पुणे – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा तब्बल 3400 किमी.चा 13 राज्यातून प्रवास… तोही सायकलवरून… नववीत शिकत असलेली मुलगी सई व पत्नी जागृतीसह पुण्यातील शास्त्रज्ञ व व्यावसायिक डॉ. सतीलाल ऊर्फ सतीश पाटील यांनी हा अनोखी व साहसी प्रवास केला आहे. 29 दिवसांत सायकलवर दररोज कमीत कमी 100 किमी व जास्तीत जास्त 170 किमीचा प्रवास त्यांनी केला. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचा लांबपल्याचा प्रवास सायकलवरून झाल्याची नोंद आहे. त्याची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही घेतली आहे.
डॉ. सतीलाल ऊर्फ सतीश पाटील हे मूळचे धुळ्याचे आहेत. व्यावसायिक असलेले डॉ. पाटील त्यांच्या कुटुंबियांसोबत हिंजवडीत राहतात. कृषी व पर्यावरण क्षेत्रात ते काम करतात. जागृती पाटील या त्यांच्यासोबतच काम करतात तर, सई ब्ल्यु रिझ पब्लिक स्कूलमध्ये नववीमध्ये शिकते. 15 ऑक्टोबर 2017 ते 13 नोव्हेंबर 2017 दरम्यान त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. जम्मू येथून प्रवासास सुरुवात केली आणि पुढे लुधियाना, पानीपत, दिल्ली, आग्रा, मथुरा, ग्वाल्हेर, लांजीतपूर, छिंदवाडा, नागपूर, हैदराबाद, बंगळुरु, सालेम, कन्याकुमारी असा हा प्रवास झाला. एकूण 13 राज्यातून हा प्रवास झाला त्यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
याविषयी आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, पहाटे 4 वाजता उठून 5.15 ते 5.30 च्या सुमारास आमच्या प्रवासाला सुरुवात व्हायची. 9 वाजता नाष्ट्यासाठी थांबायचो. दुपारी 12.30 ते 1 पर्यंत जेवायला थांबायचो आणि सायंकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान दिवसाचा प्रवास संपवायचो. त्यादरम्यानच मुक्कामाचे ठिकाण ठरवायचो. मुक्कामाची व्यवस्था अगोदर ठरविलेली नव्हती. आम्ही फक्त प्रवास मार्ग ठरविला होता. सायंकाळी ज्या शहरात किंवा गावांत पोहचू तिथेच हॉटेल किंवा लॉज शोधून थांबलो. कोठे थांबायचे हे ऐनवेळी त्या-त्या दिवशीच ठरवायचो.
कुटुंबाचा आत्मविश्वास वाढविणे, स्त्री-पुरुष समानता व फॅमिली फिटनेसचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही प्रवास यात्रा केल्याचे डॉ. पाटील व त्यांच्या पत्नी जागृती पाटील सांगतात. प्रवासाच्या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले की, प्रवासात कोठेही फारशी भिती वाटली नाही. सगळीकडे चांगली माणसं असतात. थोडी काळजी घेतली आणि चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी थांबणे टाळले तर, सहसा कोणतीच अडचण येत नाही. या प्रवासात भारतातील विविधता आणि विविधतेने नटलेला आपला देश पाहता व अनुभवता आला. भारतीय असल्याचा अभिमान प्रवासानंतर वाढला आहे.
या प्रवास यात्रेच्या तयारीचा भाग म्हणून सायकल चालविण्याचा सराव केला. जिममध्ये फिटनेस वाढविला. डायट व्यवस्थित ठेवला. साधारणपणे एक ते दीड महिना अगोदर सराव सुरु केला. मानसिक तयारीसाठी 25, 50, 100 किमी च्या टप्प्यात वाढ करीत सायकल चालविण्याचा सराव केला. एका दिवसात 100 किमी चा प्रवास झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या जम्मू ते कन्याकुमारी अंतर सायकलवर पार करू असा आत्मविश्वास मिळाला. यापूर्वी पुणे ते गोवा प्रवास सायकलने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सहकुटुंब केला होता. मित्रांसोबत चार वर्षांपूर्वी पुणे ते सिंगापूर असा प्रवास केला. होता. हे अनुभव पाठीशी होते.
कुटुंबासोबत महिनाभर वेळ घालवता येण्याबरोबरच कुटुंबाला आत्मविश्वास देण्याचे काम यातून झाले. आरोग्य उत्तम राहण्यासाठी सायकल चालविणे महत्वाचे असून त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा उद्देश होता, असेही पाटील दांपत्य म्हणाले. तर, कुटुंबासोबत सायकलवर भारतातील विविध प्रांताचे दर्शन घडले. येथील संस्कृती, वेशभूषा, भाषा अशा सर्वच स्तरावर खूप वेगळ्या भारताचे दर्शन घडले. त्याचा खूप आनंद वाटतो आहे, असे सईने सांगितले.