विवेक ताम्हणकर
मच्छीमारांचा मित्र म्हणून ओळखलया जाणाऱ्या पांढऱया पोटाच्या समुद्री गरुडांची संख्या कमी होत चालली असून सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात फक्त ४६ घरटी युएनडीपीतर्फे हाती घेण्यात आलेल्या पक्षी जैवविविधता अभ्यास सर्वेक्षणात आढळून आली आहेत. त्यातील २३ गरुडांच्या पायांना टॅग लावण्यात संशोधकांना यश आले आहे. समुद्री गरुडाची घटणारी संख्या सध्या चिंतेचा विषय बनली आहे. जिल्ह्याच्या किनार पट्टी भागात केलेल्या या अभ्यास सर्वेक्षणात विविध प्रकारच्या तब्बल २५३ जातींच्या पक्षांचा वावर आढळून आला आहे. यामध्ये जगात अतिदुर्मीळ म्हणून ओळखल्या जाणाऱया चार पक्ष्यांचा समावेश आहे.
युएनडीपी आणि ग्लोबल इन्व्हॉयरमेंट फॅसिलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सागरी आणि किनारपट्टी भूप्रदेशातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्याबरोबरच तिला उत्पादनक्षम प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून आर्थिक मदत मिळालेला हा प्रकल्प राज्य वनविभागाच्या कांदळवन विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी कोईमतूर येथील सलीम अली पक्षी अभ्यास केंद्राची मदत घेण्यात आली आहे. या अभ्यास व सर्वेक्षणात किनारपट्टीवरील पक्षीगणना, जातीनिहाय मुबलकता, त्यांचा अधिवास, प्रजनन, घरटी बांधण्याचा कालावधी इत्यादींचा समावेश करण्यात आला. अतिशय समृद्ध अशी पाण्याखालील जैवविविधता असलेल्या सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पक्षी जैवविविधताही तेवढीच समृद्ध असल्याचे या अभ्यासपूर्ण पाहणीत आढळून आले आहे. गरुडाची घटती संख्या चिंतेचा विषय आहे.
या सर्वेक्षणात देवगड, मालवण व वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी भागात तब्बल २५३ पक्ष्यांच्या जाती नोंदविल्या गेल्या. यापैकी ८० जातींचे पक्षी हे हिवाळय़ात स्थलांतर करणारे आढळून आले आहेत.विशेष म्हणजे त्यातील चार जाती या जगामध्ये अतिदुर्मीळ जाती म्हणून ओळखल्या जातात. युरेशियन कर्ल्युन, सँडपायपर कर्ल्युन, बारटेल्ड गॉडविट, पॅलिड हॅरियर, अमूर फाल्कन, युरेशियन रोलर आणि कॉमन बझार्ट यासारख्या दुर्मीळ गटात मोडणाऱया पक्ष्यांची नोंद झाली. वेंगुर्ले तालुक्यातील काही समुद्री बेटांवर सुमारे ६ हजार ५०० टर्न जातीचे पक्षी आढळून आले आहेत. ग्रेटर क्रेस्टेड आणि रोझेट या टर्नस पक्ष्यांच्या जाती विणीच्या हंगामात वेंगुर्ले रॉक्स या ठिकाणी संशोधकांना आढळून आल्या.
पक्षी निरीक्षण आणि पक्षी अभ्यासाबरोबरच येथील स्थानिक जनतेला पर्यटनाविषयी एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग निर्माण व्हावा, हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमांतर्गत निसर्गवाचनासाठी तिन्ही तालुक्यात मिळून जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. जिथे पक्ष्याव्यतिरिक्त इतरही अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. यासाठी स्थानिक स्तरावरील ६७ युवकांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हे मार्गदर्शक पर्यटकांना येथील जैवविविधतेची माहिती देतील आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन कसे करावे, याचे मार्गदर्शनही करतील. यासाठी देवगड तालुक्यातील वाडातर व मिठबाव, मालवणमधील हडी व वेंगुर्ल्यातील वेंगुर्ले आणि कर्ली ही ठिकाणे निसर्ग निरीक्षणासाठी निवडण्यात आली आहेत.