पुणे – आपण कोण आहोत, आपल्या जीवनाचा हेतू काय आहे, आपल्याला काय साध्य करायचे आहे, आपले समाजाशी काय नाते आहे, बंधुत्व म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरे वैदिक विज्ञानात मिळतात. म्हणूनच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत उच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा अधिकाधिक समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे मत रामकृष्ण विवेकानंद मिशन विद्यापीठ, बेलूर मठचे कुलगुरु स्वामी आत्मप्रियानंद यांनी व्यक्त केले.
विज्ञान भारती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ आणि महाराष्ट्र व गोवा सरकारच्या वतीने डेक्कन कॉलेजमध्ये भरविण्यात आलेल्या तिसर्या विश्व वेद विज्ञान संमेलनात शिक्षणविषयक परिषदेत स्वामी आत्मप्रियानंद बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, एआयसीटीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांच्यासह देशातील ६० विद्यापीठांचे कुलगुरू, आयआयटी व आयसरचे संचालक उपस्थित होते.
यापूर्वी ‘वेद विज्ञान सृष्टी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाषा, आहार, आयुर्वेद, कृषिगोविज्ञान, पुरातत्व, युध्दशास्त्र, स्थापत्य कला, वैदिक गणित आदी आठ विभागांचा प्रदर्शनात समावेश आहे.
प्राचीन मुर्ती, ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, जुन्या काळातील भांडी, आहार पध्दती, आयुर्वेदीक उपचार पध्दती, शेतीच्या पध्दती यांचा विज्ञानाशी असलेला संबंध आणि आजच्या काळातील गरज यांची माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. १३ जानेवारीपर्यंत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
याबरोबर आज ‘वैदिक विज्ञान व आधुनिक विज्ञान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. डॉ. विश्वनाथ कराड या परिसंवादाचे अध्यक्ष होते. डॉ. विजय भटकर हे या परिसंवादाचे प्रमुख होते. ऍलेक्स हँकी, डॉ. अनिल राजवंशी, डॉ. बी. एम. हेगडे, डॉ. रामा जयसुंदर, डॉ. राजीव संगल हे शास्त्रज्ञ आणि स्वामी अग्निवेश, आनंदमूर्ती गुरु मॉं, स्वामी आत्मप्रियानंद, डॉ हनिङ्ग खान शास्त्री, डॉ. किसन महाराज साखरे यांनी सहभाग घेतला.