– शिवजयंती महोत्सव समितीतर्फे एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपती पुतळ्यासमोर दीपोत्सव
पुणे – तुतारीची ललकारी… सनईचौघड्याचा मंगलमय सूर आणि श्री शिवछत्रपतींचा प्रचंड जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमीरातून तेजाकडे नेणा-या अष्टसहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. श्री शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक पुतळ्यासोबतच सरदार कान्होजी जेधे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासोबतच सरसेनापती वीर बाजी पासलकर, मानाचे पहिले पान सरदार कान्हेजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनोबत सरसेनापती येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यां स्वराज्यघराण्यांच्या प्रतिनिधींचा स्वराज्यरथ सोहळ्यामध्ये 5 वर्षे पूर्ण केल्याहद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन गौरव करण्यात आला.
निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव 2017, पर्व 6 चे. शिवाजीनगर येथील श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा येथे आयोजित दीपोत्सवाचे उद््घाटन पुणे मनपा सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मंगोलीया येथे शरीरसौष्ठव स्पर्धेत मीस्टर वर्ल्ड किताब विजेते महेंद्र चव्हाण, समितीचे संकल्पक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. शिवरायांचरणी ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली. यंदा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात प्रथमच सहभागी झालेल्या गरुड, घारे, काटे, निंबाळकर, संत तुकाराम महाराज भक्तीशक्ती, महाडीक आणि कोंढाळकर या स्वराज्यघराण्यांचा सन्मान करण्यात आला.
श्रीनाथ भिमाले म्हणाले, पुण्यात साज-या होणा-या दिपोत्सवाचा शिरोमणी म्हणून हा दिपोत्सव पुणेकरांच्या ह्रदयात विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यासारखा दिमाखदार उत्सव साजरा होतो. हा सोहळा भव्यदिव्य साजरा करण्यासाठी आम्ही सहकार्य करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
समितीचे संस्थापक गायकवाड या संकल्पनेविषयी माहिती देताना म्हणाले, या ऐतिहासिक पुतळ्याने 90 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुतळयाचे वजन 8 हजार किलो आहे. त्यामुळे सलग सहाव्या वर्षी प्रत्येक किलोमागे एक पणती अश्या 8 हजार पारंपरिक पणत्यांची अभुतपूर्व मानवंदना दिली आहे. ज्या अस्मितेने, उत्साहाने पणत्या प्रज्वलित केल्या जातात, त्यामुळे प्रत्येक पणती आम्हाला सुयार्सारखी प्रखर तेजस्वी उर्जा देऊन जाते. सर्व स्तरातील लोकांच्या विशेष करुन महिलांच्या प्रचंड सहभागाने हा दिपोत्सव आता लोकोत्सव झाला आहे आणि अल्पावधितच महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचला आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे नियोजन रवींद्र कंक, सचिन पायगुडे, गिरीश गायकवाड, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, निलेश जेधे, अनिल पवार, किरण देसाई, राजाभाऊ ढमढेरे, गोपी पवार, मयुरेश दळवी, किरण कंक, निलेश जगताप, युवराज शिंदे, सुशांत साबळे, सुभाष सरपाले यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले.