सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निकेत पावसकर : सांस्कृतिक संचित जपणारा छंदवेडा तरुण : ६०० पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील व्यक्तींची हस्ताक्षरे आहेत संग्रही : गेल्या १२ वर्षांपासून अक्षरांचे मोती जमा करतोय : विविध व्यक्तींशी जुळली पत्रमैत्री

July 31st, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

विवेक ताम्हणकर

जोपासना करा छंदाची,
जोड द्या आनंदाची…
वाढ व्हावी संग्रहाची,
मग चिंता कसली वावग्या फदाची
काही लोक आपण जोपासलेल्या छंदात इतके गढून जातात कि, छदालाच सर्वस्व मानतात. आपले आयुष्य त्याकामी वेचतात आणि वेध लागतात ते उत्तुंग अशा अनोख्या मात्र प्रामाणिक आणि तेवढ्याच संयमी कामाचे. अशाचप्रकारचा अनोखा छंद जो अनेक तरुणांना आदर्श वाटेल किंबहुना सांस्कृतिक संचित जपणारा हा संग्रह जोपासला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर या तरुणाने. गेल्या १२ वर्षांपासून तो हा छंद अगदी वेड्यासारखा जोपासत आहे. विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश असलेल्या या छंदात त्याच्याकडे ६०० पेक्षा जास्त व्यक्तींची हस्ताक्षरे व स्वाक्षर्या समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे या संग्रहामुळे अनेक मान्यवर व्यक्तींशी तो अगदी जवळचा स्नेही बनून गेलाय.
मुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील असलेला निकेत गेल्या दहा वर्षांपासून विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या हस्ताक्षरांचा संग्रह करीत आहे. साहित्यिक, कवी, विचारवंत, अभिनेते, दिग्दर्शक, शास्त्रज्ञ, निर्माते, संगीतकार, गीतकार, छांदिष्ट, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, क्रीडापटू, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील सुमारे सहाशे पेक्षा जास्त व्यक्तींची हस्ताक्षरे त्याच्या संग्रहात समाविष्ट झाली आहेत. २००६ साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा यांच्या पत्रापासून सुरु झालेला हा प्रवास आज सहाशे पेक्षा जास्त हस्ताक्षररुपी मोती आणि सांस्कृतिक संचिता पर्यंत जाऊन पोहोचला आहे.
निकेत गेल्या बारा वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमधून पत्रकारिता करीत आहे. तर राज्यभरातील विविध विषयांवर प्रसिद्ध होणार्या दिवाळी अंकामधून लेखन करीत आहे. या आपल्या छंदाबाबत माहिती देताना निकेत म्हणाला कि, प्रारंभी परिचित व अपरिचित व्यक्तींना विविध औचित्य साधून शुभेच्छा व अभिनंदन करणारी पत्रे पाठवायचो. परंतु, शेकडो पत्रे पाठवूनही कोणाकडूनही उत्तर नाहि आले. त्यानंतर विविध क्षेत्रांतील व्यक्तींना अशी पत्रे पाठवू लागलो. विशेष म्हणजे अशा व्यक्तींची पत्रे येऊ लागली. त्यांच्याशी एक वेगळीच पत्र मैत्री जमली. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आत्माराम भेंडे, गणपत पाटील, ललित लेखक रवींद्र पिंगे, सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रवीण दवणे, अभिनेते, छांदिष्ट शशिकांत खानविलकर यांच्यासह अनेकांशी घट्ट पत्रमैत्री जमली. त्यातून आपलेपणा वाढू लागला.
त्यानंतर २००६ साली ज्येष्ठ कवी विंदांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. अवघ्या मराठी सारस्वत आणि कोकणातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मग, माझ्यासारखा ‘विंदा’प्रेमी तरी कसा स्वस्थ बसेल? मीही त्यांचे अभिनंदन करणारे पत्र आणि विंदांच्या अभिप्रयाकरिता एक कविताही पाठवली. आणि विशेष म्हणजे विंदांनी आपल्या वाचाकांप्रती असलेल्या रुनानुबंधामुळेच स्वहस्ताक्षरात आभार पत्र पाठविले. खर्या अर्थाने तेच पत्र माझ्या हस्ताक्षर संग्रहाला कारणीभूत ठरले.
विंदांचे ते पत्र त्यावेळी अनेकांना मी दाखवायचो त्यावेळी त्यांच्याकडून मिळणाऱ्या अभिप्रायामुळे नाविन्यपूर्ण आणि वेगळे काहीतरी करावे अशी कल्पना पुढे आली. दरम्यान मी अनेक वृत्तपत्रांमधून पत्रलेखन करीत होतोच. पत्रलेखन व पत्रकारीतामुळे अनेक ठिकाणच्या लोकांशी मैत्री जमली होती. त्यामुळे विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश गोळा करण्याची कल्पना पुढे आली. आणि हा छंद वृन्धिगत होण्यासाठी पाऊल पडत गेले.
यामुळे मग अशा व्यक्तींना पत्र पाठविण्यासाठी पत्ते मिळविणे, पत्ते नसतील तर दूरध्वनी क्रमांकांवरुन संपर्क साधून पत्र पाठविणे, पहिल्या पत्रानंतर पुन्हा संपर्क साधून स्मरण करून देणे, पुन्हा पत्र पाठविणे, दूरध्वनीवरून संपर्क साधने, सतत त्याचा पाठपुरावा करणे, पहिले पत्र….. दुसरे….. तिसरे….. पाचवे….. दहावे….. पंधरावे….. विसावे पत्र….. अशी अनेक पत्र पाठवून पुन्हा पुन्हा संपर्क साधने हे काम सुरूच होते, अगदी आजही सुरूच आहे. त्यात मग एक एक नक्षत्र एकत्र येत गेल. असा क्रम नित्यनेमाने चालू झाला. त्यामुळे एक ध्येय्य निश्चित झाले. आजपर्यंतच्या या संग्रहामध्ये विविध साहित्यिक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, शास्त्रज्ञ, संगीतकार, छांदिष्ट, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, क्रीडापटू, विचारवंत अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींची हस्ताक्षरे संग्रहामध्ये एकत्रित झाली. अशाप्रकारच्या अनेक व्यक्तींना जवळून अनुभवता आले. या छंदामुळे विविध क्षेत्रातील व्यक्तींशी परिचय झाला. नवीन नाते निर्माण होतानाच त्या नात्यामधील आपलेपणा वाढत गेला.
अर्थात हा छंद अजूनही खूप प्राथमिक अवस्थेत आहे, याची मला जाणीव आहेच. त्यामुळे अजूनही भविष्यात खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. यासाठी वेळोवेळी सहकार्य करणार्यांसह प्रोत्साहन देणारेहि तितकेच महत्वाचे वाटतात. गेल्या दहा वर्षांनंतर सहाशे पेक्षा जास्त वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अतुल्य कामगिरीने ठसा उमठविलेल्या व्यक्तींची हस्ताक्षरे व स्वाक्षर्या आहेत.
यात प्रातिनिधिक म्हणून खालील नावांचा उल्लेख करता येईल…..

प. पू. श्री. श्री. सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी,

गायक-संगीतकार-गीतकार : लता मंगेशकर, पं. यशवंत देव, सुलोचना चव्हाण, सुप्रसिध्द गीतकार गुरु ठाकूर, सुप्रसिध्द गीतकार जगदीश खेबुडकर, मराठी शुभेच्छा पत्रांचा सौदागर, कवी प्रसाद कुलकर्णी, दासू वैद्य, गीतकार प्रवीण दवणे, संदीप खरे, कौशल इनामदार, मुग्ध वैंशपायन, रोहित राऊत, मधुरा कुंभार, वर्षा भावे, अवधूत गुप्ते, अशोक पत्की, अच्युत ठाकूर

शास्त्रज्ञ : डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. वसंत गोवारीकर, निरंजन घाटे,

समाजसेवक / स्वातंत्र्यसैनिक : डॉ. राणी बंग, अण्णा हजारे, डॉ. विकास आमटे, विद्या बाळ, नसीमा हुरजूक, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. शांतीभाई पटेल, प्रा. चंद्रकांत पाटगावकर, रजिया सुलताना,

क्रीडा : गुरुवार्य रमाकांत आचरेकर, आंतरराष्ट्रीय रग्बीपटू सचिन म्हस्कर, कबड्डीपटू सुवर्णा बारटक्के, प्रशांत जालंदर, जयेश राणे,

साहित्यिक : ज्ञानापीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, प्रा. राम शेवाळकर, हास्यकवी अशोक नायगावकर, गंगाधर महांबरे, इंद्रजीत भालेराव, ना. धो. महानोर, गझलकार प्रदीप निफाडकर, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी, गीतकार अरुण म्हात्रे, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, अजय कांडर, वीरधवल परब, विठ्ठल वाघ, प्रतिमा इंगोले, रेणू पाचपोर, दत्ता हलसगीकर, प्रसन्नकुमार पाटील, ग. प्र. प्रधान, भालचंद्र नेमाडे, आनंद यादव, ह. मो. मराठे, श. ना. नवरे, फादर दिब्रिटो, द. मा. मिरासदार, सुभाष भेंडे, बाबा कदम, ज्येष्ठ विचारवंत प्रा. राम शेवाळकर, रा. ग. जाधव, ज्येष्ठ ललित लेखक रवींद्र पिंगे, वी. आ. बुवा, नागनाथ कोत्तापल्ले, दत्ता भगत, डॉ. मधुसूदन घाणेकर, शिरीष पै, मधुमंगेश कर्णिक, विजया वाड, व्याख्याते सच्चिदानंद शेवडे, डॉ. आ. ह. साळुंखे, द. ता. भोसले, विश्वास मेहेंदळे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. सुनीलकुमार लवटे, शिरीष काणेकर, गिरीजा कीर, श्रीराम पंचींद्रे, मिलिंद बोकील, गंगाधर पानतावणे, अशोक चौसाळकर, पन्नालाल सुराणा, राजेंद्र खेर, वि. शं. चौघुले, निरंजन घाटे, चंद्रकुमार नलगे, ल. म. कडू, माधव गवाणकर, सुप्रिया वकील, गो. मा. पवार, म. द. हातकनंगलेकर, प्रा. रा. तू. भगत, लीलाधर हेगडे, आकाशानंद, उत्तम कांबळे, प्रा. केशव मेश्राम, रामदास भटकळ, अनंत मनोहर, बाबा भांड, यशवंत पाटणे, वि. भा. देशपांडे, पू. द. कोडोलीकर, दुर्गेश सोनार, शिवराज गोर्ले, अच्युत गोडबोले, रत्नाकर मतकरी, अनिल गजभिये, वैजनाथ महाजन, ज्ञानदा नाईक, उर्मिला पवार, ज्ञानेश्वर मुळे, प्रमोद जोशी, कवी सुर्यकांत खांडेकर, वि. भा. देशपांडे, रा. ग. जाधव, गिरीजा कीर, नागनाथ कोत्तापल्ले, शिरीष काणेकर, अनंत मनोहर, बाबा भांड, लोककला अभ्यासक-ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, संपादक लेखक घनश्याम पाटील

राजकीय : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, आमदार संभाजीराव पाटील (बेळगाव दक्षिण विभाग)

चित्रपट – नाट्य कलाकार / दिग्दर्शक : ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे, गणपत पाटील, नसिरुद्दीन शाह, नाना पाटेकर, अमोल पालेकर, विक्रम गोखले, बिंदू, लारा दत्ता, राहुल सोलापूरकर, सुलभा देशपांडे, शिवाजी साटम, भालचंद्र कुलकर्णी, जनार्दन परब, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, डॉ. अमोल कोल्हे, अंकुश चौधरी, भाऊ कदम, सुमित राघवन, शीतल क्षीरसागर, मनोज कोल्हटकर, पुष्कर क्षोत्री, भार्गवी चीरमुले, इला भाटे, माधव वझे, दिगंबर नाईक, योगेश सोमण, संजय मोने, पंढरीनाथ कांबळे, निर्मिती सावंत, आदेश बांदेकर, विकास कदम, संजय नार्वेकर, अभिजित चव्हाण, विजय पटवर्धन, विजय गोखले, नारायण जाधव, स्मृती पाटकर, सुनील बर्वे, शेखर फडके, विमल म्हात्रे, संजय मोहिते, पूजा देवकर, रवींद्र मंकणी, कलादिग्दर्शक नितीन देसाई, नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, दिग्दर्शक सुमित्रा भावे, दिग्दर्शक सई परांजपे, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, दिग्दर्शक रवी जाधव, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक केदार शिंदे, संतोष पवार, लेखक,दिग्दर्शक,अभिनेता,निर्माता अशोक समेळ, रामदास कामत, प्रेमानंद गज्वी, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, अभिनेते अनंत जोग, संदीप गायकवाड, अविनाश खर्शीकर, संजय खापरे, सुनील बर्वे, राजकुमार तांगडे, पत्रकार रवींद्र पाथरे, समीर चौघुले, भूषण कडू, सचिन सुशील, अरविंद जगताप, अनिल गवस,

व्यंगचित्रकार / चित्रकार : मंगेश तेंडूलकर, विकास सबनीस, रवी परांजपे, किशोर नादावडेकर, श्यामकांत जाधव, ल. म. कडू,

अच्युत पालव, भीमराव पांचाळे, विसुभाऊ बापट, विष्णू मनोहर, विठ्ठल कामत, शशिकांत खानविलकर, विसुभाऊ बापट, राजन तेंडोलकर, अशोक कोठावळे, रामदास भटकळ, सत्यजित प्रभू, सुरज साठे, जयराज साळगावकर

या छंदाने तुला काय दिले असे निकेतला विचारले असता, तो म्हणाला कि, या छंदाच्या माध्यमातून आपण आपला वेळ चांगल्या कामासाठी देत असतो. छंद जोपासताना त्यातून नवनवीन अनुभव मिळतात. आपण इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करतो याचा आनंद तर असतोच, परंतु जे मानसिक समाधान मिळते ते खर्या अर्थाने हे सर्व करायला अधिकाधिक बळ देत असते. आपण जोपासत असलेल्या छंदातून नवीन ओळखी होतात. अशा ओळखीतूनच खूप चांगल्या गोष्टी शिकता येतात. हे सर्व करताना आपल्या ज्ञानात, विचारांमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये, बोलण्या – वागण्यात चांगला बदल होतो. एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर मिळविण्यासाठी अनेकदा पत्र पाठवावे लागते. अनेकदा दूरध्वनीवरून विनंती करावी लागते. अनेकवेळा पत्र पाठवूनही खुपदा वाट पहावी लागते. यामुळे संयम वाढतो. तर अनेकदा एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर काहीही करून मिळवायचेच यामुळे जिद्द आणि निश्चय हा गुण आपोआप येत जातो.
इतरांकडे नसलेल्या (दुर्मिळ) वस्तू / हस्ताक्षरे आपल्याकडे आहेत हि अभिमानाची बाब असते. आपण जोपासत असलेला छंद अधिक वृन्ध्दिगत करण्यासाठी अनेकांना भेटावे लागते. त्यामुळे प्रवास होतो. अनेकांच्या भेटी गाठी होतात. अनेकांचे स्वभाव कळून येतात. कळत-नकळत त्या-त्या विषयाचे ज्ञान वाढत जाते. साहजिकच त्यामुळे अशा नामवंत व्यक्तींमधील विनम्रपणा, समृद्धापणा आपल्यातही नकळतपणे येत असतो. आपण आपल्या छंदाव्दारे अनेक दुर्मिळ वस्तू निट सांभाळून ठेवतो. मोठ्या प्रयत्नाने मिळविलेल्या अशा वस्तूंचे मोल अनन्यसाधारण असते. त्यामुळे आपली वस्तू नीट सांभाळून ठेवण्याची, जपून ठेवण्याची सवय लागते. शिवाय उतार वयात आपले छंदच स्वत:च्या मनोरंजनाप्रमाणे इतरांच्या कुतूहलाचा विषय बनतो. असे अनेक प्रकारचे फायदे छंद जोपासन्यामधून मिळत असतात. त्यासाठी मात्र प्रत्येकाने चांगले छंद जोपासावेत. जेणेकरून याच छंदांनी आपल्यासह इतरांचेही आयुष्य उजळून निघेल. खूप काही शिकता येईल. अन तारुण्य आपले चांगल्या गोष्टींसाठी कामी येईल, पर्यायी युवा अवस्थेत वाम मार्गापासून निश्चितच दूर राहता येईल आणि उतारवयात तर त्याचा खुप चांगला उपयोग होईल.
आजच्या इमेल, इंटरनेट, फक्स व भ्रमणध्वनी अशा अत्याधुनिक यांत्राबरोबरच माणसांमाणसांमधील माणुसकी, त्यातील नात्यांमध्येसुद्धा प्रचंड प्रमाणात आधुनिकता आली. अशाप्रकारे संपर्क माध्यमात प्रचंड क्रांती झाल्याने ‘पत्रलेखन’ कमी झाले. आधुनिकतेमुळे जग जवळ आले असे म्हणतात, परंतु माणसांमधील नाती दुरावली गेली. अशा पत्रांची जागा यासारख्या संपर्क माध्यमांनी घेतली. मात्र, एक पत्र जे काम करु शकते ते ना आधुनिक प्रसारमाध्यमे करू शकत ना अन्य कोणीही! अशा पत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्याची ताकद असते. आणि पत्ररूपी त्या कागदाला अनन्यसाधारण महत्व तर प्राप्त होतेच. या संग्रहाच्या निमित्ताने अनेकजण सांगतातही कि, मी तुम्हाला मेल करू का?, व्हाटसअपवर पाठवू का? अशांना मी अत्यंत विनम्रपणे सांगतो कि, या संग्रहासाठी पत्र थोड्या उशिरा पाठविलात तरी चालेल, परंतु मला पोस्टानेच पत्र पाठवा.
या हस्ताक्षर संग्रहाची विशेष आठवण काय सांगाल? असे विचारले असता निकेत म्हणाला कि, या संग्रहाच्या प्रारंभी अनेकांनी मला वेड्यातहि काढले. काय करणार आहेस या कागदांचे? असा प्रश्नार्थक सूर ऐकायला मिळाला. मात्र, मला याच कागदांवर आणि त्यावरील अक्षररुपी मोत्यांवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे तो अधिकाधिक चांगला आकार कसा घेईल याकडे माझे विशेष लक्ष होते. अर्थात त्यासाठी माझा आर्थिक, सामाजिक, शारीरिक पातळीवर कस लागणार तर होताच. दरम्यान या हस्ताक्षर संग्रहाची फाईल ज्येष्ठ नाट्य लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व ९६ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय गंगाराम गवाणकर यांनी पहिली आणि मला अस्सल मालवणी भाषेत म्हणाले, ‘‘तू ह्या सगळ्यांपर्यंत पोचलेलो हस, नाय तू लय पोचलेलो माणूस हस’’ तसेच ज्येष्ठ संगीतकार आदरणीय श्रीनिवास खळे यांना भेटायला गेलो असता, दिल्लीवरून पद्मभूषण पुरस्कार घेऊन नुकतेच आले होते. त्यात त्यांची तब्बेत बरी नसतानाही सर्वप्रथम मला भेटायला होकार दिला. त्यांनी माझा हा संग्रह अत्यंत आपुलकीने आणि आपलेपणाने पहिला. माझ्या कविता स्वत: आग्रह करून म्हणून घेतल्या. आणि म्हणाले, ‘‘तू खूप मोठा होणारच आहेस, खूप खूप मोठा हो…’’ अशाप्रकारच्या अनेक नामवंत व्यक्तीबाबतच्या खूप आठवणी सांगता येतील. त्यातही अनेकांचे आशीर्वाद, प्रोत्साहन आणि शुभेच्छांमुळे हा संग्रह जोपासू शकलो.
या हस्ताक्षर संग्रहाला अभिप्राय देताना ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार ह. मो. मराठे म्हणाले कि, ‘‘आणखी पंचवीस वर्षांनी हा हस्ताक्षर संग्रह ऐतिहासिक महत्वाचा ठरेल. कारण तोपर्यंत सगळेच कंप्युटरवर वळणदार हस्ताक्षरात लिहायला लागलेले असतील.’’
लेखक व पत्रकार शिरीष कणेकर म्हणाले कि, ‘‘टाईप केल्यासारखे तुमचे हस्ताक्षर पाहून आनंद झाला व आपले हस्ताक्षर असे नाही याचे नैराश्य वाटले.’’
कवी प्रमोद जोशी यांनी या हस्ताक्षर संग्रहाला अभिप्राय देताना लिहिले,
अक्षर असू दे खराब / सुंदर,
सवांदाचे माध्यम फक्त !
मूर्ती पाहून भक्ती करावी,
असे कधी ना ठरवी भक्त !

अक्षर आहे म्हणून मित्रा,
संवादाची होते मैफिल !
शब्दही फिरता पाठीवरुनी,
दु:खं उरीची होती गाफील !

तू तर असल्या श्रीमंतीचा /
ऐश्वर्याचा असशी मालक !
पाल्य तुझी ओळीओळीवर,
तुही त्यांचा प्रेमळ पालक !

निमित्त असले अक्षर तरीही,
किती थोरांशी जुळली नाती !
आकाशासह त्यांची माती,
बंदिवान रे तुझ्याच हाती !

वेड तुझे हे किती शहाणे,
छंदामधुनी ध्यास जाणवे !
साचलेपणा कधीच नसतो,
दाखल होई रोज नवनवे !

फुला-फुलातून आणून तू मध,
आयुष्याचे केले पोळे !
चेहर्यावरती गर्व न कसला,
भाव निरामय साधे-भोळे !

कविता समजू नकोस याला,
छंदासाठीचे ‘शुभचिंतन !’
ज्या उंचीवर आज उभा तू,
त्या उंचीला हे अभिवादन !

अक्षर – दर्शक भेट घालूनी,
साक्षीभाव तू जगशी सात्वीक !
फक्त शिंपले उघडून मित्रा,
दाखवशी इतरांना मौक्तिक !

प्रदर्शनातून ‘सु’ दर्शनाचा,
मनात जपशी अ-क्षर हेतू !
दृष्य आणखी, दृष्टी मधला,
निकेत केवळ सुवाच्च सेतू !
तर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते अशोक समेळ यांनी या संग्रहाला अभिप्राय देताना लिहिले, ‘‘येणार येणार म्हणून येणारं तुझं पत्र आत्ताच मिळालं. अतिशय सुंदर, स्वच्छ, नितळ असं तुझं हस्ताक्षर पाहुन तुझ्या अथांग, प्रामाणिक मनाची आणि छंदाची कल्पना आली, तुझ्यासारखीच माणस इतिहास घडवतात, तू घडवशील यात शंका नाही. माझे तुला आशीर्वाद आहेत. आणि तुझ्यासारखा गुणी मुलगा ज्या आईवडिलांच्या पोटी आला, त्यांना माझे दंडवत. तुझ्या सगळ्या आशा आकांक्षा महत्वाकांक्षा पूर्ण होवोत, हि ईश्वरचरणी प्रार्थना.’’
कासार्डे विद्यालयाचे (जि.सिंधुदुर्ग) क्रीडा शिक्षक डी. जे. मारकड यांनी ‘‘आपण जोपासत असलेला छंद खरोखरच जगावेगळा आहे. छंदातून माणूस आनंदी जीवन जगायला शिकतो. हस्ताक्षरातून माणसाचे स्वभाव समजतात. आपण महनीय व्यक्तींचे हस्ताक्षर संग्रह करून त्यांचे स्वभावांचे संग्रह केला आहे. असाच छंद जोपासत रहा.’’ अशाप्रकारचा अभिप्राय दिला.
तळेरे येथील छांदिष्ट डॉ. प्रकाश बावधनकर यांनी ‘‘अक्षर म्हणजे कधीही ‘क्षर’ न होणारा असा म्हणजे कधीही न संपणारा ठेवा आहे. जगातल्या नावाजलेल्या माणसांच्या हस्ताक्षरांचा छंद असणे हे आपल्या सांस्कृतिक उंचीचे प्रतिक आहे. विदेशातीलसुध्दा मोठ्या हस्तींच्या हस्ताक्षरांचा ठेवा आपल्या संग्रहात वाढो / राहो, हि ईश्वरचरणी प्रार्थना! अशा प्रदर्शनातून अनेक छांदिष्ट विद्यार्थी शाळाशाळांतून तयार होवोत.’’ असा अभिप्राय दिला.
अशा विविध प्रकारचे अनेक संदेश आणि अभिप्राय वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे या संग्रहासाठी मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा निव्वळ हस्ताक्षर वा स्वक्षर्यांचा संग्रह नसून तो हस्ताक्षरातील संदेश व स्वक्षर्यांचा असा त्रिवेणी (हस्ताक्षर, संदेश व स्वाक्षरी) संग्रह आहे. हा संग्रह पाहणारा प्रत्येकजण जाताना त्यातून काहीनाकाही घेऊन नक्कीच जातो. चांगला विचार, सकारात्मक दृष्टीकोन, सुंदर अक्षर आणि आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी, हेच या संग्रहाचे यश म्हणता येईल.
हा संग्रह जोपासू लागलो, वाढवू लागलो तसतसे अनेकांशी पत्रमैत्री जुळू लागली. आणि त्यासोबत अनेक आठवणीही येऊ लागल्यात. ज्येष्ठ ललित लेखक रवींद्र पिंगे, चित्रपट नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, आत्माराम भेंडे, अभिनेते शिवाजी साटम, अभिनेते गणपत पाटील, ललित लेखक माधव गवाणकर, गीतकार दासू वैद्य, डॉ. सुनीलकुमार लवटे, गझलकार प्रदीप निफाडकर, अभिनेते, छांदिष्ट शशिकांत खानविलकर, संगीतकार-गायक हर्षित अभिराज, समाजसेविका विद्या बाळ, अभिनेते मनोज कोल्हटकर, कलादिग्दर्शक नितीन देसाई, अभिनेत्री शीतल क्षीरसागर, अभिनेते, दिग्दर्शक संजय मोहिते, नारायण जाधव, अभिनेते विक्रम गोखले, लेखक, प्रकाशक प्राचार्य रा. तू. भगत, कवियत्री प्रतिमा इंगोले, मराठी शुभेच्छा पत्रांचा सौदागर, कवी, गीतकार प्रसाद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय रग्बीपटू सचिन म्हस्कर, दिग्दर्शक अतुल पेठे, डॉ. जयंत नारळीकर, कवी, गीतकार प्रवीण दवणे, स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर, गोवा मुक्ती चळवळीतील सैनिक रामभाऊ राठोड, सत्यजित प्रभू, श्रीनिवास खळे, गंगाराम गवाणकर, फुटबालपटू जयेश राणे या आणि अशा अनेक मान्यवरांच्या बाबतीत वेगवेगळ्या आठवणी आहेत. मला समाधान या गोष्टीचे वाटते कि, ग्रामीण भागात राहूनही देशात व जगात आपल्या कर्तुत्वाने नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींशी मैत्री जुळली. अनेकांशी ओळखी झाल्या. आणि अनेकांची या हस्ताक्षर संग्रहासाठी पत्रे येऊ लागली, अजूनही येत आहेत. हस्ताक्षर संग्रह अधिकाधिक समृध्द होत आहे.
या हस्ताक्षर संग्रहाचे प्रदर्शन ज्याज्या ठिकाणी लावतो, त्यात्या ठिकाणच्या प्रेक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया…..
तुमच्या हस्ताक्षर संग्रहातील ग. प्र. प्रधान सरांचे पत्र पहिले आणि अक्षरशः गलबलून आले, डोळ्यात नकळत पाणी आले.
खरच हे डॉ. अमोल कोल्हे यांचे हस्ताक्षर आहे का?
एवढ्या महनीय व्यक्तींनी तुम्हाला पत्र पाठविली, हीच तुमच्या या छंदाला मिळालेली सर्वात मोठी दाद आहे. तुमच्यासारख्या तरुणांकडे असलेला संयम आणि त्यातून निर्माण झालेली हि नाविन्यपूर्ण कला प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.
कवी गीतकार गुरु ठाकूर यांची हि कविता आणि अक्षर पहा किती सुंदर आहे.
आई… आई… हे बघ जान्हवीचे बाबा.
लता दीदींची स्वाक्षरी बघा कशी आहे?
भीमराव पांचाळे, शशिकांत खानविलकर यांची पत्रे किती सुंदर हस्ताक्षरात आहेत पहा.
अशाप्रकारच्या प्रतिक्रिया हस्ताक्षर संग्रह प्रदर्शना दरम्यान अनेक उत्सुक आणि चौफेर निरीक्षण करणाऱ्या प्रेक्षकांकडून ऐकायला मिळतात. त्यावेळी या संग्रहाबद्दल असणारी उत्सुकता खर तर या संग्रहाला प्रोत्साहनाची मोठी थाप असते. अशाप्रकारचे विविध प्रश्न मलाही समृध्द करणारे असतात. नवीन काहीतरी शिकवीत असतात. शेवटी ‘‘छंदच आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.’’
निकेतचे हे सांस्कृतिक संचित भविष्यात आभाळाएवढे मोठे व्हावे, ह्याच शुभेच्छा. कारण हा ठेवा काही वर्षानंतर अत्यंत दुर्मिळ तर होईलच शिवाय अनेकांना आजच्यापेक्षाही त्यावेळी अधिक जिज्ञासा वाढविणारा ठरेल. निकेतच्या ‘स्वप्नपूर्ती’ मधील ती अक्षरांची खोली अक्षरशः सांस्कृतिक खजिनाने भरलेली दिसून येते. आणि अत्यंत कल्पकतेने, मेहनतीने लावलेली ती हस्ताक्षरे येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत तर करतातच परंतु प्रत्येकाला काहीनाकाही निश्चितपणे देत असतात, आवश्यकता असते ती त्यातून काहीतरी घेण्याची. आणि त्यासाठी येणारा प्रत्येकजण त्यासाठी सजग असला पाहिजे.
‘‘या संग्रहाबद्दल प्रतिक्रिया देताना निकेत म्हणाला कि, हा संग्रह करताना समाधान या गोष्टीचे मिळाले कि, ग्रामीण भागात राहूनही साध्या पोस्टाच्या माध्यमातून माझा राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींशी परिचय झाला. काहींच्या सान्निध्यात वेळ काढण्याचे भाग्य लाभले. तर अनेकांशी खूप चांगली पत्र मैत्रीही जमली. खूप कर्तुत्ववान व्यक्तींशी अगदी जवळचा संबंध आला. यामुळे काहीप्रमाणात माझीही विचार करण्याची दृष्टी बदलली. विचार व आचारात बदल झाला.’’
सुप्रसिध्द हास्यकवी बंडा जोशी निकेतच्या हस्ताक्षर संग्रहाला अभिप्राय देताना सहजतेने लिहिले…..
खूप आगळा छंद आपला, घेता हस्ताक्षरे
लिहिणाऱ्याचा स्वभाव त्यातून, स्वाभाविक पाझरे
दाद आपल्या पत्राला मी, देतो प्रेमादरे
दिलीत आपण सुवर्णसंधी, खूप वाटले बरे

संपर्कासाठी पत्ता :
निकेत पावसकर, (हस्ताक्षर संग्राहक)
९७०, स्वप्नपूर्ती, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. ४१६८०१
९८६०९२७१९९ / ९४०३१२१५६. niketpavaskar@gmail.com

Recent News

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions