अलिबाग : बेरोजगार असणाऱ्या तरुणांना नोकरीसाठी चप्पल झिजवायला लागत असतात. काही अपवृत्तीची लोक अशा बेरोजगार तरुणाचा फायदा घेऊन नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने पैसे उकळून फसवण्याचे काम करतात. तर नोकरी मिळणार या आनंदाने मागचा पुढचा विचार न करता लाखो रुपये डोळे झाकून देतात. अशीच घटना अलिबागमध्ये घडली असून शासकीय नोकरी देतो अशा भुलथापा मारीत गुंजीस येथे राहणाऱ्या दिनेश राऊत यास १५ लाखाचा गंडा घालीत फसविल्याने त्याने अलिबाग पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी दिनेश राऊत रा. गुंजीस, अलिबाग यांना २ आरोपि राकेश सानप व प्रचिती थिटे रा.रोहा यांनी शासकीय नोकरी देतो असे सांगून सन २०१२ ते २०१३ या दरम्यान दिनेश राऊत यांचेकडून १५ लाख रुपये घेवून त्यांना नोकरी लागल्याचे बनावट नियुक्ती पत्र घेवून त्या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का मारून, बनावट सह्या करून नोकरी न लावता फिर्यादी यांची फसवणूक केली. याबाबत दिनेश राऊत यांनी प्रथम स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करुन याबाबत अलिबाग पोलीस त्या दोघांविरोधात भा.दं.वी.कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई एस.एस.शेंबडे हे करीत आहेत.
नोकरीच्या आमिषाने अनेक बेराजगार तरुणांना लाखोंचा गंडा घालण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या आमिषांना कोणीही बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शासकीय नोकरी लागणार म्हणून १५ लाख दिले, फसविले गेलो समजल्यावर पोलीस ठाणे गाठले: अलिबागमधील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल
Team TNV August 19th, 2017 Posted In: येवा कोकणात
Team TNV