पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि युवापिढीला गांधी विचारांतुन प्रेरणा मिळावी, यासाठी आदित्य बिर्ला समूहाच्या पुढाकारातून ‘इटर्नल गांधी’ (शाश्वत गांधी) आउटलेट्स स्टोअर सुरू करण्यातआले आहे. गांधीजींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन जवळपास 100 हुन अधिक वस्तूंचा शाश्वत गांधीमध्ये समाविष्ट आहेत. यात गांधीजींची तीन माकडे, खादी शर्ट्स, मग्स, पेन्स, किचैन्स, पझ्झल क्युब्स, मॅग्नेट, नोटपॅड, कॅलेंडर, सिरॅमिक स्टॅच्यु, पेपर वेट, बुकमार्क्स समावेश आहे. या ‘शाश्वत गांधी’ उपक्रमामुळे युवापिढीच्या विचारांना सकारात्मक दिशा मिळणार आहे, अशी माहिती ‘शाश्वत गांधी’चे संकल्पक भरत पारेख यांनी दिली.
पुण्यातील जंगली महाराज रोडवर सुरु करण्यात आलेल्या ‘शाश्वत गांधी’ स्टोअरचे उद्घाटन बिर्ला समूहाच्या राजश्री बिर्ला यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधताना भरत पारेख बोलत होते. याप्रसंगी स्टोअरचे प्रमुख केतनजोशी, शोनीता जोशी आदी उपस्थित होते.
उद्धघाटनानंतर बोलताना राजश्री बिर्ला म्हणाल्या, जनसामान्य लोकांना ज्या वस्तू उपयोगी ठरतील अशा वस्तूंचा आपण या स्टोअर मध्ये समावेश केला आहे. बिर्ला परिवारातील सर्वच सदस्य गांधी विचारांनी प्रेरित झाले आहेत. गांधीजींचे हेच प्रेरणादायी विचार जनसामान्यांपर्यंत आणि आजच्या नवीन पिढीपर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. इटर्नल गांधी (शाश्वत गांधी) च्या माध्यमातून गांधीजींची शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम हाती घेतले आहे. आणि यास लोकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.
भरत पारेख म्हणाले,”देशभरात विविध ठिकाणी ‘शाश्वत गांधी’ स्टोअर उभारून समाजात अहिंसेची भावना रुजविण्याचा हा प्रयत्न आहे. भारताबाहेरही काही ठिकाणी त्याची सुरुवात होत आहे. अनेकांकडून याचे स्वागत होत आहे. आदित्य बिर्लासमूहाच्या वतीने अशी अनेक आऊटलेट सुरु केली जाणार आहेत. पुण्यातील सर्वात पहिले स्टोअर सुरू करण्याचा मान केतन जोशी यांना मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. न्याय, अहिंसा, समानता आणि शांतताप्रस्थापित करण्यासाठी भविष्यात ‘शाश्वत गांधी’ महत्वाची भूमिका बजावेल.”
गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, अहिंसा, प्रेम या मूल्यांना प्राथमिक स्तरावर ठेवून स्टोअरमधील प्रत्येक वस्तुला गांधीजींच्या विचारांची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नव्या पिढीला गांधीजींचा संदेश सदैव लक्षात राहावा. त्यातून आताच्या युवा पिढीने आदर्श घेऊन नवीन वाटचाल करावी या हेतूने या इटर्नल गांधी या आउटलेट स्टोअर सुरु केले आहे, असे केतन जोशी यांनी सांगितले.