पुणे – शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मराठवाडा विदर्भासह राज्याच्या कानाकोप-यातून शिक्षण घेण्यासाठी शेतक-यांची मुले येतात. अनेकदा आर्थिक परिस्थिती नसतानाही कर्ज काढून शिक्षणासाठी डोनेशन देणे त्यांना भाग पडते. काही वेळा आर्थिक बाजू कमकुवत असल्याने अन्यायही सहन करावा लागतो. त्यामुळे प्रथमत: शेतक-यांच्या गरजू विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याचे काम रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पुणे शहर व जिल्हयामध्ये हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे राज्य युवक अध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रयतचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर उपस्थित होते. संघटनेच्या मुख्य कार्यकारिणीची बैठक पुण्यामध्ये नुकतीच पार पडली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते भानुदास शिंदे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी पुणे आणि इतर जिल्हयांच्या नेमणुकांसह काही महत्त्वपूर्ण निर्णय व नियोजन करण्यात आले.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, शेतक-यांच्या मुलांना शैक्षणिक संरक्षण देण्याकरीता रयत क्रांती संघटनेचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. रयतच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिकरित्या किंवा संघटनेच्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास ती त्वरीत सोडविण्याकरीता पुढाकार घेण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान कौशल्य विकास योजना व रोजगार माहिती, शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान या आवश्यक गोष्टी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे.
ते पुढे म्हणाले, आठवडे बाजार सारखी योजना ठिकठिकाणी राबवून पुणे आणि परिसरातील शेतक-यांचा माल मोठया प्रमाणात थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरीता रयतचे कार्यकर्ते दुवा म्हणून काम करतील. याबाबतचे पुढील सविस्तर नियोजन सुरु असून जिल्हयातील शेतक-यांशी चर्चा झाली आहे. तसेच वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून पुणे शहरातील वाहतूक, कचरा असे मुलभूत प्रश्न देखील सोडविण्याकरीता प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शुक्रवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे सोलापूर हायवे रोड वरकुटे फाटा येथे साखर कारखान्यांच्या कार्यवाहीबाबत ऊस वाहतूक बंद आंदोलन करण्यात येणार आहे.