पुणे – पोलिसांच्या गणवेषाची आणि जबाबदारीची जाणिव वेळोवेळी वरिष्ठांनी करुन दिली. त्यामुळे नेहमी सामाजिक दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवून निर्णय घेतले. अशी भावना निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक बागवान यांनी व्यक्त केली.
आकुर्डीतील बीना एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 2017 चा कौमी एकता (राष्ट्रीय एकात्मता) पुरस्कार मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना कर्नल इर्षाद अहमद खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इकबाल खान, सचिव रफीक आतार, मुख्याध्यापिका समीना मोमीन, खजिनदार हमजा खान, सरचिटणीस आझम खान, विश्वस्त मतलूब उस्मानी, अकमल खान, अब्दुलाह खान, ॲड. कुंडलीक गावडे आदी उपस्थित होते.
बागवान म्हणाले की, बारामतीमध्ये शेतकरी कुंटूंबात माझा जन्म झाला. वडीलाच्या कडक शिस्तीमुळे लहानपणापासूनच व्यायामाची सवय लागली. शालेय जीवनात पोलिसांचा गणवेष आणि त्यांचा रुबाब मला आकर्षित करीत होता. त्यामुळे मी शालेय व महाविद्यालयीन काळात एनसीसीमध्ये सहभाग घेतला. पोलिस खात्यात भरती झाल्यानंतर मधूकर झेंडेंसारख्या वरिष्ठांकडून खूप शिकायला मिळले व सामाजिक जबाबदारीची जाणिव झाली. त्यातूनच समाजाला वेठीस धरणा-या मन्या सुर्वे या गुंडाचा एन्काऊंटर केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सापळा लावून 26/11 च्या हल्ल्यात साडेतीनशे निरपराध नागरिकांचे प्राण वाचवू शकलो. माझे वरिष्ठ अधिकारी मधूकर झेंडे आणि डॉ. वेंकटेश या कडक शिस्तीच्या अधिका-यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझा निवृत्तीनंतर तिसरे राष्ट्रपती पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. असेही बागवान यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नल इर्षाद अहमद खान मार्गदर्शन करताना म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावण्यासाठी बीना इंग्लिश मिडीअम स्कूल सारख्या संस्था काम करतात. यातूनच सर्व जाती धर्मांचा आदर करणारी सुसंस्कृत पिढी घडेल असा मला विश्वास आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी जीएसटी, नोटाबंदी, महागाई, बालमजूरी, 26/11 हल्ला, महिला व लहान मुलांची तस्करी आणि राष्ट्रीय एकात्मता याविषयावर नाटीका सादर केल्या.
स्वागत इकबाल खान, सूत्रसंचालन रफीक आतार आणि आभार समिना मोमीन यांनी मानले.