पुणे – लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर त्वरीत रस्ते सफाईचे काम चक्क ढोल-ताशा पथकातील वादकांनी हाती घेतले. नादब्रम्ह ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्ट मधील वादकांनी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बेलबाग चौकापासून संपूर्ण लक्ष्मी रस्ता ते टिळक चौकांपर्यंत स्वच्छता अभियान राबविले.
नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट व जनमित्र फाऊंडेशनतर्फे हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये पथकातील वादकांसह विविध सामाजिक संस्थांतील कार्यकर्त्यांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला. मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम पथकामार्फत राबविण्यात येत आहे.
जनमित्र फाऊंडेशनचे राघवेंद्र मानकर म्हणाले, मिरवणुकीमध्ये वादन करुन थकलेले असतानाही विसर्जन मिरवणुकीनंतर वादकांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान हाती घेतले. विसर्जनानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसणारा कचरा साफ केला. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानात मोठ्या संख्येने वादक देखील सहभाग झाले आहेत.