांनाही दिले. हेलियम मूलद्रव्याचा शोध लागल्यानंतर मनुष्य जीवनात मोठी क्रांती झाली. आता तर वैद्यकीय क्षेत्रात हेलियमचा वापर वाढला आहे. मात्र या शोधाचा गुरू म्हणून विजयदुर्गचे नाव नोंदले गेले. या हेलियमच्या शोधाचा साक्षीदार सायबाचा कट्टा आज खगोलशास्त्रज्ञांना प्रेरणा देत विजयदुर्गच्या भूमीवर उभा आहे. विश्वकोष तसेच ब्रिटनच्या अनेक ग्रंथालयांपैकी या विजयदुर्ग किल्ल्याची नोंद सापडते.
हेलियम डे म्हणजे १८ ऑगस्ट दिवशी विजयदुर्ग किल्ल्यावर विज्ञानप्रेमी मंडळी आवर्जून जमतात. विज्ञानाचा दृष्टिकोन वाढवू या अशी प्रतिज्ञा घेतात. या भूमित पहिल्यापासूनच वैज्ञानिक दृष्टी आहे याची प्रचिती येते.
ब्रिटनचे सर नॉर्मल लॉकियर किंवा फ्रान्सचे जेन्सन यांनी हेलियम वायूचा शोध लावला. मात्र यापैकी कोणता शास्त्रज्ञ विजयदुर्गमध्ये आलेला होता, आजही अनेक जण संभ्रमात आहेत. काहींच्या मते फ्रान्सचे शास्त्रज्ञ जेन्सन हे विजयदुर्ग किल्ल्यावर पोहोचले होते तशा नोंदी त्यांनी केल्याचे सांगितले जाते. मात्र काहींच्या मते ब्रिटनचे शास्त्रज्ञ लॉकियर हे विजयदुर्ग किल्ल्यावर पोहोचले असावेत आणि ब्रिटिशांचाच अंमल असल्याने ते समुद्रमार्गे येथे आले असावेत असा तर्क मांडला जातो. परंतु विजयदुर्ग किल्ल्यावरचे सायबाचे ओटे जिज्ञासा जागृत करतात.
लाटांचे तांडव
विजयदुर्ग किल्ल्यावरून भ्रमंती करताना अनेक आश्चर्य लक्ष वेधून घेतात. किल्ल्याचा प्रेरणादायी इतिहासाबरोबरच येथील प्रत्येक भाग नवीन दृष्टी देत असतो. अनेक पिढय़ांपूर्वीही जेव्हा तंत्रज्ञानाच्या प्रगतीबाबत अनेक मर्यादा होत्या, त्यावेळीही पूर्वजांनी केलेली कामगिरी थक्क करणारी वाटते. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा केलेल्या सारासार विचारामुळे आज या वास्तू ऊन, पाऊस झेलूनही खंबीरपणे उभ्या आहेत. अरबी समुद्रात घोंगावत येणा-या लाटांना ढालीप्रमाणे आपल्या अंगावर झेलणारी तटबंदी पाहता याची प्रचिती येते. याच किल्ल्यापासून काही अंतरावर समुद्राखाली भिंती बांधण्यात आल्या आहेत. विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ही सुमारे ३० फूट उंचीची आहे या तटबंदीवरून समुद्राच्या लाटा किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात. रात्रंदिवस त्यांचा अंखड जागर सुरू असतो. काही लाटा पोहोचण्यापूर्वीच विरघळून जातात. तर काही लाटा तटबंदीपेक्षाही उंच उडय़ा मारतात. तटबंदीवरून येणा-या या लाटा अंगावर झेलण्यात येणारी मजा सोबतीला भनानता वारा आणि आपण ढाल होत आहोत. याचे वाटणारे थ्रील अनुभवयाचे तर विजयदुर्ग किल्ल्यावरच पोहोचायला हवे.
रामेश्वराचे स्थान मंदिर म्हणजे कलाभूमी
विजयदुर्गचे रामेश्वर मंदिर म्हणजे विज्ञानाचा एक ठेवाच आहे. कोल्हापूर येथील अंबाबाईला जशी वर्षातून दोन वेळा सूर्यकिरणे स्पर्श करतात. अगदी तसेच विजयदुर्गच्या रामेश्वराला देखील सूर्याची वर्षातून दोनदा सूर्याची किरणे स्पर्श करतात. ही मधल्या कालावधीत छताची ठेवण बदलल्यामुळे सूर्य किरणाला अडथळा येत आहे, मात्र जीर्णोधाराचे काम पूर्ण होण्यापूर्वी त्याचा विचार निश्चित केला जाईल, असे ग्रामस्थ सांगतात.
विजयदुर्ग-तळेरे रस्त्यावर विजयदुर्गपासून दोन किलोमीटरवर मुख्यरस्त्यापासून साधारण चारशे मीटरवर हे मंदिर आहे. मूळ मंदिराची स्थापना इ. स. १२ व्या शतकात झाली असल्याचे पुरावे मिळतात. कारण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करत असताना आतील गाभा-याची रचना आणि बांधकाम विजयदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाप्रमाणे करण्यात आल्याचे दिसून येते. या ऐतिहासिक रामेश्वर मंदिराचा विकास आणि विस्तार तीन वेळा करण्यात आल्याचा इतिहास सांगतो. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात विजयदुर्ग किल्ल्याचे किल्लेदार सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मूळ स्थानाभोवती दगडी गाभारा बांधला. १८व्या शतकाच्या मध्यकाळात सरदार संभाजी आणि सखोजी आंग्रे यांनी मूळ गाभा-यापुढे लाकडी कलाकुसरींनी मढलेला खांबांचा सुंदर मंडप उभारला व सभोवती प्रदक्षिणा मार्ग बांधून मंदिर बंदिस्त के ले. तसेच मंदिराभोवती फरसबंदी प्रांगण करून पश्चिम व दक्षिणेला प्रवेशद्वारेही बांधली. मंदिराच्या भोवती चितारलेली चित्रेही याच काळात खास कलाकार बोलावून काढून घेण्यात आली आहेत. या चित्रांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात चितारलेले प्रसंग पौराणिक असले तरी त्यातील व्यक्तिरेखांचे पोषाख,अलंकार, हत्यारे हे सर्व १८ व्या शतकात वापरात असलेल्या नमुन्यांप्रमाणे आढळतात. आनंदराव धुळपांनी उत्तरेकडील प्रवेशद्वार बांधले व नंतरच्या कालावधीत पूर्वेकडील डोंगर फोडून उताराची घाटी तयार केली. सुभेदार गंगाधरपंत भानू यांनी मंदिरासमोर अत्यंत देखणा, लाकडी सुरूदार खांब व महिरपी कमानींनी सजलेला भव्य सभामंडप उभारला.
विजयदुर्ग-रामेश्वर येथील ऐतिहासिक रामेश्वर मंदिराच्या भिंतीवरील चित्रे ही या मंदिराबाबत खास आकर्षण म्हणून उल्लेख होतो. ही चित्रे ‘सेको’ प्रकारातील असून या भिंतीवरील चूना-रेतीचा थर पूर्णपणे सुकल्यावर ही चित्रे रेखाटलेली आहेत. त्यानंतर गेरू, रंगीत पिवळी माती, रंगीत बारीक दगड आदी नैसर्गिक रंगांचा वापर करून ती रंगभरण केलेली असल्याचा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आलेल्या रिजनल कन्झव्र्हेशन लॅबोरेटरीचे अधिकारी एन. सेल्व्हारिहाई यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, या मंदिरावरील चित्रे इटालीमध्ये विकसित झालेल्या ‘फ्रेस्को’ तंत्रातील असल्याचा समज होता. याबाबत खंडण करताना ते म्हणाले होते की, फ्रेस्को तंत्राचा वापर करून काढण्यात आलेली चित्रे ही चूना-रेतीचा थर ओला असतानाच काढली जातात. ओल्या थरावर चित्रांचे रेखांकन करून त्यावर रंगलेपन केलं जातं. हा थर वाळताना रंग खोलवर खेचला जातो. भिंतीचा थोडा-थोडा भाग घेऊन ती चित्रे पूर्ण करावी लागतात. दुस-या दिवशी पुन्हा दुसरा थर देऊन ओला असतानाच चित्र काढावं लागतं. यामध्ये नव्या-जुन्याची जोडरेषा दिसते. मात्र रामेश्वर मंदिराच्या भिंतींवरील चित्रांमध्ये तशी जोडरेषा दिसत नाही. या भिंतीवरील चुना-रेती थर पूर्णपणे सुकल्यावर चित्रांचे रेखाटन करून रंग भरलेला आहे. त्यामुळे ‘सेको’ तंत्राचाच वापर करून केंद्राच्या नॅशनल पुरातन संवर्धन प्रयोगशाळेमार्फत या चित्रांचं जतन करावं लागणार असं सेल्व्हारिहाई यांनी सांगितलं. त्याप्रमाणे या मंदिराचा जीर्णोद्धाराचा संकल्प हाती घेतल्यावर मंदिराचे बांधकाम करताना ऐतिहासिक बाज राखताना या चित्रांबाबतही दक्ष राहणार असल्याचं रामेश्वर देवस्थानाच्या जीर्णोद्धार समितीने सांगितले. शिवभक्त म्हणून ओळखल्या जाणा-या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांची समाधी मंदिराच्या परिसरात असून मंदिराच्या समोरच मुस्लीम समाजाच्या रामेश्वर भक्ताची एक समाधीही याठिकाणी आढळून येते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात आलेली महाकाय घंटा किंवा वरच्या बंगलीच्या समोर असलेली डोलकाठी या गोष्टी पेशवेकालीन इतिहासाच्या आठवणी करून देतात.
किल्ले विजयदुर्ग भवानीमातेचं मंदिर
छत्रपती शिवरायांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो परकियांकडून जिंकून घेतला हे ओळखायचं झाल्यास काही गोष्टीतून ते आपल्या लक्षात येतं. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारुतीचं मंदिर, गोमुख बांधणीचा दरवाजा आणि किल्ल्यामध्ये असलेलं भवानीमातेचं मंदिर! या तिन्ही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. छत्रपतींनी विजयदुर्ग किल्ला जिंकल्यावर किल्ल्यामध्ये बांधलेलं भवानीमातेचं मंदिर मराठेवीरांना नेहमीच स्फूर्ती देत आलं. सन १६००मध्ये शिवाजी महाराजांनी प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आजही या मंदिरात पाहायला मिळते. चार हातांची ही दगडी मूर्ती मध्यंतराच्या कालावधीत उघडय़ावर पडली होती. मात्र तत्कालीन सरपंच प्रदीप साखरकर यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यावर त्यांनी छोटय़ा स्वरूपात कौलारू छप्पर घालून उन्हा-पावसापासून या मूर्तीचा बचाव केला.
विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास ऐकताना मराठय़ांच्या अंगात वीरश्री निर्माण करून शत्रूचा पाडाव करण्यास स्फूर्ती देणा-या या देवतेचं तत्कालीन आठवण करून देणारं मंदिर व्हावं अशी विजयदुर्गवासीय व इतिहासप्रेमींची इच्छा आहे.