प्रियांका अहेर, नवी मुंबई
दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पतीगृही गेलेली नवीन शकुंतला त्यामुळे आल्या पावली परत फिरली. कण्व ऋषींकडे परत आलेल्या या शकुंतलेने गणपतीची आराधना केली आणि दुष्यंताला सारे काही आठवले. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती.
टिटवाळ्याचा महागणपती! महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे, असे म्हणतात. याच परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथेच वाढली. त्यामुळेही या ठिकाणाला एक प्राचीन महत्त्व आहे. टिटवाळा हे छोटेसे गाव मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. टिटवाळा स्टेशनवर उतरले की, मंदिरात जाण्यासाठी रिक्षा मिळतात. पण आश्चर्य म्हणजे इथल्या रस्त्यावर अजूनही टांगे धावतात. टप.. टप.. आवाज करत धावणाऱ्या टांग्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जायला लहान-मोठे सगळ्यांनाच आवडते.
गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. चतुर्थी, मंगळवार या दिवसांशिवाय एरवी फारशी गर्दी नसल्यामुळे रांगेत ताटकळत उभे रहावे लागत नाही. आपण थेट गाभाऱ्यात पोहचतो. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढे आलेली सोंड यामुळे मूर्तीला एक ठसठसीतपणा आला आहे. सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील ह्या मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. मूर्तीला रोज नेटकेपणाने पितांबर नेसवलं जातं. डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मुर्तीवर चांदीचेच छत्र आहे. इथे फुलांची सुरेख आरास केलेली असते. सध्या मोगऱ्याचे दिवस असल्यामुळे मोगऱ्याचे हार छताला बांधले जातात. त्याचा मंद वास संपूर्ण गाभाऱ्यात दरवळत असतो. ही गणपतीची मूर्ती गाभार्यात प्रवेश केल्यापासून आपली नजर खिळवून ठेवते. त्यामुळे आपण आजूबाजूला बघण्याचेच विसरुन जातो. नंतर काही वेळाने लक्ष जाते ते देवघराकडे. जेथे गणपतीची मूर्ती आहे तो संपूर्ण देव्हारा चांदीचा बारीक कलाकुसर केलेला आहे. चांदीच्या देव्हाऱ्यात असलेली केशरी मूर्ती आणि हिरव्या दुर्वा, पांढरी मोगऱ्याची व जास्वंदाची फुले यामुळे सुरेख रंगसंगती साधली जाते आणि बघणाऱ्याची नजर खीळवून ठेवते. गाभारा आणि सभा मंडप मध्ये जाळी लावून वेगळे केले आहे. गाभाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दाराने बाहेर पडून आपण सभा मंडपात पोहचतो. इथे स्वरबद्ध गणपती, अथर्वशीर्षाची आवर्तनं सुरू असतात. सत्य विनायक, गणेश याग इत्यादी भक्तांनी बांधलेल्या पूजा सुरू असतात. त्यांचा एकत्रित ऐकू येणारा नाद मनाला शांती देऊन जातो.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे.
टिटवाळा हे गाव दंडकारण्य जंगलचा भाग होता जेथे कातकरी जमातीची वस्ती होती. पण आता मात्र आदिवासी वस्त्या काळू नदीच्या पलीकडे असलेल्या गावाजवळ आहेत. सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेले हे देउळ प्राचीन असून एका सरोवरात बांधलेले होते. कालौघात यात गाळ साचून देउळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाममात्र राहिले. माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन करवले त्यादरम्यान हे देउळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले व मूर्तीची पुनर्स्थापना केली. त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला. असे सांगितले जाते. १९९५-९६ मध्ये या सभामंडपाचे पुनर्नवीकरण केले गेले. सध्याचे मंदिर पेशवे यांनी दान केलेल्या ३ ते ५ एकर जमिनीवर बांधले गेले आहे, मे २००९ मध्ये मंदिर ट्रस्ट आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांनी मंदिराचे नूतनीकरण पूर्ण केले आहे. मंदिराच्या पुढे टिटवाळा तलाव असून या तलावात अलीकडेच नौकाविहारासाठी तयार केलेल्या सुविधा देखील येथे आहेत. तसेच या गणेश मंदिराशिवाय इतर प्रसिद्ध मंदिरे देखील इथे आहेत.
टिटवाळ्याचा असा हा महागणपती! मन:शांती देणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा आणि हो धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे काही क्षण भक्तांच्या ओंजळीत अलगदपणे घालणारा !
टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर समितीने या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या सहकार्याने एक सामाजिक प्रकल्प घेतला आहे. येथे तयार होणारे दैनंदिन निर्माल्य, तसेच मंदिर परिसरातील फूल विक्रेत्यांजवळील टाकाऊ फुले एकत्रित करून, निर्माल्याची मंदिर परिसरात विल्हेवाट लावण्यासाठी येथे गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून मंदिर व्यवस्थापनाने हा प्रकल्प उभारण्याला अधिक प्राधान्य दिले.
गणेश मंदिरात तयार होणाऱ्या निर्माल्याची व्यवस्थापनातर्फे अनेक वर्षांपासून योग्य विल्हेवाट लावण्यात येत होती. फुले, पाने, सूत एकत्र असलेले फुलांचे हार, वेण्या नाशवंत झाल्यावर, त्याची अन्यत्र विल्हेवाट लावण्यापेक्षा या नाशवंत निर्माल्यावर प्रक्रिया केली तर त्यापासून चांगले खत तयार होईल, असा विचार मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आला. मंदिर परिसरात नियमित स्वच्छता राखली जाते; परंतु स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून गणेश मंदिर संस्थानने मंदिर परिसरात गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत असून एक नवा आदर्श मंदिर समितीने घालून दिला आहे.