समुद्री आपत्तीतील बचावाचे ठिकाण

January 16th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

हेमंत कुलकर्णी

 

कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदराचा उल्लेख केला जातो. या बंदराच्या चारही दिशांना डोंगर, पश्चिम दिशेला समुद्राचे विस्तीर्ण ५०० मीटरचे प्रवेशद्वार अशी देवगड बंदराची नैसर्गिक, भौगोलिक रचना आहे. कोकण किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरे पश्चिमेकडे तोंड करून वसली आहेत. मात्र, एकमेव देवगडची जेटी पूर्वेकडे तोंड करून बांधली आहे. कितीही वेगाने वाहणारे वादळवारे असोत देवगड बंदरातील पाण्यावर साधा तरंगही उठत नाही. म्हणूनच वादळ वा-यात देवगड बंदर सुरक्षित समजले जाते. कोकण किनारपट्टीवरील सर्वात खोल बंदर विजयदुर्ग आहे. तर सर्वात सुरक्षित बंदर देवगड आहे. ही दोनही बंदरे देवगड तालुक्यात वसली आहेत. अलीकडेच आलेल्या ओखी वादळात याचा या बंदरात असलेली सुरक्षितता किती महत्वाची आहे ए लक्षात आले आहे.
देवगड- इ. स. १८७७-७८ साली देवगड बंदरातून ८८,२०७ रुपये किमतीच्या मालाची निर्यात झाली होती. तर रुपये १५,७९,९०७ एवढी आयात झाली होती, अशी नोंद मिळते. फोंडामार्गे कोल्हापूर निपाणीला जाण्यासाठी साधा बैलगाडीचा रस्ता होता. परंतु, त्यावर मोठी रहदारी नसायची. त्यामुळे होणारा वापर अत्यल्प असायचा.
इ.स. १८६० पूर्वीपासूनच देवगड म्हणजे मुंबई, कोचीनपासून गलबताने येणा-या मालाची एक व्यापारी पेठच होती. ब्रह्मदेशाचा तांदूळ व कडधान्ये, साखर इत्यादी कालिकत, कोचीनहून खोबरेल तेल, खोबरे, सुंभ आदी कारवारहून जळाऊ व इमारती लाकूड, १८१५ ते १९२० सालापासून मंगलोरी कौले असा व्यापार १९३९ पर्यंत वाढतच गेला होता. त्याकाळी देवगड बंदरात तर सुमारे २५ गलबते होती. आज हापूस आंब्याच्या पिकाने नावारुपास आलेला देवगड तालुका त्याकाळी ताग व ऊस लागवडीसाठी ओळखला जायचा. त्याकाळी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रात ‘देवगड हेम्प’ हे सदर दररोज प्रसिद्ध व्हायचे. ताग, ऊस, आंबा अशा विविध पिकांच्या हंगामात गलबतांच्या सहाय्याने माल मुंबईमध्ये जात असे. कोकण किनारपट्टीवर ज्या बंदरातून मंगलोरी कौले, आंबे, ताग, ऊस जात होता. ते बंदर आता निर्यातीच्या दृष्टीने निरुपयोगी ठरले आहे.
इ. स. १९३९ ते १९४३ पर्यंत बंदरातील पाण्याची खोली खूप होती. गाळ फारसा नव्हता. देवगड बंदरात पॅसेंजरसाठी उत्तम बोट कंपन्या उपलब्ध होत्या. मात्र इ.स. १९७५ च्या सुमारास ही प्रवासी वाहतूक पूर्ण बंद झाली. तर गलबतांनी होणारी माल वाहतूक १९७०-७५च्या सुमारास बंद झाली.
ब्रिटिशांनी त्या काळी देवगड बंदराचे महत्त्व ओळखले होते आणि म्हणूनच त्या काळी २ लाख रुपये खर्च करून बंदरावर एक धक्का बांधला. ब्रिटिश आरमारातील पाणबुडय़ांना इंधन वगैरेसाठी या धक्क्य़ाचा उपयोग होत असे. या बंदराचा विकास आरमारी बंदर म्हणून करण्याची योजना प्रामुख्याने ब्रिटिशांनी तयार केली होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर या बंदराचा विकास होण्याऐवजी अधोगतीच सुरू झाली.
इ. स. १९७१च्या भारत-पाक युद्धानंतर १९७२ साली भारतीय नौदलाकडून बंदराचे सव्र्हेक्षण झाले. भविष्यात लढाऊ बोटींना रसद पुरवण्यासाठी पश्चिम किना-यावर मुंबई-गोवादरम्यान उपयुक्त अशा देवगड बंदराचा वापर फायदेशीर ठरणारे होते. परंतु, सरकारच्या उदासीनतेमुळेच या बंदराचा विकास झालेला नाही. आता जेटी प्रकल्प सुरू झाल्यावर मच्छीमारी बंदर वसेल. मात्र, येथेही सरकारची उदासीनता दिसून येत आहे.
मुंबईपासून दक्षिणेला १८० मैलांवर देवगड वसले आहे . देवगडचा किल्ला इ. स. १७०५ मध्ये बांधला. या किल्ल्याच्या नावावरूनच या शहराला देवगड नाव पडले असावे. इ. स. १८७६-७७ च्या कालावधीमध्ये मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी देवगड बंदरात बाहेरून आणलेले ५५५ टन धान्य फोंडाघाटमार्गे कोल्हापूरला पाठवण्यात आले होते. कोकण किनारपट्टीच्या प्रमुख जंजिऱ्यांपैकी आरमारी ठाणे म्हणून देवगड जंजि-याचं नाव अदबीनं घेतलं जातं. मराठेशाहीचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी इ. स. १७०५ मध्ये देवगडचा किल्ला बांधला. १८व्या शतकात बांधलेला हा किल्ला चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला होता, असा उल्लेखही आढळतो. विजयदुर्ग किल्ल्याला संरक्षण म्हणूनच आरमाराची विभागणी, शत्रूची टेहळणी, दिशाभूल करणे, दारूगोळा साठवणे अशा हेतूनेच हा किल्ला बांधण्यात आला होता. देवगड बंदराला या किल्ल्याबरोबरच ऐतिहासिक वारसा आहे. एक पर्यटन स्थळ म्हणून देवगड तालुका विशेष महत्त्वाचा आहे. आंबा आणि मासळी यांनी समृद्धी लाभलेली असली तरी हा परिसर मात्र विकासापासून वंचितच राहिला आहे.
देवगड बंदरात साडेतीनशे मच्छीमार आपली उपजीविका करीत आहेत. मच्छीमारी ट्रॉलरवर मच्छीमारी करणा-या ट्रॉलरधारकांबरोबरच अनेक उद्योग अवलंबून असतात. यात मासळीचा लिलाव पुकारणारे, कमिशन एजंट, वाहतूक करणारे टेम्पो, बर्फ विकणारे बर्फ कारखानदार, मच्छीमारी सोसायटीचा कर्मचारी वर्ग, टाकाऊ मासळी विकत घेऊन खत करणारे खटवीवाले, ट्रॉलरला धान्य पुरवणारे व्यापारी, मीठ विक्रेते, मासळी वाहतूक करणारे मजूर, बळे विकत घेऊन सुकवणारे बळेवाले, किरकोळ मासळी विकत घेऊन परगावी विकणारी मासेवाली, हॉटेलला मासे कापून देणा-या बाया, मासळी लिलावात घेऊन ती सुकटे करणा-या महिला, जाळी विकणारे मच्छीमार, सामान विकणारे व्यापारी, ट्रॉलर्स दुरुस्त करणारे, ढकलणारे व ओढणारे मजूर दिवसभराचे काम करूनही संध्याकाळी जादा पैसे कमावून संसाराला हातभार लावणा-या विजापुरी महिला असे समृद्ध जीवन देवगड खाडीने फुलवले आहे. देवगड बंदरात सापडणारी कोळंबी, बांगडे, पापलेट अशी मासळी आजही कोल्हापूर, पुणे, मुंबईकडील पंचतारांकित हॉटेल्समध्ये डिश सजवत आहेत.
किनारपट्टीचे वैभव म्हणून ही बंदरे परिचित होती. कारण कालातीत स्वस्त समजली जाणारी जलवाहतूक सुरू होती. यथावकाश मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व शहरे विकास पावली आणि वाहतुकीची संकल्पनाच बदलली. केव्हा तरी देवगडचा भाग असलेले कणकवली गाव आता देवगडपेक्षा फार मोठे शहर म्हणून नावारूपाला आले आहे. कोकण रेल्वेही याच शहरांचा संदर्भ देत धावते आणि यामुळे विकासाची संकल्पना तीच राहिली आहे. जर कोकण किनारपट्टीचा विकास व्हायचा असेल, तर बंदरातील दळणवळण सुरू झाले पाहिजे.
बंदरातील दळणवळण सुरू नसेल, तर केवळ पर्यटनावर बंदर विकास होणार नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. बंदरांची क्षमता ओळखून बंदरांचा गाळ काढून टाकला पाहिजे. कोकण किनारपट्टीवरील खाडय़ा ही मोठी उपलब्धी आहे. चंद्राकृती वसलेल्या देवगड बंदरातूनच देवगडची खाडी वाहते. आज अतिशय दुर्गम प्रवास असलेले मोंड वगैरे भाग याच खाडीने पूर्वी जोडले होते. या भागातून सहज ये-जा करता येत होती. जुने ते सोने म्हणतात. म्हणूनच देवगडचा विकास किंबहुना किनारपट्टीचा विकास करायचा असेल तर त्याला बंदर विकास करायला हवा. यासाठी स्थानिकांनी आपली मानसिकता बदलायला हवी. प्रवासी वाहतूक बंद पडली, तरी या वाहतुकीचा आढावा घेऊन किनारपट्टीला स्वस्त वाहतूक उपलब्ध करून दिली पाहिजे. तरच बंदरे सुरू राहतील.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions