शिल्पा पुणतांबेकर, सावनी कुलकर्णी यांचे सादरीकरण; सृजन फाऊंडेशन व नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सृजन महोत्सवाचे आयोजन
पुणे – शास्त्रीय संगीतातील बंदिशींपासून ते सुगम संगीत, नाट्यसंगीत, अभंग, लावणी अशा विविध संगीत प्रकारांची सुरेल अनुभूती रसिकांनी घेतली. विरासत एक परंपरा कार्यक्रमातून गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी यांनी देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले आणि दिग्गज गायक, संगीतकारांचा स्वरप्रवास आपल्या गायकीतून उलगडला.
सृजन फाऊंडेशन आणि नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सृजन महोत्सवाचे आयोजन नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे करण्यात आले आहे. यामध्ये विरासत एक परंपरा हा कार्यक्रम गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी यांनी सादर केला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी निर्मला गोगटे, ज्येष्ठ गायिका शैला दातार, पोपटलाल शिंगवी, रामचंद्र शेटे, डि. जी. बरडे, लक्ष्मीकांत धोंड, प्रकाश पायगुडे, अधीश पायगुडे उपस्थित होते.
पं. भास्करबुवा बखले यांच्या सांगीतिक खजिन्यातील अमूल्य ठेवा गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी यांच्या गायकीतून रसिकांनी अनुभवला. कार्यक्रमाची सुरुवात राग मुलतानीतील बंदिशींनी झाली. यानंतर पं. भास्करबुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेल्या संगीत स्वयंवर नाटकातील सुजन कसा मन चोरी… या पदाने रसिकांची मने जिंकली. छोटा गंधर्व यांनी गायलेल्या बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले… या अभंगाच्या सादरीकरणाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या हसले मनी चांदणे… या गीताला रसिकांनी दाद दिली.
कुलवधू नाटकातील मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेल्या क्षण आला भाग्याचा… या नाट्यपदाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पुढच पाऊल चित्रपटातील माणिक वर्मा यांनी गायलेल्या जाळीमंदी पिकली करवंद… या लावणीला रसिकांनी भरभरून दाद दिली. सोहोनी रागातील काहे अब तुम आये हो… या बंदिशीला रसिकांनी विशेष दाद दिली. या बंदिशीच्या सादरीकरणादरम्यान झालेली तबला व पखवाजाची अप्रतिम जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. दिव्य स्वातंत्र्य रवी… आता कशाला उद्याची बात… ताने स्वर रंगवावा… अगा वैकुंठीच्या राया… अशा गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. समीर पुणतांबेकर (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज), दिप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), नितीन जाधव (तालवाद्य)यांनी साथसंगत केली.