पुणे – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत असणा-या अनुदानीत, विनाअनुदानीत, खाजगी, सरकारी सर्व शाळांमध्ये सॅनीटरी नॅपकीन डिस्पोजेबल मशिन बसवावे. यासाठी सर्व शाळा व्यवस्थापनांना सक्ती करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. तसेच पिंपरीत महात्मा फुले पुतळ्यामागे पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय स्मारकात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत संग्रहालय उभारावे आणि याठिकाणी शहरातील हुशार, गरजू, महिला, मुलींना उच्चंशिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल असे सुसज्य ग्रंथालय उभारावे.
महानगरपालिका हद्दीत आय टू आर (Industrial to Ressidence) अंतर्गत ताब्यात असणा-या जागेंवर महिलांसाठी उद्योग, प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र उभारावे. तसेच स्मारकाच्या दर्शनी भागात सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारावा. अशीही मागणी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केली आहे.
गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर 17) आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यालयात दुपारी झालेल्या बैठकीत मागणीचे पत्र गिरीजा कुदळे, बिंदू तिवारी, संगीता कळसकर, मीना गायकवाड, हुरबानो शेख यांनी आयुक्तांना दिले.