गोव्यातील वैदकीय उपचाराचा तिढा सुटला
पणजी (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य सरकारच्या वैद्यकीय विमा योजने अंतर्गत दाखल झालेल्या रुग्णांना गोवा बांबुळी येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मोफत उपचार घेता येणार आहेत. त्यामुळे गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची झालेली गैरसोय आता थांबणार असून जिल्ह्यातील रुग्णांना हा मोठा दिलासा आहे.
गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आज गोवा येथे हि माहिती दिली गोवा बांबुळी येथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातील रुग्णांना एक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दाखल करून घेण्यात येणार असून ज्यांचे केशरी आणि पिवळे रेशनकार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यावर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत अशी माहिती राणे यांनी दिली आहे. या “रुग्णांवर उपचार केल्यानंतर महाराष्ट्र सरकार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत गोवा सरकारला रक्कम देणार आहे. त्यामुळे गोव्यातील नुकसान टाळता येणार आहे असे राणे यांनी पत्रकारांना सांगितले. गोव्यात महाराष्ट्रातील रूग्णांना विनामूल्य वैद्यकीय उपचार थांबवण्याआधीच राणे यांनी या प्रकरणी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान सध्याच्या व्यवस्थेमुळे सिंधुदुर्ग परिसरातील रुग्णांना मदत होणार आहे. असेही राणे यांनी यावेळी सांगितले.